''आम्हा शेतकर्‍यांना कुणी तरी मार्ग दाखविला पाहिजे. मग आम्ही उठू.'' ते शेतकरी म्हणत.

''मुकुंदराव येतील, रामदास येईल, दाखवतील मार्ग.'' दयाराम म्हणे आणि मुकुंदराव आले म्हणून त्या भ्रातृमंडळाला किती आनंद झाला ! जणू पंचप्राणातील एक प्राण आला असे सर्वांना वाटले. सर्वांना प्रकाश आला, नवजीवन मिळाले असे वाटले. दयारामने रामदासाची प्रेमाने चौकशी केली. तिकडील अनुभव ते मित्र विचारीत होते. मुकुंदराव सांगत होते.

शेतकरीही जमू लागले. आसावलेले शेतकरी येऊ-जाऊ लागले. आपली दुःखे ते सांगू लागले. मुकुंदराव मुकाटयाने ऐकून घेत होते.

''दादा, माझं थोडं शेत राहिलं होतं. तेही खाणार सावकार. लिलाव करणार आहे. काय करणार मी बाईमाणूस? दोन लहान मुलं. कोठे जाऊ मी? काय खायला घालू त्यांना?'' एक माऊली येऊन म्हणाली.

''तुम्ही एक वर्षाचं व्याज आधी भरलं पाहिजे होतं. लिलावाचा हुकूम होण्यापूर्वी कलेक्टरकडे अर्ज केला पाहिजे होता.'' मुकुंदराव म्हणाले.

''कोठून देणार दादा व्याज? पोटालासुध्दा नाही हो. मी एकदा जेवते व पोरांना पोसते. अर्ज वगैरे आम्हाला काय माहीत? कधी करावा? कोठे करावा?'' ती म्हणाली.

''ह्या अटी घालणं म्हणजे शेतकर्‍याच्या स्थितीचं अज्ञान दाखविणं होय. शेतकर्‍यांच्या जमिनी खरोखर थोडयाफार तरी राहाव्यात असं पुढार्‍यांस वाटत असतं, तर असल्या अटी त्यांनी घातल्या नसत्या; परंतु अद्याप आमची खरी दया कोणाला येत नाही हेच खरे.'' राघो म्हणाला.

''तो मोतीशेट खादी घालतो, हाताने टकळी चालवतो आणि इकडे सारखे लिलाव करतो. दिला त्याला निवडून. व्याजाचा दर कमी धरावा म्हणून म्हणेल तर शपथ. सारी सोंगढोंगं. खरी कळकळ नाही बघा कोणाला.'' तुळशीराम म्हणाला.

''अरे, आम्ही गरीब सेवकांना उभं केलं असतं तर तुम्ही शेतकर्‍यांनी त्यांना मतं दिली नसतीत. तुम्ही अद्याप जहागिरदार, रावसाहेब, सावकार अशांना मोठं मानता. मग आम्हालाही 'दगडापेक्षा वीट मऊ' म्हणून करावे लागतात मोतीशेटसारखे उभे !'' पार्थ म्हणाला.

''खरं आहे भाऊ तुझं म्हणणं. आम्ही अजून मोटारी वगैरे बघून भुलतो. उद्या दयाराम उभा राहिला तर कोण देणार त्याला मत? म्हणतील तो भिकारडा, त्याला काय द्यायचं मत? आम्ही खुळे आहोत.'' नारायण म्हणाला.

काही करा, पण माझा तुकडा वाचवा. पोरांना राहू दे थोडा आधार. मी तुमच्या पाया पडते.'' ती माता म्हणाली.

''हे पहा आज जरी लिलाव झाला, तरी पुढे ते शेत तुमच्या मुलांना आम्ही परत देववू.'' मुकुंदराव म्हणाले.

''कधी होईल लढा. कधी मिळेल सत्ता?'' तिने विचारले.

''पाच-दहा वर्षांत सारं बदलेल.'' ते म्हणाले.

''देव तुमचं भलं करो. मी सुखानं मरेन. माझ्या मुलांना पुढे मिळेल. आता तर ते लहान आहेत. एक पाच वरसांचा, एक आहे आठ वरसांचा. ते मोठे होतील तेव्हा त्यांना मिळेल त्यांचं शेत. चांगले होईल. देव तुमच्या खटपटीला यश देवो.'' ती माता म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel