''तिचे त्याच्यावर प्रेम असेल.'' महेश म्हणाला.

''इतक्या लांब प्रेम?'' त्याने शंका विचारली.

''चंद्र किती लांब असतो, तरी समुद्र उंचबळतो.'' रमेश म्हणाले.

''सूर्य किती दूर असतो, तरी पृथ्वीवरची फुलं फुलतात.'' अक्षयकुमार म्हणाले.

''आई किती दूर असते, तरी शाळेत आठवण येऊन महेश रडतो.'' नरेंद्र म्हणाला.

''आता काही नाही रडत. लहानपणी रडत असे.'' रमेश ऐटीत म्हणाला.

'आता अगदी मिशा आलेला झालास वाटतं?'' नरेंद्र हसून म्हणाला.

''बाबाच म्हणतात की तू आता मोठा झालास; असा हट्ट नाही चालणार.'' महेश म्हणाला.

''तडाखे मिळतील नाही तर.'' नरेन्द्र म्हणाला.

''मोठे झाल्यावरही तडाखे, लहानपणीही तडाखे.'' महेश म्हणाला.

''नरेन्द्र, महेश, जा आपल्या खोलीत; नाही तर छडी आणीन, निघा.'' आई बाहेर येऊन म्हणाली.

''पाहुणे आले तरीसुध्दा छडी. पाहुण्यांच्या समोरसुध्दा आई आपली मारकुटी.'' महेश म्हणाला.

''काय म्हटलंस ऐकलं मी. आल्यावर सांगते हो. चुरूचुरू बोलायला अलीकडे शिकली आहे. मार पाहिजे आहे. चांगला याद राहीलसा.'' आई मोठयाने म्हणाली.

ती कोकरे कोंडवाडयात गेली. आपण तुरुंगात तर नाही ना, असे आलेल्या मित्रांस वाटू लागले. जुनी ओळख पटते की नाही, नीट बोलतात की नाही, असा संशय मनात आला. शेवटी एकदाचे देवदर्शन झाले. आनंदमोहन आले. पत्नी बाहेर आली. तिने हातातील हॅट घेऊन ठेवली. त्यांनी कोट काढून दिला. तो ठेवला. ते आत  गेले. साहेबी पोशाख सर्व काढून बंगाली पोषाखात बाहेर आले. पुढे निर्‍या सोडलेले धोतर, अंगात एक सदरा व शाल असे बाहेर आले.

''येतो, बसा हं. हातपाय धुऊन येतो.'' असे सांगून ते गेले. साहेबी पोषाख जाऊन बंगाली पोषाख आला म्हणून मित्रांना आशा वाटू लागली. घरात शिस्तीचे साम्राज्य अधिक असेल एवढेच आता त्यांना वाटले. आनंदमोहन बाहेर आले. आरामखुर्चीत बसले. विजेचा पंखा सुरू झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel