‘बुधा, माझे नाही हो भाग्य आजारी पडून मरायचे. दु:खे भोगण्यासाठी मला जगायचे आहे.’
‘या मुलांना वाढविण्यासाठी तू नको का? आणि मंगा आशेने येईल, त्याच्यासाठी नको का जगायला? आणि मला दुरून तुझा ओलावा मिळावा म्हणून तू नाही का जगणार? आणि मधुरी, तू प्रकृतीस जपले पाहिजेस. तू कशी होतीस, कशी झालीस? तुझे डोळे, गाल बसले. हसणे निघून गेले. मधुरी, असे नको करू. मी मदत देईन. पैसे देतो. दूध घेत जा. नीट जेवत जा. माझा का तुझ्यावर थोडाही हक्क नाही? मी का केवळ परका? तुझ्या हृदयात, तुझ्या जीवनाच्या बागेत मीही एक घरटे बांधलेले होते. नाही का?’

‘काय सांगू बुधा?’
‘मी येऊ का रात्री सोबत? मी सोन्याजवळ बसेन. तू झोप. सोन्याला बरे वाटेपर्यंत येईन. त्याचा ताप निघू दे. घाम निघू दे. मग नाही येणार; येऊ का?’
‘मी काय सांगू?’
‘मग कोण सांगणार?'
‘तुला बरे वाटेल, बरे दिसेल तसे कर.’

‘बुधा!’
‘काय मधुरी? घुटमळू नकोस.’
‘दिवसा येत जा, तुला नसेलच रहावत तर. रात्री मला काय उद्योग आहे? दिवसा ये. मला चुलीजवळ बसावे लागते. धुणी धुवावी लागतात. सोन्याजवळ तू बसत जा. चालेल?’

‘रात्रीही आलो म्हणून काय बिघडले?’
‘लोक आहेत हो बुधा.’
‘तुझे मन निष्पाप आहे ना!’

‘बुधा, नकोच पण दिवसाही नको येऊ. ते बरे नाही. एखादे वेळेस समाचाराला येत जा. रागावू नकोस बुधा. काय रे बुधा, तुला ते भूत अद्याप दिसते का रे!’
‘आता नाही दिसत. मी खिडकीत उभा राहतो, परंतु दिसत नाही.’
‘भुताची इच्छा का पूर्ण झाली!’

‘कोणती असेल इच्छा!
‘माझा सूड घेण्याची.
‘तुझा सूड!
‘हो. मी तुझ्याजवळ लग्न करायचे नाकारले. तू दु:खी झालास, तुझे आईबाप मेले. म्हणून माझा सूड.’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel