''तुमची वेणू बनण्याचं भाग्य माझं आहे का? तुमच्या ओठांतून पवित्र उदात्त विचार गंगेप्रमाणे धो धो करीत येतात. त्या भाग्यवान ओठांशी समरस होण्याचं भाग्य माझ्या दुबळया ओठांचं आहे का? तुमच्या ओठांतील विचार माझ्या ओठांतून पडतील का बाहेर?'' आनंदमूर्तींनी विचारले.

''पडतील, अधिकच सुंदर व पवित्र होऊन बाहेर पडतील.'' मुकुंदराव म्हणाले.

''तुमच्या प्रेमप्रसादानं तसं होवो, माझं जीवन कृतार्थ होवो. तुमचा चरणरज व्हावं हीच माझी कसोटी. तुमचे इच्छित या हातांनी व्हावे, या क्षुद्र जीवनाने व्हावे, हीच माझी रात्रंदिवस उत्कट इच्छा.'' आनंदमूर्ती म्हणाले.

''हे दूध घ्या.'' माया म्हणाली.

''गाय देते का दूध?'' मुकुंदरावांनी विचारले.

''दगडाला प्रेम दिलं तर तोही पाझरतो. मग गाय का पाझरणार नाही, पान्हावणार नाही? बंगालमध्ये खेडयातून म्हशीचं दूध पिणं निषिध्द मानतात. इकडे तर म्हशीचंच दूध.'' माया म्हणाली.

''गायीचा महिमा तुम्ही शिकवा. क्रांती करा.'' मुकुंदराव म्हणाले.

''जेथे तेथे तुमची क्रांती.'' माया म्हणाली.

''क्रांतीशिवाय त्यांना शांती नाही.'' आनंदमूर्ती म्हणाले.

''संसारात पडण्याचं भाग्य मिळालं नाही, म्हणून म्हणत असाल असं. संसारात राहून फकीर होण्याचं सर्वांत मोठं भाग्य.'' माया म्हणाली.

''कोठेही असा, 'देव जवळ अंतरी' हा अनुभव येईल.'' मुकुंदराव म्हणाले.

''स्वर्गात देव आहे तोच नरकातही आहे.'' आनंदमूर्ती म्हणाले.

''मला नरक मिळाला तर तेथे नंदनवन करीत म्हणेन, भरपूर सोनखत येथे आहे; फुलवू दे बागा, फुलवू दे मळे. नरकातही देव आहे हे सिध्द करीन. मांगल्य अनुभवाचं शास्त्र माहीत असलं म्हणजे सर्वत्र मंगलमूर्तीच दिसतील. डांबरातून सुंदर रंग काढतात व गोड साखर काढतात; परंतु माणसातील मांगल्या बाहेर काढण्यास अद्याप लोक शिकत नाहीत. एकमेकांस शिव्याशापच देतील. संतांनी त्याचा शोध लावला होता.'' मुकुंदराव म्हणाले.

''विश्वभारतीतील व्याख्यानात तर तुम्ही सांगितलं की, महाराष्ट्रीय संत प्रेमालाही मर्यादा घालतील. ते काटयांना कुरवाळणार नाहीत, ठेचतील.'' माया म्हणाली.

''माये, संतांच्या हातचं ठेचणं ते. तो आईच्या हातचा मार. तुमचं-आमचं ठेचणं निराळं व संतांचं त्या त्या जिवाच्या कल्याणार्थ म्हणून केलेलं केवळ निस्वार्थ ठेचणं निराळं. शब्द एक पण पाठीमागील हेतूत दोन ध्रुवांचं अंतर. तुकारामांचा आधार देऊन आम्ही ठेचणं उराशी बाळगू, परंतु संतांनी दुनियेवर आधी प्रेम करण्याचा हक्क मिळविला, मग मारण्याचा हक्क मिळविला; परंतु आम्ही मारण्याचा हक्क मिळविण्यासाठीच फक्त धडपडत असतो.'' मुकुंदराव म्हणाले.

''तुमच्या महाराष्ट्रीय संस्कृतीवरील व्याख्यानातील असा नव्हता सूर.'' माया म्हणाली.

''नसेल कदाचित. मनुष्य नेहमी वाढत असतो. कालच्यापेक्षा आज नवीन दिसते. साप चावला तरी त्याच्या रूपानं देव येऊन चुंबून गेला असं म्हणणं हेच परमोच्च मानवी ध्येय. ते दुबळेपणानं आचरता येत नसलं तरी त्या ध्येयाची टर उडवता कामा नये. त्या ध्येयाला कोटी कोटी प्रणामच केले पाहिजेत.'' असे म्हणून मुकुंदराव उठून गेल. त्यांना का तो वाद असह्य झाला? क्रांतिकारक बंगालमधील माया त्यांना का उडवू पाहत होती?

''जातो मी.'' आनंदमूर्ती म्हणाले.

''आज कोणत्या गावी खादीफेरी?'' मायेने विचारले.

''आता विद्यार्थ्यांत फेरी. आता विद्यार्थ्यांचं रान उठवायचं. त्यांच्यात राम ओतायचा. किसानसंघटना, कामगारसंघटना, विद्यार्थीसंघटना. शेवटी तिन्ही एका स्वातंत्र्यसंग्रामात होमावयाच्या. त्या होमातून मंगल क्रांतीचा जन्म व्हायचा.'' असे म्हणून घोडयावर थाप मारून तो गोड परंतु तेजस्वी घोडेस्वार दौडत वार्‍याप्रमाणे निघून गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel