''दाखवायला लाजता ना?'' तिने विचारले.
''मी सारखा शिवतो आहे. तुला दिसत नाही. समजत नाही मी काय करू?'' असे म्हणून तो हसला.,
''हसून फजिती लपत नसते.'' ती म्हणाली.
''अगं वेडे, महाराष्ट्रात खेळामध्ये एखादा पळत असला व आपण त्याला धरलं म्हणजे त्याला शिवला असे म्हणतात. शिवाशिवीचा खेळ असतो हो तो. तो तुला शिकवला व एक शब्दही शिकवला.'' रामदास म्हणाला.
''शिकवण्याची ही प्रत्यक्ष पध्दत वाटतं?'' तिने हसून विचारले.
एके दिवशी एक माता आपली दोन मुले घेऊन तेथे आली. ती मुले उघडी होती. ती कपडे मागत होती.
''येथून कपडे मिळत नाहीत. येथे नुसता साठा असतो. वाटण्याच्या त्या केंद्रातून घेऊन जा हं.'' माया म्हणाली.
माया हेरंबकुमारांना विचारायला गेली. रामदास व ते हिशेब करीत होते. ''पूजादिवसामुळे इतर केंद्रेही बंद आहेत. येथेच द्या तिला कपडे.'' हेरंबकुमार म्हणाले.
सुशिक्षित व शहरातील लोकांच्या मुलांचे ते कपडे. त्या किसान मातेला आपल्या लहानग्याला ते नीट घालता येईनात. रामदास इतक्यात तेथे आला.
''थांबा, मी घालून देतो हं त्याच्या अंगात.'' तो म्हणाला.
''बायकांचं काम तुम्ही कशाला करता?'' माया म्हणाली.,
''बायका गंमत पाहत उभ्या राहिल्या तर पुरुषांना नको का करायला?'' तो म्हणाला.
''रोज थोडंच तुम्ही जाणार आहात त्या मुलाच्या अंगात घालायला? तिच्या आईलाच शिकू दे.'' माया म्हणाली.
''परंतु शिकवायला तरी हवं ना? का हसत उभं राहायचं?'' तो म्हणाला.
''रागावलेत वाटतं? पुरुषाचा राग नाकावर असतो. मी जातेच मुळी.'' असे म्हणून ती गेली. लगेच परत आली.
''आमचा राग नाकावर, तुमचा नाही का?'' त्याने विचारले.
''आता त्या दुसर्याही मुलाच्या अंगात घाला.'' ती म्हणाली.
''चिडवू नकोस मला. काही लाज वाटत नाही. हा बघ घालतो.'' असे म्हणून रामदास त्या दुसर्या मुलाच्या अंगात कपडा घालू लागला.
''स्टेडी प्लीज.'' माया म्हणाली.
''धसमुसळेपणा थोडाच करतो आहे?'' तो म्हणाला. त्याने वर पाहिले.
''माया, असे चोरून फोटो घेणं बरं का?'' तो म्हणाला.
''पुढं-मागे कधी काळी जर कोणी तुम्हांला मुलांना आंगडे-टोपडे घालायला सांगितलं व हे बायकांचे काम म्हणून तुम्ही तुच्छतेने नाकारलं तर हा आपला फोटो घेतलेला असावा.'' माया म्हणाली.