पण युध्दाला हें नवीन ध्येय मिळालें तरी तें अप्रियच राहिलें. सारींच युध्दें अप्रिय असतात, पण इतिहासकार खरें सांगत नाहींत; उत्तरेकडच्यांचे व दक्षिणेकडच्यांचे किती तरी सैनिक त्यांना सोडून जात होते. कोणालाच उत्सुकता वाटत नव्हती. बहुजनसमाजाला युध्द नको होतें. सक्ति करण्याशिवाय गत्यन्तरच नसल्यामुळें लोकांना कुटुंबांतून बळजबरीनें ओढून नेऊन लढावयास लावण्यांत आलें. हा जो सक्तीचा मानव-यज्ञ चालू होता, त्यांत श्रीमंतांवर मात्र सक्ति नव्हती, हा आणखी एक अन्याय होता. ते शेंदोनशें डॉलर देऊन स्वत:ऐवजीं दुसर्‍यास मरावयास पाठवीत. यामुळें गरीबांवरच या हत्याकांडाचें सारें ओझें पडलें. त्यांनाच बळी पुरवावे लागत. ही सक्ति अत्यंत अमानुष व निर्दय होती. स्वत:बदली दुसरा एकादा बळी ज्यांना पाठवितां येत नसे, ते या धोरणाविरुध्द कडक टीका करूं लागले. सक्तीविरुध्द देशांत सर्वत्र बंडाळी होऊं लागली, दंगेधोपे होऊं लागले. न्यूयॉर्कमध्यें हे दंगे बरेच दिवस चालू राहिले व त्यात हजारों लोक मरण पावले. या अन्तर्गत युध्दांतल्या अनेक लढायांपैकीं नागरिकांची सरकारशीं झालेली लढाई महत्त्वाची असूनहि बहुतेक इतिहासकारांनीं तिचा उल्लेख देखील केलेला नाहीं ! युध्दाबद्दल संपूर्ण सत्य सांगणें फायद्याचें नसतें व तें कोणास आवडतहि नाहीं.

हें अन्तर्गत युध्द ही दु:खद व लज्जास्पद घटना होती, हा कलंक होता. या युध्दामुळें लिंकनचें चारित्र्य उन्नत व धीरोदात्त झालें, पण त्यासाठीं केवढी जबरदस्त किंमत द्यावी लागली ! युध्दामुळें सर्वत्र पसरलेल्या व पेटलेल्या प्रक्षुब्ध भावनांमुळेंच शेवटीं त्याचाहि खून झाला व त्यानंतर देशांत सर्वत्र सामाजिक व राजकीय बेदिली माजली; पण असें होणें स्वाभाविकच होतें. मागल्या महायुध्दानंतर प्रेसिडेंट हार्डिंगच्या कारकीर्दीत आपल्या पिढीनेंहि तीच बेदिली अनुभवली आहे. युध्दांत भाग घेणार्‍या सर्वच राष्ट्राची नैतिक दृष्टि युध्दामुळें अध:पतित होते, नैतिक मुल्यें नष्ट केलीं जातात. शांतताकालीं दुर्गुण समजल्या जाणार्‍या गोष्टी युध्दकाळांत सद्गुण मानल्या जातात आणि युध्दकालीं तर तोंड करून सर्वत्र मिरविणारे दुर्गुण युध्दाबरोबर नष्ट न होतां पुढें बरींच वर्षे सर्वत्र वावरत राहतात. अश्रध्द, नास्तिकता, सिनिसिझम, अप्रामाणिकपणा, पशुता, दुष्टता, खून वगैरेंच्या पायावरच युध्देत्तर संस्कृति उभारण्यांत येत असते. सिव्हिल वॉर संपतांच लिंकननें आपल्या राष्ट्राला ''कोणाशींहि व्देषमत्सराची वागणूक करूं नका, सारें विसरून जा, सर्वांशीं प्रेमानें व स्नेहानें वागा'' अशी सूचना दिली. हे शब्द सुंदर, अमर व उदात्त आहेत, पण वाईट येवढ्याचकरतां वाटतें कीं, ते तो वाजवीपेक्षां पांच वर्षे उशिरानें बोलला.

लिंकनचें जीवन बनविणारे, त्याचें चारित्र्य बनविणारे कांही धागे आपण पाहिले. मानवजातीचा तो एक अत्यंत वैशिष्टयपूर्ण नमुना आहे. त्याच्यामध्यें मर्त्य व अमर्त्य दोन्ही गोष्टींचें मिश्रण आहे. सूर्यप्रकाश व ही खालची माती या दोहोंपासून त्याचें जीवन बनलें आहे. बेदरकार महत्त्वाकांक्षा व व्यापक सहानुभूति दोन्ही त्याच्या जीवनांत आहेत; क्षुद्रता व प्रेम दोन्ही त्याच्या ठायीं होतीं. त्याचा पोषाख शेतकर्‍यासारखा असे, पण त्याची वाणी राजाची वाटे. कोणाहीसमोर तो गांगरत नसे, त्याची मान खालीं होत नसे. पण पत्नीपुढें मात्र तो नांगी टाकी ! राजकारणांत तो कारस्थानें करी, पण इतर सर्व व्यवहारांत तो अत्यंत प्रामाणिकपणें वागे. तो सामान्य मनोबुध्दीचा पण अव्दितीय इच्छाशक्तीचा मनुष्य होता. तो सामान्य जनांपैकींच एक होता. तो सर्वांकडे बंधुभावानें व बंधुप्रेमानें पाही. पण स्वत:च्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठीं त्यानें साडेसात लाख लोकांना मृत्यूकडे पाठविलें ! मानवजातीचा मोठेपणा व तिचें दुर्दैव यांचे प्रतीक म्हणजे लिंकन.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel