''शांतीचा हट्ट. शिकल्ये बाबा; ते मोठया अक्षरांचं पुस्तक वाचते. गावातील बायांना मोहन शिकवतो. मोहन चांगला आहे मुलगा.'' आई म्हणाली.

''आई, तू लिहायला शिकलीस, अडाणी लोकांना मोहन शिकवू लागला हीच क्रांती. शांतीचं हेच काम.'' रामदास समजवून देवू लागला.

''तिकडे जपून अस बाबा, हजार मैलांवर जाणार तू.'' रामराव म्हणाले. रामदास मोहनलाही भेटला. त्याचा वर्ग त्याने पाहिला.

''मोहन, अभ्यास ठेव. वर्तमानपत्रं वाचीत जा.'' रामदास म्हणाला.

''शांताबाई वर्तमानपत्रं पाठवतात. महत्त्वाच्या मजकुरावर खुणा करून पाठवतात. मी वर्गातही वाचून दाखवतो. बाहेर फळयावर लिहितो.'' मोहनने सांगितले.

''फळयावरचं लोक वाचतात?'' रामदासाने प्रश्न विचारला.

''हो. मुलंमुली वाचतात. म्हातारे सांगतात, 'मोठयानं वाच रे मुलांनो,' विचारांची भूक पेटत आहे.'' मोहन म्हणाला.

''अन्नाच्या भुकेत विचारांची भूक येऊन मिळाली म्हणजे क्रांती होते. साधी अन्नाची भूक भीक निर्माण करते. परंतु विचारांची जोड मिळालेली अन्नाची भूक साम्राज्यं धूळीस मिळविते.'' रामदास भविष्यवाणी बोलत होता.

''आमच्या वर्गात शांताबाईंचा एखादा फोटो लावायला द्या ना पाठवून; त्यांनी येथे प्रकाश आणला.'' मोहन म्हणाला.

''मोहन, फोटो लावायचाच तर या मृत राष्ट्राला जिवंत करणार्‍या लोकमान्यांचा, महात्माजींचा लाव. जगातील श्रमणार्‍यांना नववेद देणार्‍या कार्ल मार्क्सचा लाव. तो वेद रशियात कृतीत आणणार्‍या महात्मा लेनिनचा लाव.'' रामदास म्हणाला.

''आमच्या गावाला नववेद शांताबाईंनी दिला. बायामाणसं, मुलं-मुली शांततेचं स्मरण करतात.'' मोहन म्हणाला.

''बरं, पाहू पुढे. आजूबाजूच्याही गावांना जात जा. तू विचार पेरणारा किसान युवक हो.'' रामदासने सांगितले.

''आमचं तरुण दल सुरू झालं आहे. त्यातून काहीजण शेजारच्या गावी वर्ग चालविण्यासाठी जाणार आहेत. शांताबाईंनी चित्रांचे संग्रह पाठवले आहेत. तेही दाखवीत जाऊ. जगातील किसान, कामगार कसे लढत आहेत ते त्यावरून पटकन ठसतं.'' मोहनने सांगितले.

''कलेची हाक हृदयाला पटकन पोचते. कला पटकन ऐक्य निर्माण करते. एखादं चित्र, एखादं नाव आणि त्यानं सारी राष्ट्रं पेटतात.'' रामदास म्हणाला.

रामदास रामपूरला परत आला. जाण्याची तयारी झाली. अनेक मित्र जमले होते. गोविंदरावांच्या व नव्या आईच्या पाया पडून तो गेला. शांता स्टेशनवर गेली होती. मित्र स्टेशनवर गेले होते. मुकुंदराव व रामदास तेथे उभे होते.

''भाऊ, मोठमोठी पत्रं पाठव. तिकडचे फोटो पाठव.'' शांता म्हणाली.

''तुझा फोटो मोहननं शाळेत लावण्यासाठी मागितला आहे तो आधी पाठव. तेथली तू क्रांती करणारी ना?'' रामदास म्हणाला.

''भाऊ, क्रांती शब्दाचा असा उपहास नको करू.'' शांता म्हणाली.

''क्रांतीचा उपहास करणारा आपला भाऊ आहे असे नको समजू !'' रामदास गंभीर होऊन बोलला.

''रागावलास होय भाऊ?'' तिने कातर स्वरात विचारले.

''नाही ताई; गंमत केली. मी पाठवीन फोटो. गुरुदेवांचा नवीन फोटो घेऊन पाठवीन.'' रामदास म्हणाला.

''तुम्ही, मुकुंदराव लौकर या. फार दिवस आम्हाला इकडे उपाशी ठेऊ नका. पोरकं राखू नका.'' शांतेनं सांगितले.

''मुकुंदराव लवकरच येणार आहेत.'' दयाराम म्हणाला.

गाडीची वेळ झाली. शिट्टी झाली. निघाली गाडी. गाडी एकदम निघाली म्हणजे मुक्कामावर पोचल्याशिवाय थोडीच राहील? निघायचाच अवकाश असतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel