देवा तुझी कमाल आहे

भक्तांचीपण धमाल आहे

राजरोस उपास आहेत

उपासनेचा वाणवा आहे


प्रत्येक वार ज्याचा-त्याचा

उर्वरीत खेळखंडोबा

उत्साही लोकांचा महापूर

चंगळवाद भौतिकवादी


खाबुगिरीसाठी धर्मदाय संस्था

सोन्या चांदीचा ढीग

पैशांचा जोर दररोज

तोंडदेखलेपणा समाजसेवांचा


भक्तीचा अलौकिक गजर

कार्यकर्त्यांच्या ताफ्यात DJ वगैरे

फ्लेक्स मात्र डोंगराएवढे

कर्तृत्वाची बंद कवाडे


ज्याचा-त्याचा धर्म, पंथ

ज्याचा-त्याचा महापुरुष

जयंत्या पुण्यतिथ्या आधी व नंतर

साप्ताहिक सोहळे सुरुच


गर्दी खेचण्याची स्पर्धा

रेलचेल करमणूकप्रधान कार्यक्रमांची

विचारवंतांचा वाणवा

बजेट सँक्शन करणार्याचा

जलसा. . मिरवणुका. . सत्कार. .


गल्लोगल्ली हीच बोंब

तरूण म्हातारे सगळे एकछत्राखाली

महिलांसाठी आघाड्या

स्त्री सुरक्षा रामभरोसे


जगात आपणच भारी

आपला महोत्सव भारी

यांतच युवा नेते  जुंपले

विचार आचार  आशय वगैरे

गतकाळापुरते राहिले



आता केवळ संख्यात्मक पाठबळ

टक्केवारी निरंतर

जात पात कागदोपत्री

लिफाफे लालफिती धुळखात


धांगाड-धिंगाचा कळस

हिशेबाचा ना ताळमेळ

खर्च बिनभोबाट

नंतर आहेच खंडणी वर्गणी वगैरे


कहर झालाय समाजात

तुटत चालले दूवे

दैनिकांची बोटचेपी भूमिका

जहिरातींसाठी हेवेदावे


महापुरुषांचा देवदेवतांचा

अजब धांडोळा

या देशी पुन्हा पुन्हा

सामाजिक परिवर्तन पाठ्यपुस्तकी

वार्षिक परिक्षांसाठी



भूषण वर्धेकर, दौंड

4-4-2015

8:15 PM

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel