‘बापाच्या इस्टेटीत भागीदार होतो. बापाच्या पापातही मुलगा भागीदार नाही का? ज्याने मला मारले, पाडले, शिव्या दिल्या, ज्याने माझी बेअब्रू केली, त्याच्या कुटुंबातील कोणाशीही संबंध नको. समजलीस ना?’
‘बाबा, मंगा मला आवडतो.’
‘ती आवड मनात ठेव.’
आणखी काही दिवस गेले.
एके दिवशी मधुरी सायंकाळी बाहेर गेली होती. कोठे गेली होती? समुद्रावर. ती समुद्रकाठी उभी होती. तिच्या मनात काय आले, एकाएकी ती आजीबाईच्या खानावळीत गेली. आजीबाई चुलीशी शेकत बसली होती.
‘कोण मधुरी? ये किती दिवसांनी दिसलीस? आणि तुझे सवंगडी कोठे आहेत?’
‘आजी, आता मधुरी एकटी आहे. ना सोबती, ना सवंगडी.’
मधुरी म्हातारीजवळ बसली. म्हातारीने तिच्या केसांवरुन हात फिरविला. मधुरीच्या डोळयांत पाणी आले.
‘मधुरी, डोळयांत पाणी का?’
‘आजी, मनातील सारे कोणाला मिळाले आहे? बाबा म्हणतात मंगाला विसरुन जा. मी कशी विसरु मंगाला? माझ्या नसानसांत तो भरलेला आहे.’
‘तुझा मंगा तुला मिळेल.’
‘आजीचे शब्द खरे ठरोत.’
‘इतक्यात दारात कोण होत उभे? कोणीतरी येऊन उभे राहिले होते. ते उभे असलेले माणूस पुढे आले.
‘मंगा, तू रे केव्हा आलास?’
‘आलो तुमच्या गुजगोष्टी ऐकायला. मधुरी, टेकडीवर येतेस? चल बसू. हसू.’
‘बसू. डोळयांत आणू आसू.’
‘तुझे आसू मी नका पुसू?’
‘हा घ्या खाऊ. तोंड गोड करा- म्हातारी म्हणाली.
मधुरीचा हात धरुन मंगा निघाला. दोघे टेकडीवर आली. आता रात्र झाली होती. चंद्र उगवला होता. फार सुंदर दिसत होता देखावा.
‘मधुरी, किती वर्षांनी या टेकडीवर पुन्हा बसलो आहोत!’
‘त्या वेळी लहान होतो.’
‘आज मोठी आहोत.’