प्रकरण २ रें
सैतानाचा शिष्य मॅकिआव्हिली
- १ -

इतिहासांत प्रामाणिक दुष्ट-शिरोंमणि कोणी असेल तर तो मॅकिआव्हिली होय. ज्या काळांत लोक देवदूतांप्रमाणें बोलत व डाकूंप्रमाणें वागत त्या काळांत तो होऊन गेला. तो स्पेनच्या फर्डिनंड राजाचा समकालीन होता. फर्डिनंड ही काय व्यक्ति होती हें आपण पूर्वी पाहिलेंच आहे. लोकांना विषें देऊन त्यांच्या आत्म्यांना पुन: आशीर्वाद देणारा पोप सहावां अलेक्झांडर व त्याचा मुलगा सीझर बोर्जिओ यांचा तो समकालीन होता. त्या काळांत पोपांना लग्नाची परवानगी नसे. पण त्यांना मुलें असलीं तरी मात्र चालत ! सीझर बोर्जियो हा सत्पात्र पित्याचा पुत्र होता. त्यानें आपल्या वडील भावाचा खून केला व आपल्या मेहुण्याचा तसेंच जे जे मार्गांत आडवे आले त्या सर्वांचा वध केला. दंभकलेंत तो पित्याप्रमाणेंच पारंगत होता, दुसर्‍यांचे खून करण्यांत पटाईत होता. मित्रांना मिठी मारतां मारतां तो खंरीज भोंसकी, जेवावयास बसलेल्यांना अन्नातून विष चारी. पित्याच्या कारस्थानामुळें मध्यइटलींतील मोठ्या भागाचा तो ड्यूक झाला व स्वत:च्या कारवायांनीं पश्चिम युरोपांतील राजांमहाराजांत त्यानें मानाचें व महत्त्वाचें स्थान मिळविलें.

राजा फर्डिनंड, पोप अलेक्झांडर व सीझर बोर्जियो हे त्या काळांतील तशा प्रकारच्या लोकांचे जणूं प्रतिनिधीच होते ! त्यांच्याप्रमाणें वागणारे पुष्कळ लोक त्या काळांत होते. सामान्य लोकांचें लक्ष स्वर्गाकडे वळवून त्यांचा संसार हे लुटून घेत. त्यांना पारलौकिक गोष्टींत रमवून त्यांच्या ऐहिक वस्तू हे लुबाडीत. यांना न्याय व दया माहीत नसत; सत्ता व संपत्ति हींच यांचीं दैवतें ! ईश्वराच्या शब्दावर आमचा विश्वास आहे असें हे दाखवीत,  पण वस्तुत: स्वत:च्या स्वार्थाचा आवाज मात्र ऐकत. बायबल म्हणजे गुलामांचें आचार-पुस्तक असें हे मानीत. ज्यांना जगांत मोठेपणा मिळवावयाचा आहे, सर्व विरोध नष्ट करावयाचें आहेत, वैभवाच्या शिखरावर चढावयाचें आहे, त्यांच्यासाठीं बायबलांतील आज्ञा नाहींत. पण फर्डिनंडसारख्यांच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय असे व तें म्हणजे लोकांचे पुढारी होणें. त्यांच्या मतें एकच वर्तन योग्य असे व तें म्हणजे पशूचें वर्तन.

मॅकिआव्हिलीच्या काळांतील महत्त्वाकांक्षी युरोपचें ध्येय हें असें होतें. सर्व लोकांना वाटत होतें कीं, नवें नीतिशास्त्र हवें. मात्र दंभामुळें त्यांना तसें बोलण्याचें धैर्य नव्हते. त्यांना असें नीतीशास्त्र हवें होतें कीं, त्याच्या योगानें कसें फसवावें व कसें चोरावें हें शिकावयास मिळेल; सर्वांच्या डोक्यांवर बसतां यावें म्हणून कोणास कसें ठार करावें हें सांगणारें नीतिशास्त्र त्यांना हवें होतें. थोडक्यांत म्हणजे त्यांना चोरांचें व डाकूंचें एक क्रमिक पुस्तक पाहिजे होतें.

ही उणीव मॅकिआव्हिलीनें दूर केली. माणसें खरोखर जशीं होतीं तशीं त्यानें रंगविलीं. माणसें जशीं दिसतात तशीं नसतात. मॅकिआव्हिली यथार्थवादी होता. युरोप रानटी प्राण्यांचें एक वारूळ आहे असें त्यानें दाखवून दिलें व निर्लज्ज आणि बेशरम मोकळेपणानें या रानटी पशुपणांत कसें यशस्वी व्हावें हें युरोपियन जनतेस समजेल अशा भाषेंत सांगितलें.

त्यानें युरोपला पशुत्वाचें एक नीवन सूत्रमय शास्त्रच दिलें. जगानें धक्का बसल्याचा बहाणा केला, पण मनांत त्याला गुदगुल्याच झाल्या ! मॅकिआव्हिलीनें नेमकें त्याच्या मनांतलेंच सांगितलें होतें. सुवर्णमध्याच्या कायद्याऐवशीं त्यानें लोखंडी कायदा दिला. ख्रिस्ताचें पर्वतोपनिषद् त्यानें अव्यवहार्य स्वप्न म्हणून फेंकून दिलें ! त्याऐवजीं त्यानें तरवारीचें उपनिषद् उपदेशिलें. तोहि इतरांप्रमाणें जंगलीच होता; पण तो निदान दांभिक तरी नव्हता. जंगली असून तो साळसूदपणाचा आव आणीत नसे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय