ती पाऊण पौंडावर आली. पुढें पुढें अर्ध्या पौंडावर येऊन शेवटीं तर प्रत्येकास पावच पौंड ब्रेड मिळूं लागली. अखेरीस तर एक आठवडा असा आला कीं, अजीबात ब्रेडच मिळाली नाहीं. पेट्रोग्राडमधल्या निम्म्याहून अधिक लहान मुलांस दूध मिळत नव्हतें. शिपायांना पुन: खंदकांत पाठविण्यांत आलें, पण त्याच्या पोटांत अन्न नव्हतें, पायांत बूट नव्हते. ते कृश झाले होते. त्यांचीं तोंडें फुटून गेलीं होतीं, चिंबलीं होती. फाटलेल्या गणवेशांतून त्यांचीं हिरवीं निळीं शरीरें दिसत होतीं. 'तह करा' अशी प्रार्थना करण्यासाठीं त्यांनीं पेट्रोग्राडला शिष्टमंडळ पाठविलें. रुमानियन सरहद्दीवरून आलेला एक शिपाई गर्जना करून म्हणाला, 'भाई हो ! खंदकांत आपण मरत आहों, थंडीनें कडक होऊन गेलों आहों, फुकटाफुकट आपण करता आहों. केरेन्स्की शांतता आणीलसें वाटलें होतं. पण हें नवें सरकार तहाचा शब्दहि तोंडातून काढूं देत नाहीं, आणि ही बंदी करीत असतां आम्हांला हें सरकार अन्नहि पुरवीत नाहीं, जगूंहि देत नाहीं !'' हा शिपाई हाडकुळा व कृश होता, दु:खीकष्टी व निकरावर आलेला होता.

रशियन सैनिकांना युध्दांत वैभव वा मोठेपणा दिसेना. दुसरा एक शिपाई म्हणाला, ''ज्यांना खंदक म्हणतात, पण आम्हाला जीं आमच्यासाठीं खणलेलीं थडगीं वाटतात, अशा ठिकाणांहून मीं तुम्हांला सर्वांचे रामराम आणले आहेत.''  दमल्या-भागलेल्या सैनिकांनीं तीन मागण्या मागितल्या : युध्द थांबविणें, गरिबांना जमीन व भुकेलेल्यांना भाकरी. या मागण्यांबाबत 'लंडन-टाइम्स' ''बोल्शेव्हिझमला एकच उपाय आहे, गोळया घाला,'' अशी टीका करतो. साम्राज्यशाहीच्या या लंडलमधील संपादकापासून सूचना घेऊन पेट्रोग्राडमधलेहि प्रतिगामी रशियन संपादक 'क्रांतिकारकांची सर्रास कत्तल करा' असें प्रतिपादूं लागलीं,  शांततेच्या पुरसर्कत्यांना व ज्यूंना गोळया घालण्याचा उपदेश करूं लागली ! सैनिकांस उद्देशून काढलेल्या जाहीरनाम्यांत केरेन्सकी लिहितो, ''युध्द ही पवित्र वस्तु आहे. कांहीं झालें तरी शेवटपर्यंत लढणें हें तुमचे पवित्र कर्तव्य आहे.''  रशियन सैन्यांतील अमलदार केरेन्स्कीच्याच मताचे होते. पण सैनिक हळूहळू पळून जाऊं लागले, पलटणी बिथरूं लागल्या ! 'पुरें झालें हें युध्द !' असें म्हणून हजारों शिपाई निघुन जाऊं लागले.

अखेर तो ऐतिहासिक दिवस उगवला : ७ नाव्हेंबर १९१७ !—नवयुगाच्या जन्माचा थोर दिवस ! सैनिकांच्या प्रचंड सभेंत लेनिन शिरला. शिपाई, शेतकरी व कामकरी यांच्या त्या विराट् सभेंत लेनिन थोडेच शब्द बोलला ! पण त्या लहानशा भाषणानें क्रान्ति झाली, प्रचंड उलथापालथ झाली ! जणूं प्रचंड भूकम्प होऊन खालीं, तळाशीं असलेले वर आले व वरचे खालीं मातींत गेले ! युध्दमान राष्ट्रांना त्यानें 'ताबडतोब तह करा', असें सुचविलें. पराभूतांना वाईट वाटणार नाहीं व नेत्यांनाहि लूट मिळणार नाहीं, असा नवीन प्रकारचा तह त्यानें सुचविला. लुटीशिवाय केला जाणारा तह ! त्यानें आपल्या देशबंधूंना राजकीय व सामाजिक लोकशाहीचें ध्येय दिलें; पण खरी लोकशाही येण्यापूर्वी कांहीं दिवस अपरिहार्य म्हणून त्यानें कामगारांची हुकूमशाही उभी केली. कुत्र्याप्रमाणें वागविले जात असलेले पददलित आतां प्रतिष्ठित होणार होते. कामगारांची सत्ता स्थापन होणार होती. या सामाजिक क्रान्तीचें ध्येय जगांत आंतरराष्ट्रीय बंधुता स्थापणें हें होतें. सर्वांचे समान हितसंबंध प्रस्थापित करणें हें होतें. भांडवलशाहीची निर्दय स्पर्धा व क्षुद्र स्वार्थान्धता नष्ट करून विश्वकुटुंबवाद प्रस्थापित करणें हें या सामाजिक क्रांतीचें अन्तिम प्राप्तव्य होतें. लेनिनपूर्वी पुष्कळ इतर पुढारी या सभेंत बोललें होते. ट्रॉट्स्कीनें आपल्या निश्चयी व तेजस्वी वाणीनें सांगितलें कीं, जगांतील सार्‍या साम्राज्यशाह्या नष्ट झाल्यावाचून राहणार नाहींत. झेनोविव्हचें भाषण फारच भावनाप्रधान होतें. तो म्हणाला, ''सार्‍या जुलूम करणार्‍यांनीं हा दिवस ध्यानांत धरावा. त्यांना स्वत:च्या कृत्यांचा झाडा द्यावा लागेल. लाखों लोकांना मारणार्‍या वुइल्यम कैसरसारख्या अनियंत्रित सत्ताधार्‍यांनीं व साम्राज्यवाद्यांनीं हा दिवस विसरूं नये.''  सैनिकांच्या प्रतिनिधींनीं युध्द थांबविण्याबद्दल मनापासून विनंती केली. प्रत्येकजण आंतरराष्ट्रीय गीत गात होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel