‘चल मधुरी.’ बुधाने हाक मारली.
मधुरी गेली. बुधा गेला. थोडया वेळाने त्याने डोक्यावरील पांघरूण काढले.
‘घाम आला वाटते?’ म्हातारीने विचारले.
‘नाही. परंतु वरची ती घोंगडी काढा. जड वाटते ती.’ तो म्हणाला. म्हातारीने घोंगडी काढली.
मघा मधुरी आली होती.
‘ती तुमच्या गोष्टीतील मधुरी?’
‘हो. तिने फळे आणून दिली. काल तिला सांगितले होते. तुमची गोधडी तिला आवडली.’
‘ही गोधडी?’
‘हो. तिने हात लावला.’
आजीबाई, ती गोधडी माझी नाही. माझ्या गावच्या समुद्रतीराला ती वहात येऊन पडली होती. मी ती घरी नेली, धुतली व वापरू लागलो. फुटले असेल गलबत. कोणा मुशाफराची. मला ती उपयोगी पडत आहे, एवढे खरे.’
‘बोलू नका फार. थकवा येईल.’
आणि मंगा पडून राहिला. मधुरी आली त्या वेळेस तिच्याकडे पहावे असे कितीदा त्याच्या मनात आले. डोक्यावरून पांघरूण काढावे, मधुरीचे हात हातात घ्यावे, तिच्या मांडीवर डोके ठेवावे असे विचार किती आले; परंतु ते त्याने दडवून ठेवले. त्याने चलबिचल होऊ दिली नाही.
सायंकाळ झाली होती. मधुरी व बुधा घरी परत जात होती. ती म्हणाली, ‘बुधा, तू जा घरी मोतीला घेऊन. मी आजीकडून जाऊन येते.’
‘लौकर ये हो, नाही तर मी पहायला येईन.’ तो म्हणाला.
‘मी इकडेच राहणार असे वाटते?’ ती म्हणाली.
‘बसशील पुन्हा टेकडीवर जाऊन, शिरशील पाण्यात.’ तो म्हणाला.
‘तुझेही बंध आहेत हो मला. मुलांचे बंध आहेत. कोठे जाईल मधुरी? मधुरी तुम्हां सर्वांची कैदी आहे. जा तू. मी लौकरच येईन.’
बुधा गेला व मधुरी झोपडीकडे आली.
‘आजी, कसे आहे त्यांचे?’
‘पडून आहे. त्याच्या घरच्या आठवणी येतात. रडतो. त्याला वाटते की आपण मरणार. काल मरणाच्याच गोष्टी बोलत होता.’
‘आता झोप लागली आहे?’
‘असे वाटते?'