‘माझ्या मधुरीला मी काय काय तरी आणीन.’
‘मंगा, तू आजपर्यंत जे दिलेस त्याहून का ते अधिक मोलवान असेत? अधिक किंमतीचे असेल? अधिक हृदयापाशी धरण्याच्या लायक असेल? पण आण हो. जंमती जंमती आण. मग मंगाची मी खरी राणी होईन, काळीसावळी राणी.’
‘चल आता आत. गार वारा सुटला आहे.’
‘येथेच बसू. तुझ्या प्रेमाची ऊब मिळत आहे.’
शेवटी दोघे घरात गेली. पिले झोपली होती.
‘बघ कशी निजली आहेत पाखरे. गोड आहेत माझी पाखरे!’
‘खरेच हो.’ मंगा म्हणाला.
दोघे किती वेळ तशीच मुलांजवळ बसली होती आणि हळूहळू झोपी गेली. मधुरी लौकर उठली. स्वयंपाक करावयाचा होता. ती काम करीत होती. मंगाही उठून आला.
‘मधुरी, आज फार गार आहे नाही! कशाला उठलीस इतक्या लौकर!’
‘मंगाची भाकर भाजायला.’
‘चल जरा पडू. चल मधुरी.’
‘नको आता. पाखरे किलबिल करू लागली हो.’
‘पण आपली पाखरे झोपली आहेत. चल मधुरी.’
‘नको आता.’
‘हे ग काय!’
आणि त्याने तिला नेले. मुले जागी झाली.
‘बाबा, झाली वेळ!’
‘नीज, अजून अवकाश आहे.’
‘मला नाही झोप येत. मी तुमच्याजवळ येतो. मला थोपटा.’
सोन्या मंगाजवळ आला. तो बापाच्या मांडीवर डोके टेकून पडला. मंगा थोपटू लागला आणि रुपल्या उठला तोही आला. त्यालाही बाप थोपटू लागला.
‘मंगा, मी जाते. आटोपायला हवे सारे.’
असे म्हणून मंगाच्या खांद्याला चिमटा घेऊन मधुरी गेली. उजाडले आता. प्रकाश आला. अंगणात फुले फुलली होती. मनीला घेऊन मंगा हिंडत होता. मनीच्या केसांत फुले अडकवीत होता; आणि त्याने एक गुलाबाचे फूल तोडले. सुंदर घवघवीत फूल. घरात येऊन त्याने मधुरीच्या केसांत घातले. तो पाहात राहिला.