''बाबा, तुम्ही चालवा गाडी. मी येथे जरा अशी यांना धरून बसते. नाही तर पडायचे खाली. तुम्हाला तर येथे बसून यांना धरता येणार नाही. मी अशी खाली बसून धरून ठेवते. बाबा, लवकर न्या हं गाडी.'' मिनी म्हणाली.

श्रीनिवासराव गाडी चालवू लागले. बाणासारखी गाडी निघाली. मिनी संन्याशाचा हात हातांत धरून बसली होती. तो सुंदर हात ती आपल्या खालीवर होणार्‍या वक्षःस्थलाला शांत करण्यासाठी तेथे घट्ट धरून ठेवी. मध्येच त्या प्रशांत निर्विकार मुखचंद्राकडे ती बघे व स्वतःची नेत्रकमळे ती मिटून घेई; जणू ती तन्मय होई.

बागेतील फुलांचा वास येत होता. रोज असा येत असे का? पिता म्हणे, रोज असा येतो. परंतु मिनीला आजच त्याचा अनुभव आला होता. गोड गुंगवून टाकणारा वास.

गाडी आली. श्रीनिवासराव गडयांना हाक मारणार होते, परंतु मिनी म्हणाली, ''आपणच यांना उचलून नेऊ. संन्याशाच्या अंगाला दुसर्‍यांचे कशाला हात?''

''परंतु आधी एक अंथरूण तयार करायला हवं.''

''खाट का हवी? तुमची ती रिकामी पडलेली जुनी खाट आणू? तुम्ही तर खाली निजता? आणू काढून?''मिनीने विचारले.

''ती खाट नको.'' ते गंभीरपणे म्हणाले.

''मग माझी खाट आहे. मी खाली निजेन. अंथरूणसुध्दा केलंच आहे. स्वच्छ आहे. चला, आणू त्यांना व त्या गादीवर ठेवू.'' मिनी म्हणाली.
''संन्यासी गादीवर का ठेवायचा?''

''बाबा, ही का चर्चेची वेळ? आजार्‍याला सारं क्षम्य आहे.'' ती म्हणाली.

त्या दोघांनी त्या संन्याशाला उचलून आणले व त्या खाटेवर त्याला निजवले.

''बाबा, त्यांची भगवी वस्त्रं आपण काढून ठेवू या. तुमचे एक धोतर यांना नेसवू. तुमचा सदरा अंगात घालू. ही भगवी वस्त्रं जाडी आहेत. भरभरीत आहेत. मळली आहेत. यांना शुध्दही नाही. शुध्दीवर आल्यावर जर म्हणतील तर पुन्हा देऊ ती वस्त्रं.'' मिनी म्हणाली.

श्रीनिवासराव काही बोलले नाहीत. मिनीने संन्याशाला सासांरिक बनविले. स्वच्छ सदर्‍यावर तिने बाबांसाठी केलेली लोकरीची बंडी घातली. भगवी वस्त्रे तिने आपल्या ट्रंकेत लपवून ठेवली. त्या संन्याश्याच्या अंगावर तिने आपली शाल घातली व त्याच्यावर जाडसे पांघरूण घातले.

''बाबा, तुम्ही डॉक्टरला बोलवा, जा. संन्यासी वगैरे सांगू नका. एक मनुष्य पडलेला उचलून आणला आहे, एवढेच सांगा. जा बाबा. मोटार घेऊन जा.'' मिनीने सांगितले.

श्रीनिवासराव मोटार घेऊन गेले. आता गडीमाणसे जागी झाली. मिनीने गडयाला स्टोव्ह पेटवायला सांगितले. पाणी तापविण्यात आले. रबराची पिशवी गरम पाण्याने भरण्यात आली. मिनी त्या संन्याशाची छाती शेकत बसली.

हाताने तिने पिशवी धरली होती; डोळयांनी त्या संन्याशाचे मुखकमल ती पाहत होती. किती सुंदर उदार चेहरा. गोड होता तो चेहरा. या तोंडाला गोड हा एकच शब्द लावावा. त्या एका विशेषणात सारे वर्णन येऊन जात होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel