प्रकरण ८ वें
शेवटचा कैसर सम्राट दुसरा वुइल्यम
- १ -

लिखित इतिहासांत १९१४ सालचें महायुध्द म्हणजे अत्यंत भयानक आपत्ति होय. हिची जबाबदारी कोणाहि एक व्यक्तीवर वा राष्ट्रावर नसून सर्व मानवजातीवरच आहे. एकोणिसाव्या शतकांत सारें जगच युध्दाचे विचार शिकत होतें. शांततेचे विचार जणूं जगांतून लुप्तच झाले होते ! 'आपआपल्या जातीजमातीपुरतें वागतांना सभ्य गृहस्थ राहा, पण राष्ट्राचे एक घटक या दृष्टीनें गुड बना' असा संदेश प्रत्येक राष्ट्र आपापल्या लोकांस देत होतें. कल्पना करा कीं, हत्यारबंद लोक बोस्टन, बर्लिन वा बगदाद शहरांत घुसले असून कोण अधिक लुटतो, लुबाडतो व सर्वांना दहशत वा दरारा बसवितो, याबाबत त्यांची आपासांत स्पर्धा लागली आहे व तेथें पोलिस वगैरे कोणी नाहींत, कायदेशीर साधन नाहीं, या हत्यारबंद गुंडांविरुध्द उपाययोजना करीत असें संघटित सामाजिक यंत्रहि नाहीं. हुबेहुब अशीच स्थिति एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस जगांतील बलाढ्य राष्ट्रांची होती.

युरोपांतील प्रबलतर राष्ट्रें जागतिक प्रमाणावर उठाठेवी दंगामस्ती करणारीं होतीं. युरोपांतील एक विशिष्ट मनोवृत्ति सर्वत्र बळावत होती. ही विशिष्ट राष्ट्रीय मनोवृत्ति जंगलच्या कायद्यावर उभारलेली होती. 'बळी तो कान पिळी' हें या सर्वांचें ब्रीदवाक्य होतें;  'आमच्या देशातलें जें आम्हांस हवें असतें तें आम्ही विकत घेतों, पण इतर देशांतलें जें आम्हांस हवें असतें तें आम्ही चोरून घेतों,' असें सारीं बलाढ्य राष्ट्रें म्हणत. तीं चढाऊ राष्ट्रें घाणेरड्या व निंद्य खेळांत मग्न झालीं. पूर्वेकडील दुबळीं राष्ट्रें लुटावयाचीं हा जणूं सर्वांचा धर्मच झाला ! तीं याला 'डाकूगिरी' म्हणत नसत, तर 'संरक्षण' म्हणत असत. फ्रान्सनें अल्जीअर्स, मादागास्कर, आनाम व टोंकिन यांचें संरक्षण करण्याचें ठरविलें व त्यांना आपल्या पंखाखालीं घेतलें. ऑस्ट्रिया तुर्कांच्या विरुध्द रक्षण द्यावयास उभा राहिला. बोस्निया व हर्झेगोविना या प्रदेशाना त्यानें जवळ घेतलें. रशिया पोर्ट आर्थरचें रक्षण करावयाला गेला व जपानशीं १९०४-५ सालीं त्याचें युध्द झालें. जर्मनी आफ्रिका व आशिया या खंडांत संरक्षणासाठीं धांवूं लागला. त्याचे हे संरक्षित टापू होते. इंग्लंड सर्वांत जास्त चढाईखोर होतें. हिंदुस्थान, ईजिप्त, आयर्लंड इत्यादि दहाबारा देशांवर इंग्लंडनें आपले पंख पसरले होते. रस्त्यांतल्या एकाद्या लहान मुलाजवळचीं उंसाचीं कांडीं घेण्याचा जसा कोणासच बिलकुल हक्क नसतो, तसाच या प्रबळ राष्ट्रांना दुबळया राष्ट्रांची मालमत्ता लुबाडण्याचा यत्किंचित् सुध्दां हक्क नव्हता. पण राष्ट्रीय नीति व्यक्तीच्या नीतीच्या पाठीमागें शेंकडों वर्षे असते. आपआपल्या शासनसंस्थांच्या वतीनें कारभार हांकणारे मुत्सद्दी आंतरराष्ट्रीय कारभारांत असें वागतात कीं, तसें खासगी नागरिक या नात्यानें वागण्याचें ते स्वप्नांतहि मनांत आणण्याचें धाडस करणार नाहींत. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, ऑस्ट्रिया व इटली इत्यादि राष्ट्रांनीं जगाला चक्क जाहीर केलें कीं, 'दुबळया राष्ट्रांवर सत्ता गाजविणें हें आमचें ईश्वरदत्त कर्तव्य आहे. हें भाग्य आम्हांस ईश्वरानें दिलें आहे !'  व तीं सर्व दुबळया राष्ट्रांना लुटावयास व गुलाम करावयाला पुढें सरसावलीं.

वसाहतींचें साम्राज्य मिळविण्यासाठीं वेडी स्पर्धा जोरांत सुरू झाली. या स्पर्धेतून लवकर अथवा उशिरा जागतिक युध्द पेटणार यांत शंका नव्हती. कारण या चढाऊ राष्ट्राच्या परस्पर हितसंबंधांचे पुष्कळ वेळां खटके उडत, संघर्ष होत. ज्यानीं उत्कृष्ट प्रदेश आधींच बळकावले होते, त्याच्याकडे इतर देश व्देषानें व मत्सरानें बघत. कारण, त्यांना लुटींतला फारसा फायदेशीर वाटां मिळालेला नसे. पुष्कळदां एकाच तुकड्यावर अनेकांचें गिधाडी डोळे लागलेले असत. या स्पर्धेतून शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरू झाली. तोफाचा आवाज ईश्वरी आवाजाप्रमाणें पूजिला जाऊं लागला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel