७. मुकुंदरावांची तीर्थयात्रा

''मग काय, नाही राहत येथे? महाराष्ट्रीय संस्कृतीचे भाष्यकार म्हणून आमच्या संस्थेत राहा. तुमच्यासारखी चारित्र्यवान व विचारवंत माणसं, मोठया दृष्टीची, वस्तूच्या अंतरंगात दृष्टी पोचविणारी माणसं संस्थेत असणं म्हणजे संस्थेची कृतार्थता.'' कालीचरण म्हणाले.

''आता येथील वास्तव्य पुरे. संन्याशानं एके ठिकाणी फार राहू नये. एके ठिकाणी राहण्यासाठी देवानं मला निर्मिलं नाही. मी म्हणजे मेघ, वारा, नदी. क्षणभर स्थिरता मानवते. परंतु कायमची स्थिरता मला मारील. जाऊ द्या मला.'' मुकुंदराव म्हणाले.

''विश्वभारतीला तुमची सदैव आठवण राहील. तुमची व्याख्यानं पुस्तकरूपाने प्रसिध्द करणार आहोत. गुरुदेव त्याला दोन शब्द जोडतील. व्याख्यानमालेच्या वेळेस, ते तेथे असते तर नाचले असते. आपल्या विशाल हृदयाशी त्यांनी तुम्हाला धरले असते. विश्वभारतीची स्मृती म्हणून गुरुदेवांचा हा एक भावनामय फोटो तुम्हांला भक्तिपुरस्सर देतो. तो घ्या.'' असे म्हणून कालीबाबूंनी तो सुंदर फोटो दिला. मुकुंदरावांनी त्या फोटोवर मस्तक ठेवले, क्षणभर त्यांनी तो हृदयाशी धरला.

''बरं, मी जातो. येथील पावित्र्य, सुगंध जीवनात भरून घेऊन जातो.'' मुकुंदराव म्हणाले.

मुकुंदराव आपल्या खोलीत गेले. ते बांधाबांध करीत होते. इतक्यात त्यांच्या खोलीत एक मुलगा आला.

''काय रे आशू? आज मी जाणार हं.'' मुकुंदराव म्हणाले.

''इतक्या लौकर का जाता? आम्हाला वाटलं होतं तुम्ही राहाल. परंतु कळलं की जाणार तुम्ही.'' आशू दुःखाने म्हणाला.

''आता रडत नको जाऊ, खेळत जा, नाचत जा.'' मुकुंदरावांनी सांगितले.

''मी येथे कितीदा तरी रडलो असेन. परंतु तुमचं मात्र माझ्या अश्रूंकडे लक्ष गेलं. तुम्ही आईप्रमाणे माझ्या पाठीवरून हात फिरवलात, मला बाहेर खेळायला नेलंत. मी तुम्हांला काय देऊ?'' आशूने विचारले.

''नेहमी आनंदी राहीन, असं वचन दे.'' त्याच्या केसांवरून हात फिरवीत ते म्हणाले.

''राहीन, आनंदी राहीन. डोळयांतून पाणी येऊ लागलं तर तुमची आठवण येऊन एकदम हसेन. हे घ्या चित्रांचे आल्बम. बंगाली चित्रकरांच्या सुंदर चित्रांचा हा संग्रह आहे. मी तुमच्यासाठी हे आणलं आहे.'' आशू म्हणाला.

मुकुंदरावांनी त्या बालमित्राची भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद घेऊन तो निघून गेला.

आज रामदास कोठे आहे, कोठे गुंतला आहे? मुकुंदराव त्याला पाहत होते. शेवटी दूर एका झाडाखाली तो दिसला. तेथे मायाही होती. रामदास एका शिलाखंडावर बसला होता. समोर बसून माया त्याचे चित्र काढीत होती.

''काय चाललं आहे रामदास?'' मुकुंदरावांनी एकदम येऊन विचारले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel