"आली असेल. महाराष्ट्र गरिब असला तरी कर्तव्याला चुकत नाही." माया म्हणाली.
इतक्यात रामदास तिकडून आला.
''माया, ही पाहा महाराष्ट्राची मदत. माझ्या गावची मदत. मी शांतेला लिहिलं होतं, दयाराम वगैरे मित्रांसही लिहिलं होतं. हे पाहा त्यांचं उत्तर ! लिहितात की, कपडे पाठविले आहेत आणि आश्रमातील मित्रांनी फाटके कपडे शिवून पाठवले आहेत.'' रामदास आनंदाने सांगत होता.
''तुमच्या जिल्ह्यात अतिवृष्टीने दुष्काळ पडला आहे ना?'' मायाने विचारले.
''तरीही बंगालच्या दुःखाची आठवण त्यांनी ठेवली आहे. गरीब महाराष्ट्रानं आपले निर्मळ हृदय पाठवलं आहे. येतेस का पाह्यला ती गाठ?'' त्याने विचारले.
''आली असेल का पण?'' तिने विचारले.
''बरेच दिवसांपूर्वी पाठविली आहे असं या पत्रात आहे. तेव्हा गाठ आलीच असेल.'' तो म्हणाला.
''मग कोठारात पडली असेल ती.'' माया म्हणाली.
''चल, ती आपण शोधून काढू.'' रामदास म्हणाला.
कोठारात गावोगांवच्या गाठी येऊन पडल्या होत्या. माया व रामदास रामपूरची गाठ शोधीत होते. शेवटी सापडली एकदाची.
''ही पाहा. महाराष्ट्राची गाठ सापडली हो.'' ती म्हणाली.
''शेवटी महाराष्ट्राचं हृदय तुलाच सापडलं.'' तो म्हणाला.
''गाठ सोडायला कठीण आहे.'' तर म्हणाली.
''सोनं मिळवायला कठीणच असतं. हिरे वर नाही मिळत, खोल खणावं लागतं.'' तो म्हणाला.
त्या दोघांनी ती गाठ सोडली. हेमलता, मृणालिनी त्याही तेथे आल्या. गाठ सोडताच वास आला. गोड गोड वास.
''कसला रे वास?'' मृणालिनी म्हणाली.
''महाराष्ट्रीय आत्म्याचा.'' माया म्हणाली.
या कपडयांची राशीत एक लहानशी अत्तराची शिशी होती. कपडे काढता काढता ती सापडली.
''हे बघा काय सापडलं !'' माया म्हणाली.
''काय गं माया?'' हेमलतेने विचारले.
''अत्तराची बाटली.'' माया म्हणाली.
''येथे का कोणाचं लग्न आहे? दुष्काळात, महापुरात सापडलेले दुःखीकष्टी लोक. त्यांना का अत्तर गुलाबपाणी या वेळेस सुचेल? त्यांच्या पोटात नाही घास. या महाराष्ट्रीय लोकांना काही काळ-वेळ कळत नाही. मरण्याचा प्रसंग आणि त्यांना गंमतच वाटत आहे. जणू नवरदेवाला कपडे पाठवायचे आहेत.'' मृणालिनी म्हणाली.