एक मुलगा : नको. रेतीवर झोंपू. परंतु वारा येऊं दे. तारे दिसूं देत. आंत जीव गुदमरतो.

शिपाई : स्वराज्यांतील तुरुंगांत तसें करतील हो. पीळ द्या.

एक मुलगा : माझी बंडी किती फाटली आहे. बदलून द्या ना ?

शिपाई : घरीं भिकार्‍या फाटकी बंडी तरी मिळत होती का ? बाजीरावाची मिजास आहे तुझी.

वसंता : मुलें पाहिलीं कीं आनंद होतो.

वेदपुरुष : परंतु या उडणार्‍या पांखरांचे पंख येथें तोडण्यांत आले आहेत. निर्मळ कळ्यांना येथें कीड लागते.

वसंता : या मुलांचे गुन्हे तरी काय होते ?

वेदपुरुष
: कसले गुन्हे ? एकानें हॉटेलमधून पाव चोरला, दुसर्‍यानें बाजाराच्या दिवशीं ऊंस लांबविला. तो पलीकडे किडकिडीत उंचसा मुलगा आहे ना ? त्यानें एकाचीं दोन पुस्तकें चोरलीं होतीं! त्या लहान मुलानें एका श्रीमंताच्या मुलाची बॅट पळवून नेली होती. हे का गुन्हे आहेत ? कोण म्हणेल यांना गुन्हे ?

वसंता : जगांत सारा उलटा न्याय आहे. गरिबांच्या मुलांना खेळ नाहीं, खाऊ नाहीं, पुस्तक नाहीं, चित्र नाही; त्यांनी काय करावें ? त्यांना इतरांच मत्सर कां वाटूं नये ? इतरांप्रमाणें आपणांजवळ असावें असें त्यांना कां वाटणार नाही ? परंतु त्यांना असें वाटणें म्हणजे गुन्हा ठरतो.

वेदपुरुष : श्रीमंत मुलांच्या वस्तूला गरिबाच्या मुलानें हात लाविला तरी तो गुन्हा ठरत असतो. जणूं त्या वस्तू विटाळतात! हीं मुलें तुरुंगांतून बाहेर जातांना दुर्गुणांची माहेरघरें होऊन जातील. सार्‍या  वाईट संवयी जडून जातील !

वसंता : त्या मुलाच्या डोळ्यांना कां बरें पाणी येत आहे ?

वेदपुरुष : त्याला घरची आठवण आली असेल. भावाबहिणींची, आईबापांची आठवण आली असेल. लहान पोरगा !

वसंता : तुरुंगांत डोळ्यांना पाणी आल्याशिवाय दिवस जात नसेल !

वेदपुरुष
: तुरुंगांत जो रडणार नाहीं, त्याला मुक्त म्हणावें वा पशु म्हणावें.

वसंता : ते कमिटी कमिटी काय म्हणत होते मघां ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel