मुकुंदरावांनी एके दिवशी 'भारताची आशा' या विषयावर तेथे इंग्रजीत व्याख्यान दिले. तेथील भावनाप्रधान मंडळी ते व्याख्यान ऐकून मुग्ध झाली. भाषणाचा समारोप तर फारच विलक्षण परिणाम करणारा झाला.

''बंधूंनो, मी काय सांगू, किती सांगू, मला निराशा शिवत नाही. भारताचं भविष्य उज्ज्वल आहे हे तुमच्या डोळयांतील तेजावरून, तोंडावरील भावावरून मला दिसत आहे. परमेश्वर तीन रूपांनी अवतरतो म्हणतात. कधी भिकार्‍याच्या, कधी कवीच्या, कधी योग्याच्या. महात्माजींसारखा महापुरुष, ती यज्ञमूर्ती जेव्हा 'दरिद्री नारायणके वास्ते' असं म्हणून हात पुढे करते, तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वरच समोर हात पसरीत आहे असं वाटतं. आजच्या तोफा-बंदुकांच्या रणधुमाळीत विश्वैकची मुरली वाजविणारे रवींद्रनाथ म्हणजे गोकुळातील सुखाला अंतपार नाही असे करणार्‍या गोपालकृष्णाची आठवण करून देतात आणि आज अडीच तपे पांदेपरीस सर्व इंद्रिय संयम करून बसलेला तो महात्मा अरविंद. त्यांच्या रूपानं योग्यांचा राणा शिवशंकरच अवतरला आहे की काय असं वाटतं. गांधीजी, गुरुदेव व श्री अरविंद यांच्या रूपानं आज परमेश्वरच भारतात वावरत आहे व अणुरेणूला चैतन्यमय करीत आहे असं वाटतं. अशा या भारताला का आशा नाही?''

''तुम्ही बंगालमध्ये जन्मायचं, तिकडे महाराष्ट्रात कशाला जन्मलेत?'' कालीबाबूंनी विचारले. ''बंगाल व महाराष्ट्र एकच आहेत हे सिध्द करण्यासाठी बंगाली हृदय महाराष्ट्राला देण्यासाठी.'' मुकुंदराव म्हणाले.

''भारताच्या ऐक्यावर तुम्ही जोर दिलात ते मला आवडलं. प्रांतिक अभिमान वाढत आहे हे लक्षण बरं नव्हे.'' ते म्हणाले.

''एखादा परप्रांतीय नोकरीसाठी आपल्या प्रांतात आला तर आपणास मत्सर वाटू लागतो. उलट आपणास वाटावे, दूरचा भाऊ जवळ राहायला आला. त्याच्या प्रांतातील सुगंध घेऊन आला. मुंबई-पुण्याला मद्रासी दिसले तर तुम्हांला वाईट वाटतं. गुजरातेत महाराष्ट्रीय गेला तर त्यांना राग येतो. ही भारतीय संस्कृती नव्हे. भारतमाता जगातील इतर देशांचेही पुत्र आले तर म्हणेल, ''या बाळांनो, जगातील आपआपले सुवास, आपआपली संस्कृती घेऊन या. मात्र येथे सत्तेसाठी नका राहू. प्रेमानं नांदा. मिळेल ते सारेजण खा. इंग्रजांना राहू दे इथे. परंतु बंधू म्हणून राहू दे.'' मुकुंदराव म्हणाले.

''किती छान सांगता तुम्ही. मुकुंदराव, महाराष्ट्र संस्कृतीवर एक तुमची व्याख्यानमाला करावी असं मला वाटतं. महाराष्ट्राची आम्हाला ओळख करुन द्या.'' कालीचरण म्हणाले.

''बघू.'' मुकुंदराव म्हणाले.

परंतु पुढे खरेच ती व्याख्यानमाला झाली. अपूर्व झाली ती व्याख्यानमाला. महाराष्ट्र संस्कृती म्हणजे मोक्षसंस्कृती. अंतर्बाह्य मोक्ष देणारी संस्कृती. महाराष्ट्र म्हणजे झगडा, बंड, क्रांती.

रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग
अंतर्बाह्य  जग आणि मन॥


''आत मनातील वासनाविकारांशी झगडा, आत्म्याला देहात कोंडणार्‍या संकुचित वृत्तीबरोबर झगडा; आणि बाहेर नाना रूढींशी; नाना प्रकारच्या गुलामगिरीशी झगडा. महाराष्ट्रीय संत संस्कृतीतील ज्ञान लोकांच्या भाषेत ओतू असे म्हणून बंड पुकारते झाले. जनतेची भाषा तीच खरी जिवंत भाषा. तिच्यातून मृत जनतेला अमृत देता येते असे त्या वयाने लहान परंतु ज्ञानवैराग्याने महान ज्ञानदेवाने सांगितले. महाराष्ट्राला 'मरणाला मारून जा, मृत्यूची भीती सोड' असे संतांनी शिकविले.

'अगा मर हा बोल न साहती । आणि मेलिया तरी रडती ॥''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel