सारे सोहाळे झाले. मैना आता सासरी जाणार होती. सारंगगाव सोडून जाणार होती. सारे सुख सोडून जाणार होती. त्या दिवशी पहाटे ती उठली. एकटीच निघाली. कोठे जातेस मैने? एकटी कोठे चाललीस? ती त्या नदीतून पलीकडे गेली. तिचे हृदय थरथरत होते. तिचे डोळे अश्रू ढाळीत होते. त्या शिवालयाजवळ ती आली. ती पाहू लागली. तेथील फुलझाडे उपटलेली दिसली. मैनेला स्वत:चे सारे जीवनच उपटल्यासारखे वाटले. दोघांच्या हातच्या पाण्याने वाढलेली ती फुलझाडे. त्या फुलझाडांना मैनेने हृदयाशी धरले. त्यांच्यावर डोळयांतील घडयातून पाणी घातले. ती ती झाडे पुन्हा लावू लागली. कशी ती लागणार? लहान नवीन रोप उपटून पुन्हा लावले तर अधिकच चांगले वाढते, अधिकच सतेज दिसते. परंतु जून झालेली झाडे उपटून लावू पाहू तर ती जगत नाहीत. मैने वेडी आहेस तू. बाहेरची फुलझाडे गेलीत तर जावोत. हृदयातील बाग सिंचीत जा. तेथे गोपाळ आहे. तो व तू दोघे पाणी घाला. समजलीस ना?
त्या फुलझाडांवर रागावलेला माळी कोठे आहे? मैना शोधू लागली. ती वणवण करीत सर्वत्र हिंडली. शंकराच्या गाभा-यात तिने पाहिले. त्या बकुळीच्या झाडाखाली पाहिले. तिला ते गाणे पूर्वीचे आठवले. आता ती नवीन गाणे गुणगुणू लागली. तिच्या ओठांतून, तिच्या कंठातून शब्द बाहेर पडत होते, ते जणू पंख लावून बाहेर पडत होते. ते शब्द नव्हते. ते गाणे होते. तिच्या भावना जणू पंख लावून प्रियकर शोधण्यासाठी बाहेर पडत होत्या. तिचे प्राण जणू बाहेर पडत होते व दशदिशांत गानरूपाने धावू पहात होते.
देवा, जिवलग मज मम द्या ना
द्या ना, जिवलग मज मम द्या ना ॥
धुंडु कुठे मी, शोधु कुठे मी
प्रभु मम जीवन-राणा ॥द्या ना.॥
जाऊ कुठे मी, पाहु कुठे मी
त्या मम पंचप्राणा ॥द्या ना.॥
इथेच बसुनी, इथेच हसुनी
फुलविती प्रीती-फुलांना ॥द्या ना.॥
हरहर हरहर, गेला प्रियकर
प्रभुजि मरो ही मैना ॥द्या ना.॥
मैनेचे गाणे जणू संपले नसते. हजारो कडव्यांचे ते गाणे होते. हृदयाच्या हजारो तारा वाजत होत्या, थरथरत होत्या. त्यातून निघणारे ते गीत कोणाला टिपून घेता येईल, कोणाला लिहून घेता येईल?
पहाट संपली. आता उजाडले. प्रकाश आला. सृष्टी सजीव होत होती. चराचरात चैतन्याची कळा संचरत होती. पाखरे बोलू लागली. फुले फुलू लागली. परंतु मैनेच्या जीवनातील चैतन्य संपुष्टात येत होते. या मैनेचा कंठ बंद होत आला. तिची वाचा संपत आली. ओठांतील गाणे संपले. काही वेळ पुन्हा डोळयांतील गाणे सुरू झाले. परंतु तेही थोडया वेळाने सुकून गेले. प्राणेश्वराला शोधता शोधता मैना तेथे पडली!
पाखरे ओरडू लागली. त्या दु:खी मानवी प्राण्याच्या दु:खाची हाकाहाक त्यांनी केली. मानवाविषयी मानवेत्तर सृष्टी सहानुभूती दाखवू लागली. पाखरांचे आवाज थांबले. पाखरे स्तब्ध झाली. साळुंक्या मैनेभोवती घिरटया घालीत होत्या. तिच्या देहाचे का गिधाडापासून त्या संरक्षण करीत होत्या?