एके दिवशी गदरोळ झाला
धर्म, जात-पात, संस्कृती, सभ्यता, आचार-विचार आणि माणूसकी संसदेवर चाल करून गेले निषेधासाठी
अन् ह्यांचा म्होरक्या होता स्वातंत्र्य
स्वातंत्र्याने तर हिरिरीने सहभाग घेतला
सगळ्यांचा एकच नारा
अबाधित रखो आस्तित्व हमारा!
स्वातंत्र्याने पुढाकार घेतला कारण वर्षातला एक दिवस सोडून त्याला कोणी पुसतच नव्हतं
आज तर हुरूप एव्हढा होता की सगळ्यांना घेऊन संसदेवर जाऊ म्हणाला
धर्म तर त्वेषाने पेटला होता बेरंग होऊन बेछूट झाला होता कारण स्वतःचा असा त्याचा रंग शिल्लक नव्हता
जोर मात्र सगळ्यांपेक्षा जास्त होता
जात-पात तर सवयीनुसार लगेचच मोर्च्यात आले
एरवी कोणीतरी त्यांना ओढून आणत आज स्वतःहून सामील झाले
संस्कृती तर नटून थटून आली
मग चार-चौघात जास्त फुटेज मिळेल म्हणून
कारण बिचारी आजवर श्रेयवादालाच ती उरली होती
सभ्यताचा जरा थाट वेगळा होता
ईतरांपेक्षा अंमळ पसरलेला होता
छान-छौकी उगाच लादली गेली होती तिच्यावर
मात्र स्वतःची आयडेंटिटी तिने सोडली नव्हती
आचार-विचार तर अगदी जय्यत तयारीने आले होते
सगळी साधनं, परिमाणं आणि संदर्भ घेऊन
आज तर त्यांना स्वतःच वेगळंपण सिद्ध करायचंच होतं
माणूसकी तर स्ट्रेचरवर आली होती डायरेक्ट आयसीयूमधून
तशी तज्ञ डॉक्टरांची टिम दिमतीला होतीच
उगाच माणूसकीवर काळाचा घाला येऊ नये म्हणून!
सगळे जमल्यावर स्वातंत्र्याने निषेधाच्या मोर्च्याची रूपरेषा समजावून सांगितली
संस्कृतीने तर लगेच अनुमोदन दिले आवरून सावरून
धर्म नाराजीनं म्हणालं अजेंडात मी दुय्यम का?
मग सभ्यता पुढं सरसावली अन् धर्माची समजूत काढली
आचार-विचार जरा साशंक होते पण त्यांच्या माथी मारले की ते राजी होतात हे धर्माने हेरलं होतं
जात-पात संदिग्ध होते नेहमीप्रमाणे
त्यांना एकच माहित होतं
जिसके पिछे सारी जनता
वही हमारा भारी नेता !
माणूसकीचं बिनसलं होतं पण दुःखण्यानं पिचलं होतं
डॉक्टरांची टिम टेस्ट अन् रिपोर्टमध्येच मश्गूल होती
अखेरीस एक कलमी कार्यक्रम जाहीर झाला
आचार-विचार तर तडाखेबंद लिखाणात माहिर
इकडे धर्म जाज्वल्य अन् वीररसयुक्त भाषणबाजीत तरबेज
संस्कृती प्रदर्शनासाठी आसुसलेलीच होती
मागाहून जात-पात मात्र फरफटत रेटलं जात होतं
सभ्यता मात्र दोहोंना सांभाळण्यात गर्क होती
माणूसकी सगळ्यांच्या शेवटी निपचितपणे आणली जात होती तज्ञांकडून !
संसदेचा आवार जसा आला
शुकशुकाट सुरू झाला
किर्र शांतता पसरली
स्वातंत्र्याला काहीच उमगेना!
मागे वळून पाहतो तर काय कोणीच उरलं नव्हतं
ज्याचे त्याचे कॉपीराईट होते ते बाकीच्यांना घेऊन गेले
स्वातंत्र्य एकटंच हिरमुसलं बंद संसदेपाशी कोलमडलं !!!!
भूषण वर्धेकर,
23-10-2015
दौंड
दुपारी 4:30