यामुळे आपल्या जीवनांत सर्वत्र धर्म भरून राहिला होता. संयमाचा अभ्यास प्रत्येकास करावा लागे. यावरुन एक गोष्ट आपल्या ध्यानांत येईल कीं, भिन्नभिन्न संस्कृतींत जीवन निरनिराळ्या स्वरुपाचें असते. एका संस्कृतींत राजकीय संस्थेला जें स्थान तेंच दुस-या संस्कृतींत असेल असे नाही. लोकहिताची जबाबदारी ज्या संस्थेवर तेथें राष्ट्राचें हृदय उडत असतें. तेथें घाव पडेल तर तो वर्मीं पडला असें होऊन समाज निर्जीव होईल; राष्ट्रास प्रेतकळा येईल. इंग्लंडमध्यें सरकार ही संस्था मुख्य. तर आपल्याकडे समाज ही संस्था मुख्य. इंग्लंड वांचविणें म्हणजे इंग्लंडमधील सरकार वाचविणें. हिंदुस्थान वांचविणे म्हणजे आमची समाजाची घडी वांचविणे. इंग्लंडमध्ये म्हणून सरकार अत्यंत दक्ष राहते. आणि इंग्रजांनी हिंदुस्थानांत काढलेल्या शाळांत शिकून आपलीही अशी समजूत होत आहे कीं बेफिकीर असणा-या येथील सरकारी अंमलदारांस मधूनमधून जागें करणे एवढेंच हिंदी माणसाचें काम ! परन्तु दुस-याला औषध पाजून माझा रोग हटणार नाही. ही साधी गोष्टहि न कळण्याइतकी आपला केविलवाणी स्थिति आज झाली आहे.
चर्चेची व वादविवादाची आपणांस फार हौस. परन्तु चर्चेनें पाऊले पुढे पडेल असें मात्र नाही. इंग्लंडमधील सरकार आज कित्येक वर्षे उत्क्रान्त होत आहे. लोकांच्या सदिच्छेवर ते चालले आहे, वादविवादानें त्यांच्या स्थितीप्रत आपण पोंचू शकणार नाही. आपल्या देशांतील हल्लींच्या सरकारचा आपल्या सामाजिक रचनेशीं यात्किचिंतही संबंध नाहीं. अशा या परकी सरकारापासून आपण जितके जितके अपेक्षूं, तितकें स्वातंत्र्याचें मोल आपणांस दिलें पाहिजे. जितकी त्याच्यापासून अपेक्षा करूं तितके त्याचे गुलाम होऊं. ज्या ज्या गोष्टी सरकारनें कराव्या असें आपण म्हणूं त्या करण्याची आपली शक्ती आपण गमावून बसूं. आणि जी दुर्बलता पूर्वी आपल्या समाजांत नव्हती ती आपल्या अंगीं येऊन बसेल. केवळ सरकारच्या तोंडाकडे पाहणारे आपण होऊं.
पूर्वी मोंगल अमदानींत बादशहा अनेकांना सरदार बनवी, त्यांना पदव्या, सरंजाम देई. परन्तु या दरबारी मानपानाने सरदारांचे समाधान होत नसे. ज्या समाजांत आपण जन्मलों त्या समाजानें आपणांस शाबासकी द्यावी असें त्यांना वाटे मोठ्यांतला मोठा मान दिल्लीच्या दरबाराक़डून मिळणारा नव्हे तर माझ्या समाजाकडून मिळणारा, हें तो ओळखी. तो मान मिळवण्यासाठी आपल्या जन्मग्रामांतील चंद्रमौळी झोपड्यांसमोर येऊन त्याला उभे राहावे लागे. दिल्लीदरबाराचा मान मिळाला, परन्तु खजनांनीं जर उपेक्षा केली तर ते सरदार खट्टू होत. बादशहा त्यांचा सम्राट् नव्हता, स्वदेशी समाज हा त्यांचा खरा सम्राट होता. समाजाकडून मिळालेला स्तुतीचा एक शब्द बादशहाच्या पदकांपेक्षां त्यांना सहस्त्रपट अधिक मोलाचा वाटे. स्वजनांनी कौतुक केले तर त्यांच्या अंगावर मूठभर मांस चढे. राजधानींतील वैभवानें ते आपल्या जन्मग्रामांस विसरत नसत. स्वतःच्या समाजाबद्दलच्या प्रेममय व कर्तव्यमय भावना ते हृदयांशी धरून ठेवित. त्यामुळे खेडी कधीं कंगाल झाली नाहींत. पाण्याचें दुर्मिळ पडले नाही. खेड्यांतील जीवनयात्रेंत मानवी संस्कृतीची सर्व अंगे दिसून येत असत.
परन्तु आज परिस्थिति पालटली आहे. आज स्वजनांनी केलेल्या गौरवाचें महत्त्व आपणास वाटत नाहीं. आज परकी सरकारनें दिलेल्या पदव्या आपणांस भूषणाच्या वाटतात. स्वजनांच्या स्तुतीची मला पर्वा नाही. म्हणून त्यांच्या सेवेतहि मी रमत नाही. आज सरकार आम्हांस अमुक करा, तमुक करा असे सांगतें. आपण होऊन स्वजनसेवेच्या गोष्टी आपल्या शिरावर आनंदाने घ्यावा असें आपणांस वाटत नाही. या गोष्टी सहजपणें करावयास लावणारी ती पूर्वीची स्फूर्ती, तो बंधुभाव, सारें आज लोपलें. स्वजनसेवेचा जन्मसिद्ध हक्क आज गो-या माणसाला आपण विकला आहे.
माझ्या म्हणण्याचा गैरसमज नका करूं. प्रत्येकानें खेड्यालाच चिकटून बसावें, ज्ञानासाठीं वा कीर्तीसाठीं बाहेर जाऊं नये, असें नाही मी म्हणत. आज आपल्या लहानश्या घरट्यांतून आपण बाहेर ओढले गेलों आहोंत. आपली बुद्धि जागृत झाली आहे. चौफेर आपण दृष्टी ठेवूं लागलो आहोंत. विचार वाढत आहे. कार्यक्षेत्रें वाढून मनाचा विकास होत आहे. हे सारे ठीक. ज्या परिस्थितीमुळे हें होत आहे तिचे ते उपकारच आहेत. परन्तु यामुळें आपल्या सामाजिक संबंधाची उलटापालट होतां कामा नये. कितीही झालें तरी बाहेरचें तें बाहेरचें व घरचें तें घरचें. मनुष्य कमावण्यासाठीं बाहेर जातो. परन्तु तो घर विसरत नाहीं. आपल्या बुद्धीच्या शक्तीचा उत्कृष्ट उपयोग व्हावा म्हणून आपण स्वतःशी सदैव प्रामाणिक असले पाहिजे.