मीनाच्या वडिलांजवळ संन्यासी बोलत होता. बोलता-बोलता तो म्हणाला, ''आता मला जाऊ दे.''
''येथून तुम्ही जाऊ नका. तुम्ही आमचे व्हा.'' मिनीचे वडील म्हणाले.
''मी तुमचाच आहे, कोठेही गेलो तरी तुमचाच आहे. तुम्ही मला मरणातून वाचविलं. तुमचे उपकार मी विसरणार नाही.'' तो म्हणाला.
''तुम्ही जाऊ नका. तुम्ही मिनीचे व्हा. माझी चिंता दूर करा. तुम्ही गेलात तर मिनी क्षणभरही जिवंत राहणार नाही.'' ते म्हणाले.
''अशक्य आहे मी राहणं. क्षमा करा, मला गेलंच पाहिजे. मी व्रतबध्द आहे.'' असे म्हणून तो तरुण संन्यासी उठून गेला.
''हे पाहा माझं सूत सारखं तुटतं. अद्याप नीट जमत नाही.'' मीना त्या तरुणाला म्हणाली.
''फार पीळ दिला म्हणजे तुटतं. फार मोकळं नको, फार पीळ नको.'' तो म्हणाला.
''अखंड सूत माझ्या हातून कधी निघेल?'' तिने विचारले.
''हृदय शांत राहील तेव्हा.'' तो म्हणाला.
''हृदय कशानं शांत होतं?'' तिने प्रश्न केला.
''निरंहकार होऊन दुःखितांची सेवा करण्यानं.'' तो म्हणाला.
''मी दुःखी आहे. मला करणार का तुम्ही सुखी?'' तिने विचारले.
''मिने, मीही कष्टी आहे. आपण आपापली दुःखं गरिबांची सेवा करण्यात विसरू या.'' तो म्हणाला.
''गरिबांची सेवा कशी करावी, ते दाखवायसही सोबती हवा.'' ती म्हणाली.
''हृदयस्थ परमेश्वर हा अचूक सोबती. बाकी सारे चुकणारे, पडणारे व पाडणारे.'' तो म्हणाला.
मिनी सूत कातीत होती, परंतु तिचे नेत्र एकदम भरून आले. भरलेल्या नेत्रांनी तिने वर पाहिले तो तेथेही भरलेले सप्तसागर दिसले. भावनांचा चरखा वेगाने फिरत होता. अश्रूंचे अखंड सूत निघत होते. त्यातून हृदयैक्याचे मंगल व सुंदर वस्त्र विणले जात होते.
बाहेर बरीच रात्र अद्याप होती. तरीही उमलू पाहणार्या फुलांचा गोड वास येत होता. तो वास उन्मादकारी नव्हता. प्रशांत करणारा होता. तो तरुण उठला. शांतपणे बाहेर पडला. आज समोर धुके नव्हते. पहाटेचे प्रशांत तारे वर होते. झपझप पावले टाकीत तो तरुण निघून गेला. विशाल भारताचा सेवेकरी, विशाला दृष्टीने, विशाला हृदयाने निघून गेला.
मिनी जागी झाली. नित्याप्रमाणे हृदयदेवाचे दर्शन घेण्यासाठी ती गेली. तो तेथे कोण होते? अंथरूण नीट गुंडाळून ठेवलेले होते. मिनी चमकली. ती स्तब्ध उभी राहिली. तेथे एक चिठी होती -
''मिने, जातो, मला जाऊ दे-क्षमा कर. तुझा...''
मिनीने ते अंथरूण उघडले. त्यात सर्वकाही होते, परंतु तिची शाल नव्हती. तो तरुण ती शाल पांघरूण निघून गेला. मिनीला त्याने सोडले, परंतु तिची शाल घेऊन गेला. काय त्याचा अर्थ? त्याचा अनंत अर्थ होता व मिनी तो अर्थ समजली.
मिनी तेथे खाटेवर अश्रुसिंचन करीत बसली. ती स्तब्ध होती. पिता आला. तो सारे उमगला.
''मिने !'' त्याने सद्गदितपणे हाक मारली.
''कोठे गेले ते बाबा?''तिने विचारले.
''देवाला माहीत. बाळ, उगी.'' तो म्हणाला.