प्रकरण ८ वें
व्हॉल्टेअर
- १ -

आपल्याच हातानें मानेला पचंस लावून घेऊन आत्महत्या करण्याची पाळी येऊं नये म्हणून हंसणारा व्हॉल्टेअर हा ऍरिस्टोफेन्स व रॅबेल्स, ल्यूथर व सैतान या सर्वांचें अजब मिश्रण होता. त्याची प्रतिभा व त्याची बुध्दि या परस्परविरोधी गुणांनीं बनल्या होत्या. तो मानवजातीचा तिरस्कार करी, पण मानवांवर त्याचें प्रेमहि असे. तो धर्मोपदेशकांची टर उडवी; तरी पण त्यानें आपलें एक पुस्तक पोपला अर्पण केलें आहे. राजामहाराजांची तो हुर्रेवडी उडवी, तरी पण त्यानें फ्रेडरिक दि ग्रेटनें दिलेलें पेन्शन स्वीकारलें. त्याला धर्मांधपणाची चीड असे पण ज्यूंच्या बाबतींत तो अनुदार होता. संपत्तिजन्य ऐटीचा तो उपहास करी; तरी त्यानें स्वत: मात्र पुष्कळ धनदौलत मिळविली व तीहि सगळीच कांहीं प्रामाणिकपणें मिळविली नाहीं. ईश्वरावर त्याचा विश्वास नव्हता, तरी तो जन्मभर ईश्वराचा शोध करीतच होता. त्याला धर्माबद्दल आदर नसे, पण त्यानें हास्याच्या आनंदाचा नवाच धर्म निर्मिला.

जगांतल्या थट्टा व टिंगल करणार्‍यांचा तो राजा होता. हें जीवन म्हणजे एक मोठें हास्यरसोत्पादक नाटक आहे असें तो मानी. तो लोकांना म्हणे, ''जीवन हा एक फार्स समजा आणि मिळवितां येईल तितकी गंमत मिळवा.''  जीवन चांगल्या रीतीनें जगतां यावें, अनुभवितां यावें, त्यांतील गंमत मिळवितां यावी म्हणून अज्ञान, अन्याय, रुढी व युध्दें हीं सर्व नष्ट करून टाकलीं पाहिजेत. या दुष्ट वस्तू जीवनाची ट्रॅजेडी करून टाकीत असतात. या दूर केल्या तरच जीवन हें एक कॉमेडी होईल.

दुसर्‍या शब्दांत हेंच सांगावयाचें तर असें म्हणतां येईल कीं, व्हॉल्टेअरनें लोकांना विचार कसा करावा हें शिकविलें. तो म्हणे, ''राष्ट्र एकदां विचार करायला लागलें म्हणजे मग त्याला थांबविणें अशक्य होईल.'' तो स्पायनोझापेक्षां कमी चारित्र्यवान् होता, तरी त्यानेंच जगावर त्या ज्यू तत्त्वज्ञान्यापेक्षां अधिक परिणाम-सुपरिणाम केला. तो व्यवहार्य गोष्टींवरच लिली व तेंहि लहान मुलांना सुध्दं समजावें अशा भाषेंत. त्याच्या संशयवादी तत्त्वज्ञानामुळें डायनॅमिटवर ठिणगी पडली व असा प्रचंड भडका उडला कीं, राजांचे दंभ व धर्मांतील भोळसट रुढी यांचें भस्म झालें. जुन्या जगाचा पाया त्यानें उडवून टाकला व नव्या जगाचा पाचा घालण्यासाठीं वाव करून दिला.

त्याचें सारें जीवन म्हणजे विरोधाभास होता. तो जन्मतांच त्याची आई मेली. २१ नोव्हेंबर १६९४ रोजीं तोहि मरणार असें वाटलें, पण तो वांचला. त्याची प्रकृति नेहमीं मरतुकडी होती. तरीहि तो त्र्यायशीं वर्षांचा होईतों वांचला. जेसुइट स्कूलमध्यें शिकून तो ग्रॅज्यूएट झाला. त्यानें जेसुइटांचें सारें वर्चस्व झुगारून दिलें. त्याच्या हाडांचा नुसता सांगाडा होता, त्याचें नाक लांब होतें, त्याचे डोळे बारीक पण तेजस्वी होते. तो पॅरिसमधला सर्वांत कुरुप तरुण होता, तरीहि तो सार्‍या स्त्रियांचा लाडका होता. त्या त्याला जणूं देव मानीत !

तो कपटी व उपहास करणारा होता. त्याचें खरें नांव फ्रॅकॉइस मेरी अरोट असें होतें. पंधराव्या लुईच्या रीजंटचा अपमान केल्याबद्दल बॅस्टिलच्या तुरुंगांत शिक्षा भोगीत असतां त्यानें नाव बदलून व्हॉल्टेअर हें नांव घेतलें. अकरा महिन्यांचा तुरुंगवास त्यानें नाव्हेरचा राजा हेन्री याच्यावर महाकाव्य लिहिण्यांत खर्चिला. तुरुंगांतून सुटला तेव्हां तो तेवीस वर्षांचा होता. त्याचा बाप व्यवहारचतुर होता. त्यानें त्याला तीन गोष्टींबाबत सावध राहण्यास सांगितलें : वाङमय, स्त्रिया व जुगार. शाळेंत असतां तो जेसुइटांचें मनापासून ऐके, त्याचप्रमाणें त्यानें बापाचा हा उपदेश लक्षपूर्वक ऐकला. पण जेसुइटांच्या शिकवणीप्रमाणेंच बापाचीहि शिकवण तो पुढें विसरला.

त्यानें कांहीं नाटकें लिहिलीं व तीं यशस्वी ठरलीं. त्याला पैसेहि बरे मिळाले. वॉलस्ट्रीटमधील एकाद्या ब्रोकरप्रमाणें त्यानें आपले पैसे मोठ्या हुषारीनें गुंतविले. फ्रेंच सरकारनें काढलेलीं लॉटरीचीं सारीं तिकिटें एकदां व्हॉल्टेअरनें घाऊक रीत्या खरेदी केलीं. मॅनेजरांच्या हें लक्षांतच न आल्यामुळें सारीं बक्षिसें व्हॉल्टेअरला मिळालीं !

तो तत्त्वज्ञानी तसाच व्यवहारज्ञहि हाता. सूक्ष्म विचार करणारा व धंद्यांत हुषार असा पुरुष क्वचितच आढळतो. व्हॉल्टेअरची बुध्दि मोठी विलक्षण होती. तत्त्वज्ञानांतील अमूर्त व सूक्ष्म विचार तो प्रत्यक्ष व्यवहाराशीं बेमालूम मिसळी. मूर्त-अमूर्त दोहोंतहि त्याची बुध्दि सारखी खेळे व्यवहार्यता व सूक्ष्म अमूर्तता दोन्ही त्याच्या ठायीं होत्या. इतर नाना उलाढाली करूनहि त्याला पॅरिसमधील प्रतिष्ठति व रुबाबदार मंडळींत मिसळण्यास भरपूर वेळ असे. पॅरिसमधील बेछूट, स्वछंदी व विलासी जीवनाचा तो मध्यबिंदु होता; त्याच्याभोंवतीं पॅरिसमधील प्रतिष्ठत नबाब व पंडित जमत. तत्त्वज्ञान, व्यवहार व या बैठकी अशा त्रिविध चळवळींचा त्याच्या बुध्दीवर ताण पडे व त्यामुळें त्याचें दुबळें शरीर थके. एकदां त्याला देवी आल्या. डॉक्टरांना तो मरणार असें वाटलें; पण तो नेहमींप्रमाणें बरा झाला व अधिकच उत्साहानें जीवनाच्या आनंददायीं गोंधळांत सामील झाला-पुन: या सुखी व विनोदी संसारांत बुडी घेता झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel