रुझवेल्ट भांडवलशाहीचा पुरस्कर्ता आहे कीं समाजवादी आहे ? सुप्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ जे. एम्. केनीस एकदां म्हणाला, '' रुझवेल्ट फारच उदात्तपणे बरोबर वागत आहे.''  प्रोफेसर मोले म्हणाला, ''तो फारच उदात्तपणें जहाल हात आहे.''  पण खुद्द रुझवेल्टनेंच एका भाषणांत 'मी मध्यबिंदूच्या जरा डावीकडे झुकणारा आहें' असे म्हटलें. त्याचे प्रतिगामी प्रतिस्पर्धी त्याला शंभरनंबरी समाजवादी म्हणतात व राजकींय हेतूंसाठीं तो भांडवलदाराचा मित्र असल्याचें नुसतें ढोंग करीत आहे असा त्याच्यावर आरोप करतात. पण त्याचे जहाल प्रतिस्पर्धी तो हाडाचा खरा भांडवलशाहीचाच पुरस्कर्ता आहे असेसं म्हणतात. त्याचा सर्व खटाटोप मरणोन्मुख भांडवलशाहीला मरूं न देण्यासाठींच आहे. आपण कोणती बाजू घ्यावी हें रुझवेल्टलाहि निश्चित माहीत नसेल. भांडवलशाही जिवंत राहणें शक्य असल्यास तो तिच्यांत नवीन प्राण ओतील; पण ती मरणारच असल्यास तो तिला पुरावयासहि तयार होईल व नवा प्रयोग करील. आज तरी जपून सावधगिरीनें तो मार्ग पाहत आहे.

दुसर्‍या शब्दांत हेंच सांगावयाचें तर रुझवेल्ट भांडवलशाहीचाहि पुरस्कर्ता नाहीं वा समाजवादीहि नाहीं; तो प्रयोगवादी आहे, फार हुषार सेल्समन आहे. आपल्या धोरणाला चालना कशी मिळेल, आपली धोरणें कशीं खपतील हें तो छान जाणतो. कायदेमंडळांत व जनतेसमोर आपली धोरणें मांडून तीं त्याच्या गळीं उतरविण्यांत रुझवेल्टचा हातखंडा आहे. तो पुरोगामी सुधारणा प्रतिगामी भाषेंत मांडतो, जहाल बाबींना सनातनी पोषाख देतो. अनुकूल काळाची व स्थळाची वाट पाहण्यास तो शिकला आहे. तो एकादें नवें बिल एकदम आणीत नाहीं. योग्य वेळीं व योग्य स्थळीं तो तें मांडील. तो पराभवहि खेळाडू वृत्तीनें पत्करतो, पण आपलें घोडें नव्या दमानें पुन: पुढें दामटावयास तो उभा राहतो. थोडक्यांत सांगावयाचें तर आपलें गिर्‍हाईक कसें खुष ठेवावें हें त्याला नीट माहीत आहे. आणि गिर्‍हाईकाला-युनायटेड स्टेट्स्मधील सर्व जनतेला-खुष, राजी ठेवण्यासाठीं रुझवेल्ट आपल्या अव्यवस्थित आर्थिक व सामाजिक रचनेंत चतुर्विध सुधारणा करूं पाहत आहे :-

(१)  कारखानदारांनाहि योग्य नफा देणें, (२) शेतकर्‍यांची चणचण दूर करणें, त्यांच्या गरजा भागविणें, (३) कामगारांना कमी तासांचा आठवडा व अधिक मजुरी देवविणें, (४) धंदेवाईकांस प्रामाणिकपणें उदरनिर्वाह चालवितां येईल अशी भरपूर, पुरेशी संधि देणें.

राष्ट्रव्यापी न्यायस्थापनेचा हा नवा प्रयोग आहे. याला नवें अनुरूप नांव अजून मिळालेलें नाहीं; कोणी त्याला नियमित, नियंत्रित केलेला भांडवलवाद म्हणतात, तर कोणी त्याला संयमी लोकशाही म्हणतात. कोणी त्याला गिल्डसोशॅलिझमहि म्हणतात. रुझवेल्टनें स्वत: या प्रयोगाला 'सदनशीर आर्थिक व्यवस्था' असें नांव दिलें आहे. कदाचित् 'समाजवादी भांडवलशाही' हें नांवहि त्याला शोभेल. पण नांवाशीं खरोखरी काय करावयाचें आहे ? हेतूचेंच महत्त्व खरें. रुझवेल्टचा सामाजिक प्रयोग व लेनिनचा साम्यवादी कम्युनिस्ट प्रयोग हे दोन्ही या आपल्या अंधार्‍या शतकांतले दोन मार्गदर्शक दीपस्तंभच होत. या दोहोंत अमेरिकन प्रयोगच अधिक उदात्त व हिंसेवर आधारलेला नसल्यामुळें यशस्वी होण्याची अधिक शक्यता असलेला असा आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel