भाग चौथा
मानवजातीची जागृति

प्रकरण १ लें
पोपला धाब्यावर बसविणारा शेतकरी मार्टिन ल्यूथर

- १ -

लिओनार्डोच्या मृत्यूनें आपणांस सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धांत आणून सोडलें आहे. दीड हजार वर्षे ख्रिश्चन धर्मांत राहणारी मानवजात आपण पाहिली व आपणांला लाजेनें कबूल करावें लागतें कीं, हें चित्र कांहीं फारसें अभिमानास्पद आहे असें नाहीं. मनुष्यप्राण्याच्या आरंभींच्या वृत्तींच्या रानांतून तो बराचसा बाहेर पडला आहेसें दिसत नाहीं. अद्यापिहि तो पशूच आहे. अद्यापिहि तो विनाशाचीं साधनेंच निर्मितांना दिसतो. त्याची भाषा पुष्कळ वेळां फसवी व दांभिकच असते. सत्यापासून व अहिंसेपासून तो अद्यापि दूर आहे. तो प्रासाद व मन्दिरें बांधण्यास शिकला, काव्यें-चित्रें-प्रवचनें निर्माण करण्यास शिकला, आपल्या करमणुकीसाठीं चुना व संगमरवर यांच्या उत्कृष्ट बाहुल्या करावयास शिकला; पण कलेच्या पूजेनें जीवनाची पूजा करावयाला मात्र तो अद्याप शिकला नव्हता. तो ईश्वराची पूजा करीत असूनहि अद्यापि मानवबंधूंना खुशाल ठार करतो ! तो खुनाचा जणूं धर्मच बनवितो. तो ख्रिस्ताच्या पावलांवर पावलें ठेवून जाणार्‍यांचा ख्रिस्ताच्याच नांवानें छळ करतो. ख्रिश्चन धर्मांत पंधराशें वर्षे राहूनहि मानव अद्यापि माणुसकी शिकला नव्हता.

पण या चित्राला दुसरी, आशादायक अशीहि एक बाजू आहे. हा जो मानवांचा—दांभिकांचा, दुबळ्यांचा, पशूंचा-मेळावा दिसतो त्यांतूनच कधीं कधीं प्रज्ञेचे व अनंत धैर्याचे पुरुषहि निघतात; ज्या मानवी मातींतून आपण बनविले जातों, तिच्यांतूनच कधीं कधीं दैवी सौंदर्यहि प्रकट होऊं शकतें. असे दैवी पुरुष विरळा ही गोष्ट खरी; पण इतिहासांत मधूनमधून दिसणार्‍या या व्यक्ति आशा दाखवितात कीं, याहून थोर मानव पुढें पैदा होतील; या नमुन्याहून अधिक थोर नमुने या मातींतूनच पुढें आणखीहि प्रकट होतील. भावी पिढ्यांना या व्यक्ति नीट दिसाव्या म्हणूनच जणूं त्या थोर व्यक्तिंना त्यांच्या समकालीनांनीं क्रॉसवर खिळे ठोकून टांगून ठेवलें किंवा पुढील पिढ्यांना प्रकाश दिसावा म्हणूनच त्यांच्या शरीरांच्या मशाली पेटवून ठेवल्या !

जोपर्यंत माणसें आपल्या मनांतील कल्पना व विचार स्थापण्यासाठीं दुसर्‍यांस ठार करीत आहेत, तोंपर्यंत मानवजात जंगलीच राहणार ! तथापि आपल्या ध्येयासाठी शांतपणें मरणास मिठी मारणारेहि आहेत तोंपर्यंत आपण अखेर सुधारणार, शेवटीं कां होईना पण सुसंस्कृत होणार, अशी अमर आशा बाळगण्यासहि जागा आहे.

कधीं कधीं आपल्या ध्येयार्थ स्वत:चें बलिदान करूं पाहणारा/मरावयाला तयार असणारा-समकालीनांच्या विषमय वृत्तीस बळी न पडतांनाहि दिसतो, मग तें सुदैव म्हणा वा दुर्दैव म्हणा. समकालीनांच्या तावडींतून वांचलेल्यांपैकीं मार्टिन ल्यूथर हा एक होता. पण तो नेहमीं निसटे. त्याचें वांचलेलें दीर्घ जीवन मानवजातीला केवळ आशीर्वादरूप व मंगलमय होतें का ? आपण पाहूं या.

- २ -

इ.स. १५१० मधील गोष्ट. त्या वेळीं रोममधील सेंटपीटर चर्चची दुरुस्ती करावयाची होती,  त्याचा जीर्णोध्दर करावयाचा होता. त्यासाठीं पोपनें क्षमापत्रें द्यावयाचें ठरविलें. जो कोणी या कामाला मदत करीत त्याला पापमुक्तिचीं प्रशस्ति-पत्रें पोप दुसरा ज्यूलियस हा देणार होता. या प्रॉमिसरी नोटांत 'चर्चला मदत करतील त्यांना प्रभु मरणोत्तर सर्व पापांची क्षमा करील' असें आश्वासन देण्यांत येत असे. सनातनी लोकांना यांत कांहीं वावगें आहे, असें वाटलें नाहीं. पोपचा स्वर्गाशीं प्रत्यक्ष व्यवहार असतो असें समजलें जाई. एकाद्यानें चर्चला लहानशी देणगी दिली तर त्याचा नरकांतील निवास थोडा कमी होई; देणगी मोठी असेल तर नरक अजी चुकवितां येत असे. यामुळें क्षमापत्रांचा हा पोपचा पापी धंदा चांगलाच तेजींत होता. हीं पाप-मुक्ति-पत्रें जास्तींत जास्त पैसे घेऊनच भटभिक्षुक विकीत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel