''किती आहे खादी शिल्लक?'' रामदासने प्रश्न केला.
''असेल पाचशे रुपयांची'' दयारामने उत्तर दिले.
''मी सारी विकत घेतली. उद्या बाया येतील त्यांना पैसे दे. दरिद्री नारायणाची दिवाळी होऊ दे.'' रामदास म्हणाला.
''रामदास, ही काय थट्टा आहे?'' दयाने प्रश्न केला.
''दया, थट्टेच्या वेळी थट्टा. मी सत्य सांगतो आहे. खादी घेतली. हे तुझ्या हातावर पैसे ठेवतो.'' असे म्हणून नोटांचे पुडके रामदासाने त्याच्या हाती दिले.
दयारामच्या डोळयांतील पाणी त्या नोटांवर पडून त्या पवित्र झाल्या. मित्राचा हात हाती घेऊन दया मुकेपणाने बसला होता. दोघे उठून खाली गेले.
''हिरा, घे हे पैसे. उद्या सूत घे.'' दयाने सांगितले.
''कोणी दिलं?'' त्याने विचारले.
''या शेटजींनी आपली सारी खादी खरेदी केली.'' दया म्हणाला.
''मला शेटजी म्हणू नका. साहेब म्हणू नका. मला भाऊ म्हणा.'' रामदासने सांगितले.
''रामदास, पैसे चोरून का आणलेस?'' पार्थाने विचारले.
''आमच्या पूर्वजांनी दरिद्री नारायणाचे चोरून नेले, ते पुन्हा मी दरिद्री नारायणाला आणून देत आहे. ज्याचा खरा माल त्याला परत देणे का चोरी?'' रामदासने प्रश्न केला.
''आज तरी जगात खरे साव चोर ठरले आहेत व चोरांना खुर्ची, लोड मानसन्मान मिळत आहे.'' दयाराम म्हणाला.
''हे सारं बदलणं म्हणजेच क्रांती. ही सारी उलथापालथ व्हायची आहे. आपण या क्रांतीतील सैनिक.'' पार्थ निश्चयाने म्हणाला.
दुसर्या दिवशी रामदास मुंबईकडे गेला. पंधरा-वीस रुपये त्याच्याजवळ होते. रामपूरला मी कळवीन तेव्हा खादी नीट बांधून पाठवा असे त्याने सांगून ठेवले होते. हिराने मायाबहिणींचे सूत घेतले. सर्वांची आनंदी दिवाळी झाली.
आश्रमाला, खादीला, चरक्या भगवानाला घराघरांतून दुवा मिळाला. रामदास घरी परत आला. परंतु बरोबर काही नव्हते.
''मुंबईहून रिकामासा आलास? पैसे चोरीला नाही ना गेले?'' गोविंदरावांनी विचारले.
''मागून माल येत आहे.'' रामदासने सांगितले.
बैलगाडी आली, खादीचा गठ्ठा उतरविण्यात आला. गाडी परत गेली.
''काय आहे यात भाऊ?'' शांतेने विचारले.
''यात मजा आहे.'' रामदास म्हणाला.
''सायकलसुध्दा का यात आहे?'' पित्याने विचारले.
''सारं यात आहे.'' रामदासने सांगितले.
गाठ सोडण्यात आली. त्यातून शुभ्र खादी बाहेर पडली.
''हे रे काय भाऊ?'' शांतेने विचारले.
''ही गरिबांची हृदयं.''तो म्हणाला.
''पाचशे रुपयांच्या का चिंध्या आणल्यास? गाढव आहेस. बापाला फसविलंस.'' गोविंदराव म्हणाले.