‘तू त्याच्याकडे गेली होतीस की तो तुझ्याकडे आला होता?’
‘मीच त्याच्याकडे गेल्ये होते.’
‘मला न सांगता?’
‘मंगा, मला का इतकेही स्वातंत्र्य नाही! माझ्यावर का तुझा विश्वास नाही! जर माझ्यावर विश्वास नसेल, तर काय करावयाचे ते प्रेम! प्रेम संपूर्ण विश्वास टाकते.’
‘का गेली होतीस? भीक मागायला?’
‘नाही.’
‘मग कशाला?’
‘बुधा आजारी आहे असे कळले म्हणून त्याला पाहून आल्ये.’
‘काय बोललीस त्याच्याजवळ?’
‘त्याला दोन समाधानाच्या गोष्टी सांगितल्या.’
‘तो काय म्हणाला?’
म्हणाला, ‘माझ्याजवळून अधून मधून नेणार असशील तर मी समाधानाने जगेन, तू तिकडे कष्ट काढीत असता मी का माडीत सुखाने नांदू?’
‘तू काय म्हणालीस?’
मी म्हटले, मदतीची जरुर नाही. त्याला धीर देऊन मी आल्ये. मी परत यायला निघाले तेव्हा तो म्हणाला, मधुरी, थांब; तुला एक गोष्ट सांगतो. मी थांबले आणि त्याने ती गोष्ट सांगितली. मंगा तुला सांगितली नाही. रागावू नकोस.’
‘मधुरी!’
‘काय मंगा?’
‘मी तुला खरोखरी आवडतो का? अद्यापही आवडतो का?
‘आता कशाने खात्री पटवू मंगा? फाडू का हे हृदय? तुझ्या नखांनी फाड व बघ आत डोकावून. वेडा! तू माझाच आहेस हो. कसाही अस. गरीब अस, राकट अस, उतावळा अस. मला आवडतोस. तू पडून राहा. आता शांतपणे झोप.’
‘थोपट मला.’
‘मंगा, तू लहान का?’
‘आज टेकडीवर मी पुन्हा लहान झालो होतो. घसरगुंडी खेळलो. पुन्हा लहानपणातल्याप्रमाणे वाळूत किल्ले बांधावे असे मला वाटत होते. आज तेथे बुधाही भेटला.’
‘काय म्हणाला.’
‘तुझी त्याने चौकशी केली.’
‘तू त्याला काही वेडेवाकडे बोलला नाहीस ना?’