असेहि कांहीं लोक आहेत कीं, जे रुझवेल्टलाहि हुकूमशहा म्हणतील. पण हा शब्दांचा सम्यक् उपयोग नव्हे. रुझवेल्टला डिक्टेटर म्हणणें हें सर्वस्वीं सत्याला सोडून आहे. हुकूमशहा हिंसेच्या बळावर सत्ता काबीज करतो व दमदाटी देऊन अगर धाकदपटशा दाखवून ती हातीं ठेवतों. रुझवेल्टला लोकांनीं निवडून दिलें व पुन: निवडून येण्यासाठीं त्याला लोकांच्या सदिच्छेवरच विसंबावें लागेल. हुकूमशहा भाषणस्वातंत्र्याला भितो, तर रुझवेल्ट भाषणस्वातंत्र्याचा कैवारी आहे. हुकूमशहा जीवनावधि सत्ताधारी होऊं पाहत असतो, तर रुझवेल्टच्या मनांत असें कांहींहि नाहीं. हुकूमशहा जुलुमानें विरोधी आवाज मरून ऐक्य निर्मितो, तर रुझवेल्ट सहकार्यानें ऐक्य स्थापूं पाहतो. हुकूमशहा आपल्या विरोधकांचे खून करतो, तर रुझवेल्ट त्यांना मित्र करूं पाहतो. हुकूमशहा जनतेला धाक घालतो, तर रुझवेल्ट तिला उत्तेजन देतो. हुकूमशहा 'बळी तो न्यायी' असें प्रतिपादितो, तर रुझवेल्ट 'न्याची तो बळी' असें मानतो. हुकूमशहाच्या तोंडावर सदैव आठ्या, तर रुझवेल्टच्या मुखावर सदैव स्मित.

रुझवेल्टच्या स्मितांत त्याच्या स्वभावाची व चारित्र्याची किल्ली आहे. रुझवेल्टची मुद्रा पाहून हा निर्मळ सद्सद्विवेकबुध्दि व उदार हृदय असलेला पुरुष असणार असें वाटतें. त्याच्या चेहर्‍यावरून तो धूर्त पण प्रांजळ असावावें वाटतें. त्याची मनोबुध्दि निरोगी असावी असें वाटतें. त्याच्या मुद्रेंत बावळटपणा दिसत नाहीं. त्याच्या चेहर्‍यावर कलावंताची सुगमता दिसून येते. रुझवेल्ट हा सत्कर्माचा कलावंत आहे. सुस्वभाव हें त्याचें मुख्य वैशिष्टय. प्रयोग करण्यास शिकण्याची सदैव तयारी हें त्याचें दुसरें वैशिष्टय. ''किती झालें तरी मीहि मनुष्यप्राणीच आहें; अर्थांत् मीहि चुकणारच'', असें तोहि लेनिनप्रमाणेंच मनमोकळेपणानें म्हणतो. जगांतील अन्याय व दु:खें दूर करण्यासाठीं एकाच विश्वव्यापक रामबाण उपायावर तो विसंबून राहत नाहीं, निरनिराळे कायदे करूं पाहतो. या कायद्यांच्या योगें सामाजिक, राजकीय व आर्थिक न्याय अधिक प्रमाणांत येईलसें त्याला वाटतें व तदनुसार तो नवेनवे कायदे करतो. यासाठीं त्यानें आपल्या सभोंवती वेंचक बुध्दिमान् माणसें गोळा केलीं आहेत. वर्तमानपत्रें टिंगलीच्या आजावांत ''रुझवेल्टच्या बुध्दीची ठेव'' असें या लोकांना उद्देशून म्हणत असतात. हे लोक अमेरिकेंतील व्यावहारिक विचारांचे उत्तम पुरस्कर्ते आहेत. राजकीय अनुयायांच्यापेक्षां बुध्दिमान् सल्लागारांचा सल्ला घेण्याचा शांतपणें निश्चय करून रुझवेल्टनें जणूं रक्तहीन क्रांतीचेंच युग सुरू केलें. प्रोफेसर योले व त्याचे सहकारी यांच्या मार्गदर्शकत्वाखाली प्रेसिडेंट रुझवेल्ट राजकीय तत्त्वज्ञान शिंकू लागला तेव्हां ती एक महत्त्वाची गोष्ट झाली यांत शंकाच नाहीं. अमेरिकेच्या इतिहासांत ती तारीख क्रांतिकारक आहे. रुझवेल्ट तेव्हां जणूं पदवी-उत्तर अध्ययनच करीत होता आणि आतां तर तो एम्.एस्. म्हणजे मुत्सद्देगिरी-पारंगत होऊं पाहत आहे.

रुझवेल्ट मुत्सद्दी आहे. रुझवेल्टखेरीज आजच्या पिढींतल्या कोणासहि हा शब्द लावतां येणार नाहीं. लेनिन मुत्सद्दी होता; पण आपल्याइतका पात्र दुसरा मुत्सद्दी त्याला युरोपांत आपल्यामागें ठेवतां आला नाहीं. रॅम्से मॅक्डोनल्डमध्यें ती पात्रता होती; पण तो मुख्य प्रधान झाला व त्याच्यांतील ती पात्रता गेली; बकिंगहॅम-पॅलेसजवळ येतांच त्याचे डोकें बिघडलें; पण प्रेसिडेंट निवडून आल्यावर रुझवेल्टमधले मुत्सद्देगिरीचे गुण मेले तर नाहींतच, उलट वाढले. त्याचा वरिष्ठ वर्गांत जन्म झाला आहे व त्याचा उच्च शिक्षण लाभलें आहे तरीहि खालच्या वर्गांतील लोकांचे संसार सुखी व सुंदर करण्यासाठीं तो सदैव धडपडतो, तोच विचार त्याच्या डोक्यांत सदैव चालू राहतो. पूर्वीच्या प्रेसिडेंटांप्रमाणें त्याला भांडवलदार व कारखानदार यांच्या बद्दल फारशीं सहानुभूति नाहीं. भांडवलदार दुसर्‍यांना दारिद्र्यांत लोटून स्वत: मातबर होत असतात. रुझवेल्ट त्यांचा नाहीं. आपल्या भाषणांतून त्यानें स्वार्थान्त माणसांना दयामाया न दाखविण्याचा निश्चय पुन: पुन: जाहीर केला आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel