''कुंकू लावून झालं. निश्चय करा. पाताळात शेष आहे व त्याच्या डोक्यावर पृथ्वी आहे असे आपण समजतो. तो फणा हलवतो, भूकंप होतो असं म्हणतात. हा कोणता शेष? सात लाख खेडयांत खाली दडपलेला शेतकरी म्हणजे हा शेष? हा खालचा पाताळात दडपलेला किसानांचा कोटयवधी फणांचा शेष जर जागा होईल व जरा फुत्कार करील तर प्रचंड भूकंप होतील. सार्‍या साम्राज्यशाह्या नष्ट होतील. सारे जुलूम जमीनदोस्त होतील. जागे व्हा. स्त्री-पुरुष, मुले-मुली जागे व्हा. इतरांस जागं करा. स्वातंत्र्यदिनाचे दिवशी गाणे गात, झेंडे फडकवीत, दिंडया काढीत एकत्र जमा व स्वतःच्या सामर्थ्याचा प्रत्यय घ्या.''

मुकुंदराव थांबले. गीता येऊन उभी राहिली. ती म्हणाली,''आम्ही बायका मागं नाही राहणार. पोलीस आला तर सांगू, तू आमचा भाऊ. मारू नको दंडा. आम्ही भिणार नाही. पदर बांधून उभ्या राहू. फार वाईट दशा शेतकर्‍यांची. आमच्या शेजारी रुक्मिणी आहे. तिच्या घरी खायला नाही. पोरगा थंडीतापानं आजारी आहे. त्याला दवा नाही. वाईट दिवस आले. आता रडून उपयोग नाही. शांताला आपण बोलवू. ती होईल आपली पुढारी. निघू तिच्या पाठीमागे आपण. पेटवू सारं रान. उठवू आया-बहिणी. आपण पुरुषांच्या पुढे होऊ. सरकारला सांगू, यंदा सारा सूट दे. तहशील कमी कर. दाराचे सावकार बंद कर, नाही तर फोडतो तुझ्या दारात आम्ही आमची डोकी.''

गीताचे लहानसे भाषण. परंतु खेडयातील आत्मा त्यात होता. शिवतर गाव उत्साहाने उचंबळले, स्फूर्तीने नाचू लागले.

आता उठवू सारे रान
गाऊ स्वातंत्र्याचे गान


देशातील जागा झाला माझा किसान । आता ॥

असे म्हणत मुलेबाळे सर्वत्र घुमू लागली. चैतन्य ज्वाला सर्वत्र जाऊ लागल्या. उत्साहाच्या लाटा दूरवर पसरू लागल्या.,
शांतेने वर्तमानपत्रातून हकीगत वाचली. तिला राहवेना. या प्रचंड मोर्चात सामील होण्यासाठी ती आली. ती आधी धनगावला आली. मोहनचा पत्ता काढीत ती त्याच्या झोपडीत गेली. कृश व आजारी मोहन घोंगडीवर पडलेला हाता. त्याने शांतेचा फोटो हृदयाशी धरला होता. तापाने तळमळणार्‍या मोहनची ती एक शांती होती.

''मोहन, मोहन'' शांतेने हाक मारली.

''आली. शांता आली. तुझंच स्मरण मी करती होतो. शांता, ये बस. आग होते अंगाची. तुझा हात ठेव ना डोक्यावर.'' मोहन म्हणाला.

शांतेने मोहनचे अंथरूण नीट केले. त्याला पांघरूण घातले. त्याच्या कपाळावर हात ठेवून ती बसली. तिने थोडया वेळाने त्याच्या कपाळावर गार पाण्याची पट्टी ठेवली. मोहनचे चरण चुरीत ती बसली. त्याचे पाय आपल्या मांडीवर घेऊन ती हळूहळू चेपीत होती. डोळे भरून येत होते. किती कृश झाला होता तिचा मोहन. पूर्वी कसा हाडापेराने बळकट दिसे, कसा डोळयांत भरे. परंतु आज केवळ हाडे उरली. माझ्यासाठी मोहन झिजला, श्रमला.

''मोहन, तू किती वाळलास? किती दिवसांपासून आजारी आहेस? मला कळवलं नाहीस?'' तिने विचारले.

''शांता, कळवून काय करायचं? तुला दोन महिन्यांत पैसे पाठवले नाहीत. वचनाप्रमाणे वागलो नाही. वचनभ्रष्ट, पापी मोहन आजारी पडला. कोणालाही माझा उपयोग नाही. ना तुला, ना देशाला. फुकट, फुकट जीवन.'' मोहन म्हणाला.

''मोहन, तुझं जीवन जर फुकट तर इतकं मनास लावून घ्यावं? तुझं हे मूक बलिदान आहे. पैसे पाठवता नाही आले म्हणून का इतकं मनास लावून घ्यावं? मी का परकी आहे?'' तिने त्याचे डोळे पुसून म्हटले.

''त्या दिवशी मी तुझे डोळे पुसले. आज तू माझे पुसत आहेस.'' मोहन म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel