लेखक - भरत उपासनी
कसा मांडला आयुष्याचा असा प्रभू तू खेळ
ज्याचा नाही कशाशी मेळ // धृ //
कोण कशास्तव इथे जन्मतो
कसाही जगतो कसाही मरतो
घटनेमागुनी घटना येती
घटना येती घटना जाती
संपुनी जातो एक दिनी मग घटनांचा हा खेळ
हसणे ,रडणे,कुथणे,कण्हणे
घटनांना सामोरे जाणे
कुठे जन्मणे कुठेही जगणे
पोटासाठी वणवण फिरणे
कुठून येतो गरगर फिरतो काळाचा हा खेळ
कुठून येतो शून्यातून मी
विरून जातो शून्यातच मी
मधले जगणे थोडे कळते
थोडे कळते थोडे वळते
रहस्य परि ते पूर्ण न कळते सरून जातो खेळ
ह्या सृष्टीचा तू निर्माता
कुठे कशास्तव लपून रहातो
जणू बनवूनी आम्हा खेळणी
तऱ्हेतऱ्हेचे खेळ खेळतो
रंगत जातो डाव पटावर तरी उधळून जातो मेळ
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.