प्रकरण १० वे
हुकूमशाही विरुध्द लोकशाही : मुसोलिनी, हिटलर, रुझवेल्ट
- १ -

गेलीं एकवीस वर्षे हें जग अत्यंत रुग्णावस्थेंत आहे. परिस्थिति मोठी आणीबाणीची आहे. १९१४ सालच्या महायुध्दांतून नाना प्रकारच्या आपत्ती उद्भवल्या व शारीरिक, मानसिक आणि नैतिक आधिव्याधी उत्पन्न झाल्या. या सर्व आधिव्याधींमुळें मानवजात निरुत्साही होऊन गेली, खचून गेली, मेटाकुटीस आली. नाना उपाय सुचविलें गेलें, अमलांत आणले गेले आणि अजूनहि सुचविले जात आहेत व अमलांत आणले जात आहेत : रशियांत कम्युनिझम्, जर्मनींत नाझीझम्, इटलींत फॅसिझम्, अमेरिकेंत लोकशाही, हिंदुस्थानांत अहिंसक प्रतिकार, असे नाना प्रयोग चालले आहेत. जगांतील दु:खांचा परिहार व्हावा यासाठीं प्रत्येक देशानें सुचविलेल्या रामबाण उपायांपैकीं कांहींचें निरीखण-परीक्षण आपण केलें; आता उरलेल्यांकडेहि जरा वळूं या.

समकालीन घटनांचें अत्यंत शांतपणें व बिनचुक मूल्यमापन करणें इतिहासकाराला फार कठिण जातें. कारण, त्याला स्वत:च्याच पिढीच्या इतिहासांत प्रत्यक्ष भाग घेणारा व पुन: प्रेक्षक आणि तटस्थ निरीखकहि व्हावें लागतें. या दोन्ही भूमिका तो कशा पार पाडणार ? आजूबाजूच्या जगांत जें जें घडतें तें तें त्याच्या बाबतींतहि घडतच असतें; त्याच्यावरहि त्याचा परिणाम होतच असतो; त्यामुळें त्याची दृष्टि तितकी निर्मळ राहत नाहीं, त्याचा स्वभाव शांत राहत नाहीं. आपलें व आपल्या कुटुंबाचें काय होणार या चिंतेमुळें तो निर्णयहि बरोबरच करील असें नाहीं. त्याची न्यायबुध्दि पक्षातीत राहणें व सत्यावर खिळणें कठिण असतें. शेवटीं जगाची गति नक्की कोणत्या दिशेनें जाणार, कोणता प्रवाह पुढें जाणार याचें त्याला नीट आकलन होत नाहीं : एकाच वेळीं दहाबारा दिशांनीं प्रवाह खळखळ करीत जात असतात.

अशा या गोंधळांतून दोन प्रवृत्ती, दोन निष्ठा निश्चित स्वरूपांत जगापुढें उभ्या राहत आहेत : लोकशाही व हुकूमशाही. हे दोन्ही प्रवाह प्रबळ दिसत आहेत. मानवी मर्यादा ध्यानीं घेऊन या दोन्ही प्रवृत्तींचा शक्य तितक्या नि:पक्षपातीपणें विचार करूं या.

- २ -

लोकशाहीप्रधान राष्ट्रें लोकशाहीप्रधानच राहिलीं आहेत. ज्या देशांमध्यें अनियंत्रित व एकमुखी सत्ता होती त्यांमध्यें ती जाऊन तिच्या जागीं हुकूमशाही आली आहे. ते देश जणूं आगींतून निघून फुफाट्यांत पडले आहेत ! महायुध्दापूर्वी ज्या देशांत राजशाह्या होत्या त्याच देशांत या हुकूमशाह्या उद्भवल्या ही महत्त्वाची गोष्ट आहे. लोकशाहीप्रधान राष्ट्रांत राहणार्‍यांच्या दृष्टीनें ही जरा समाधानाची व उत्साहाची गोष्ट आहे. हीवरून लोकशाहीप्रधान शासनपध्दतीखालीं स्वातंत्र्याचें शिक्षण न लाभलेल्या देशांतच फॅसिझम व नाझीझम शक्य होतात असें आढळून येत आहे. राजशाही व समाजसत्तावाद यांच्यामधील पायरी म्हणजेच फॅसिझम असें कांहीं राजकीय तत्त्वज्ञानी म्हणत असतात, प्रतिपादीत असतात. राजशाहीखालीं आज्ञाधारकपणाची, मुकाट्यानें मान खालीं घालण्याची संवय झालेल्यांना एका दिवसांत स्वातंत्र्याचीं कर्तव्यें पार पाडतां येणें शक्य नसल्यामुळें रशिया, इटली, जर्मनी, पोलंड, तुर्कस्थान, हंगेरी, स्पेन या सर्व देशांत हुकूमशाह्या अस्तित्वांत आल्या. पण लोकशाहीप्रधान देशांत हुकूमशाही येण्याची भीति नको,  भीति बाळगण्याचें कारण नाहीं, असें इतिहास सांगत आहेसें दिसतें. इंग्लंड, फ्रान्स, स्विट्झर्लेंड, डेन्मार्क, हॉलंड, नॉर्वे, स्वीडन, युनायटेड स्टेट्स् यांमध्यें अद्यापि तरी हुकूमशहा झालेला नाहीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel