प्रकरण ५ वें
युरोप व आशिया यांमधील दुवा : मार्को पोलो
- १ -

डान्टेचा मृत्यु आपणांस चौदाव्या शतकाच्या दुसर्‍या दशकात आणून सोडतो. तेराशें वर्षे चाललेले युरोपांतील राष्ट्रांचे सुसंस्कृत होण्याचे दुबळे प्रयत्न आपण पाहत आलों. ते प्रयत्न पाहून कींव येते. शहरें उभारीत आहेत व धुळीस मिळवीत आहेत, चित्रें रंगवीत आहेत, तरवारी परजीत आहेत, संगमवरी पुतळे खोदीत आहेत, माणसांच्या कत्तली करीत आहेत, मंदिरें बांधीत आहेत, काव्यें व गीतें रचीत आहेत, आपल्या बांधवाना ठार मारीत आहेत, असे प्रकार आपणांस या शतकांत दिसतात. गॅलिलीच्या ज्यू ख्रिस्ताचा तो शांत व सुंदर धर्म त्यांनीं घेतला; पण मानवाचा छळ करण्याचें साधन म्हणून तो वापरला. मानव प्राणी पशुकोटींतून मानवकोटींत यावयाला एक कोटि वर्षे लागलीं. पण चौदाव्या शतकाच्या आरंभास हा मानव कसा दिसतो ? अद्यापि त्याच्यामध्यें नव्वद टक्के पशुता तर केवळ दहाच टक्के मानवता दिसून येते. आपण थोडा वेळ युरोपांतील श्वेतवर्णीयांना सोडून जरा दूर आशियांतील पीतवर्णीयांकडे जाऊं या व ख्रिस्ताच्या आगमनापासून तों डान्टेच्या निधनापर्यंतच्या चौदा शतकांचा या पीतवर्णीयांनीं कसा उपयोग केला तें पाहूं या.

- २ -

तिकडे युरोप सरंजामशाहीच्या रानटीपणांत बुडत असतां, अध:पतित होत असतां, इकडे चीन सुधारणेच्या व संस्कृतीच्या शिखरावर चढत होतें. युरोपला रानटी टोळ्यांच्या स्वार्‍यांपासून त्रास झाला तसा चीनलाहि झाला. पण युरोपप्रमाणें चीन कोलमडलें नाहीं. चीनमध्यें सरंजामशाही जवळजवळ नव्हतींच. युरोपातील श्वेतवर्णीय लोकांत जसे परस्पर लढणारें शेंकडों पंथ व भेद निर्माण झाले, तसें चीनमध्यें झालें नाहीं. युरोपांतील संपत्ति, संस्कृति, ज्ञान व सौंदर्य मध्ययुगांतील युध्दांनीं धुळींत जात असतां इकडे चीनमधील संपत्ति, संस्कृति, ज्ञान व सौंदर्य हीं अविरत झगड्यामुळें नष्ट झालीं नाहींत, जिवंत राहिलीं. ग्रीक संस्कृति व रोमन संस्कृति जवळजवळ हजांर वर्षांत जणूं नष्ट होऊन गेल्या; पण चिनी संस्कृति मात्र कधींच मेली नाहीं, एक दिवसहि दृष्टीआड झाली नाहीं. दुसर्‍या शतकापासून चौथ्या शतकापर्यंत चिनी चित्रकारांनीं जगांतील अत्यंत रमणीय अशीं निसर्गाचीं चित्रें रंगविलीं आहेत. त्या तीन शतकांतील अपूर्व व अप्रतिम अशीं चिनी चित्रें, सुंदर काव्यें व भव्य शिल्प यांना जगांत तुलना नाहीं. आजहि अमर सौंदर्याचे नमुने म्हणून त्यांच्याकडे बोट दाखवितां येईल. सहाव्या शतकांत चिनी लोकांनीं लांकडी ठसे निर्मून छापण्याची कला शोधून काढली. त्या काळांत चिनी लोक गॅस व दगडी कोळसे वापरीत असें आढळतें; पण युरोपांतील लोक मात्र या गोष्टी वापरण्यास कित्येक शतकांनंतर शिकले. सहाव्या शतकांतच चिनी लोकांस बंदुकीची दारू माहीत होती. पण शांततांप्रिय चिनी लोकांनीं या शोधाचा उपयोग स्वार्थासाठीं मात्र कधींहि करून घेतला नाहीं.

सातवें शतक म्हणजे चिनी संस्कृतीचे सुवर्णगुण. कला, बुध्दि, नीति, सर्वच बाबतींत कन्फ्यूशियसचे वारसदार सार्‍या जगाच्या किती तरी पुढें होते. इ.स. ६२८ मध्यें मुसलमानी धर्मप्रचारक चीनमध्यें आले. त्यानंतर सातच वर्षांनीं ख्रिश्चन मिशनरीहि आले. त्या वेळेस टाई-त्सुंग हा चीनचा सम्राट् होता. या सम्राटानें आपला कन्फ्यूशियसचा धर्म त्यांच्यापुढें मांडून तीन धर्मांचा तिरंगी झगडा माजविण्याऐवजीं परधर्मीयांना मोठ्या सन्मानानें दरबारांत आणवून न्यू टेस्टामेंट व कुराण यांचीं चिनी भाषेंत भाषांतरें करवून घेतलीं आणि नंतर त्या धर्मग्रंथात काय आहे तें स्वत: पाहिलें व परीक्षिलें. कन्फ्यूशियसनें कित्येक शतकांपूर्वी सांगितलें होतें तेंच त्याहि धर्मांत आहे असें त्याला आढळलें. कन्फ्यूशियसचा धर्म सोडून ख्रिस्त किंवा महंमद यांचा धर्म स्वीकारावा असेंहि त्याला वाटलें नाहीं, किंवा स्वत:चा धर्म या दोन्ही धर्मांहून श्रेष्ठ आहे हें दाखविण्यासाठीं तिकडे ख्रिश्चन व मुसलमान यांना वाटत होती तशी युध्द करण्याचीहि जरुरी त्याला वाटली नाहीं. ईश्वराकडे जाण्याचे नाना मार्ग असूं शकतील आणि कोणताहि मार्ग पत्करला तरी तो देवाकडे नेणारा असेल तर ठीकच आहे असें टाई-त्सुंग याला वाटलें. म्हणून त्यानें मुसलमानांना मशिदी बांधण्यास, ख्रिश्चनांना चर्चे बांधण्यास व दोघांनाहि चिनी लोकांत  धर्मप्रचार करण्यासहि खुशाल परवानगी दिली ! केवळ धर्मवेडेपणानें त्यांनीं रक्तपात मात्र करूं नये येवढाच त्याचा कटाक्ष होता.

चिनी संस्कृतीचें विहंगमावलोकन करतांना टाई-त्सुंगची सहिष्णुता ख्रिश्चन सम्राट् शार्लमन याच्या असहिष्णुतेशीं तोलून पाहावी असें मनात येतें. शार्लमन एका दिवसांत साडेचार हजार सॅक्सनांना ते ख्रिस्ती होईनात म्हणून ठार करतो ! क्षणभर थांबून या दोन गोष्टींची तुलना करावी असें वाटतें, नाहीं ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel