Bookstruck

क्रांती 123

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''त्यांचा घोडा कधीच अडत नाही, पडत नाही. भगवान कृष्ण गीता सांगत असताना अर्जुनाचे घोडेसुध्दा नाचत, रथाचे अणुपरमाणुही रोमांचित होत. तसे आनंदमूर्तीस बघताच, त्यांचा शब्द ऐकताच, त्यांचा स्पर्श होताच घोडा नाचू लागतो.'' मुकुंदराव म्हणाले.

''स्वामी रामतीर्थांसारखे दिसतात ते. रामतीर्थांच्या मुखावर असंच गोड, अद्वितीय स्मित असे. त्यांच्याशी वादविवाद करण्याच्या हेतूनं लोक जात; परंतु त्यांच्या तोंडावरील हसू पाहून वादविवाद करण्याचं विसरून जातं. प्रणाम करून परत येत.'' माया म्हणाली.

इतक्यात घोडा आला.

''आला घोडेस्वार, आले विश्वासराव.'' मुकुंदराव म्हणाले.

''तुम्ही का दुसरं नाव ठेवलं? खरेच विश्वासराव आहेत. खुशाल त्यांच्यावर विश्वास टाकावा.'' प्रेमळपणे माया म्हणाली.

''विश्वासराव असेच सुंदर होते. पानपतच्या लढाईत ते मरून पडले. त्यांचं पवित्र प्रेत पाहून, ते सुंदर रूप पाहून शत्रूही रडले. विश्वासराव व जानकोजी यांची नावं आठवताच हृदयात शेकडो भावना उसळतात, करुण-वीरभावना.'' मुकुंदराव जणू गत-इतिहासात जाऊन तन्मयतेने म्हणाले.

''आत बसू या मायेच्या दिवाणखान्यात.'' आनंदमूर्ती म्हणाले.

''चला.'' मुकुंदराव म्हणाले.

दोघे आत गेले. तेथे खेडयातील हातसुताचा सुताडा पसरलेला होता. दोघे बसले. आनंदमूर्ती लगेच चरख्यावर सूत कातू लागले. मुकुंदराव टकळीवर कातू लागले.

''कशाला बोलावलंत मला?'' आनंदमूर्तींनी विचारले.

''तुम्हाला विद्यार्थी-संघ सर्वत्र स्थापण्याचं काम सांगणार आहे. मागं तुमच्याजवळ बोललो होतो या बाबतीत. तुम्ही केला विचार?''

''हो, केला. काही शाळा-चालकांजवळही बोललो, मुलांजवळही चर्चा केली. मुले तयार आहेत. परंतु कोणी शंका विचारतात. ''विद्यार्थीदशा संपल्यावर पडावं या भानगडीत', असं म्हणतात. 'विद्यार्थ्यांनी विद्या मिळवावी, राजकारणात पडू नये,' असं म्हणतात. संघाचं ध्येय काय विचारतात.'' आनंदमूर्ती म्हणाले.

''मनुष्याला दोन धर्मं असतात; नित्यधर्म व नैमित्तिक धर्म. विद्यार्थ्यांस नित्यधर्म म्हणून राजकारण नाही; परंतु नैमित्तिक राजकारण आहे.'' मुकुंदराव म्हणाले.

''म्हणजे काय?''

''त्याचा अर्थ असा: स्वातंत्र्यदिन आला तर त्यात सर्व विद्यार्थी सामील होतील. राजबंदीदीन आला, त्यात सामील होतील. किसानांची प्रचंड चळवळ चालली असेल तर सहानुभूती म्हणून एखादे दिवशी संपत करतील. कामगारांचा संप चालला असला तर त्याला सहानुभूतीचा ठराव करून पाठवतील. अशी कामं रोज नसतात. हे प्रसंग कधी कधी येतात; त्या दिवशी जो जो माणूस आहे त्याचं काही कर्तव्य असतं. विद्यार्थीही शेवटी मनुष्य आहे. मोठे प्रसंग येतात, तेव्हा लहानथोर सारे उठतात. पाऊस पडत नसला म्हणजे शंकराला कोंडतात. त्या वेळेस मोठी माणसं हांडे भरून पाणी ओततात. लहान मुलं लोटी भरून ओततील. परंतु 'आम्ही लहान,' असं म्हणून मुलं घरी बसतील तर ते आईबापांस आवडणार नाही. आग लागली असेल तर मुलंही धावतील. रोगाची साथ आली तर तरुण विद्यार्थी स्वयंसेवक होतील. हा माणुसकीचा नैमित्तिक धर्म आहे. उद्या स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला तर सर्वांनी त्यात पडलं पाहिजे. सत्त्वपरीक्षेत सर्वांनी उभं राहावयाचं. हरिश्चंद्राच्या पाठोपाठ तारामती व दोघांच्या पुढे रोहिदास, श्रियाळाच्या पाठोपाठ चांगुणा व त्या दोघांच्या पुढे उडया मारणारा चिमणा चिलया. उद्या भारताची सत्त्वपरीक्षा आली तर स्त्रिया, मुलं सर्वांनी उभं राहिलं पाहिजे.''

« PreviousChapter ListNext »