बुधा गेला. मधुरीने दार लावून घेतले. ती पडून राहिली. जणू मंगाच्या बाहुपाशात आपण आहोत असे तिला वाटे. ती त्या गोधडीची घडी करी व त्यावर डोके ठेवी. जणू मंगाच्या मांडीवरच डोके आहे. ती गोधडी शरीर फोडून आत भरावी, असे तिला वाटे. वेडी मधुरी! आणि एकदम थरारून ती उभी राहिली. मंगा आला असे तिला वाटले. येईल का मंगा? तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि आला तर? आला तर? तो काय म्हणेल? मधुरीवर रागावेल का? नाही रागावणार. मधुरी वाईट नाही. माझी ओढाताण तो जाणील. बुधा आमचा लहानपणाचा मित्र. आम्ही तिघे निराळी नाही; आम्ही तिघे एका बेलाचे त्रिफळ. पवित्र त्रिदळ. मधुरी पुन्हा ती गोधडी पांघरून पडून राहिली.
आणि इकडे मंगा शतविचारात दंग होता. मधुरी गोधडी पांघरून बसली असेल. माझ्या विचारात रंगली असेल. मला विसरली नाही. मधुरी. माझी मधुरी. अद्याप मी तिच्या जीवनात आहे. इत्यादी विचार तो करीत होता आणि ताप वाढत होता. तो गुपचूप पडून राहिला.
‘फार आहे ताप.’ म्हातारी म्हणाली.
मंगाने डोळे भरून तिच्याकडे पाहिले. बोलेना. त्याला बोलवत का नव्हते? की आपण बोलू लागलो म्हणजे भडभड सारे ओकून टाकू अशी त्याला भीती वाटे? तो बोलत नव्हता ही गोष्ट खरी.
दोन दिवस असेच गेले. आणि मग एके दिवशी तिसरे प्रहरी तो फार अशान्त व अस्वस्थ होता. म्हातारीही जरा घाबरली.
‘काय होते?’ तिने विचारले.
‘काय सांगू?’ तो म्हणाला.
त्याने म्हातारीकडे टक लावली. म्हातारीही पाहू लागली. कोणी बोलत नव्हते.
‘काय हवे? असे काय पाहता?'
‘काय सांगू? काय सांगू?’ एवढेच तो म्हणाला.
पुन्हा डोळे मिटून पडला. पुन्हा डोळे उघडले. म्हातारीकडे टक लावून पाहू लागला.
‘आजीबाई!’
‘काय?’
‘मी कोण?’
‘मला काय माहीत? सध्या तरी माझ्या घरातले आहात. सारे बरे होईल.’
‘मला ओळख आजी. ओळख, नीट बघ.’
‘तू का ओळखीचा आहेस माझ्या?’
‘हो. तुझा मी मंगा. आजी, तुम्हां सर्वांचा मी मंगा.’
‘मंगा? तूच मंगा?’