आठ दिवस शांता पडूनच होती. दार लावून ती पडूनच राही. शेजारी भांडी घासणारी येई. ती शांतेला भाकर भाजून देई. शांता थोडी खाई. ताप हळूहळू आपोआप गेला. शांतेला प्रसन्न वाटू लागले. थोडे अन्न जाऊ लागले.
ती पुन्हा शिकायला जाऊ लागली. सारी मुले तिच्याकडे पाहू लागली. शांता निराळी दिसत होती. तिच्या चेहर्यावर एक प्रकारचे परम पवित्र, प्रसन्न तेज होते.
''शांता, हे काय?'' तिचा सोबती म्हणाला.
''जीवनात क्रांती.'' ती म्हणाली.
''अशी वरचेवर क्रांती होऊ लागली तर क्रांतीला अर्थच राहणार नाही.'' तो म्हणाला.
''क्रांती सारखी चालू असते. जगात अमर अशी एकच वस्तू-ती म्हणजे क्रांती. 'इन्किलाब झिंदाबाद !' क्रांती चिरायु असो !' या घोषणेचा हाच अर्थ. क्षणाक्षणाला आपणात क्रांती होत असते.'' ती म्हणाली.
''तोंडावर देवी दिसत नाहीत त्या.'' तो म्हणाला.
''देवी आल्याच नाहीत, तो शेवटी साधा ताप होता.'' ती म्हणाली.
''घरचं कोणी आलं आहे का?'' त्याने विचारले.
''हो.'' ती म्हणाली.
''किती दिवस राहणार?'' त्याने प्रश्न केला.
''कायमच.'' ती म्हणाली.
''बरं झालं.'' तो म्हणाला.
''देवाला दया.'' ती म्हणाली.
शांता आता अभ्यास करी. मन अशांत झाले तर ते शांत करण्यासाठी चरखा चालवी. तिने मोहनला एक सुंदर सुंदर पत्र लिहिले. ते पत्र लिहिताना ती समाधिस्थ झाली होती. त्या पत्रातील तारीख व पत्ता आपणास नको; परंतु हृद्गत आपणास हवे. हे घ्या ते.
प्रिय मोहनराया,
तुझ्या शांतीने तुला किती तरी दिवसांत पत्र लिहिलं नाही. राग नको मानू. मोहन, माझ्यासाठी तू तिकडे काबाडकष्ट करीत आहेस. तुझे ते हात अधिकच ताठर-दाठर झाले असतील. मला ते अधिकच गोड वाटतील. माझ्यासाठी तू गावाचा त्याग केलास, घरादाराचा केलास, आईबापांचा केलास, मित्रमंडळींचा केलास. माझ्यासाठी तू कशाचा त्याग करण्याचं ठेवलं आहेस? माझ्यासाठी तू अपमान सोसलेस, नीतीवर उडवलेले शिंतोडे सहन केलेस. तुझ्या तत्त्वशीलतेला माझे कोटी प्रणाम !
मोहन, अलीकडे किती तरी पत्रं मी तुला रात्री लिहीत बसते. परंतु ती बाहेरच्या पोस्टात टाकता येत नाहीत. अश्रूंच्या शाईने ती मी लिहिते. हृदयाच्या पेटीतच ती मी टाकते. तू नाही तरी माझ्या हृदयातच आहेस ! तू धनगावला का आहेस? नाही. तू माझ्या हृदयातच. 'शांतिनिकेतना'त आहेस. तेथेच मी पत्र टाकते. तुला ती मिळत असतील.