शास्लर म्हणतो ''प्लॅटिनसनंतर १६०० वर्षे अगदी सुनी गेली. सौंदर्य व कला यांच्या प्रांतात एवढया प्रदीर्घ काळात कोणीही थोडीसुध्दा शास्त्रीय दृष्टी दाखविली नाही. कोणाला गोडी व कुतूहलच नव्हते. पंधराशे वर्षांत या शास्त्राची तिळभरही वाढ झाली नाही. ही पंधराशे वर्षे सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने असून नसल्यासारखीच होती. सौंदर्यशास्त्राची भव्य व टोलेजंग इमारत उभारण्याच्या कामी नसल्यासारखीच होती. सौंदर्यशास्त्राची भव्य व टोलेजंग इमारत उभारण्याच्या कामी या पंधराशे वर्षांनी थोडादेखील हातभार लावला नाही.
परंतु वास्तविक असे काहीच घडले नाही. सौंदर्यशास्त्र लुप्त झाले नाही, गेले नाही. कारण ते कधी अस्तित्वातच आलेले नव्हते, ते कधी जन्मलेच नव्हते. सौंदर्यशास्त्राचा जन्म अद्याप व्हावयाचा आहे. अजून प्रसूतिवेदनाच आहेत. ''जे झालेचि नाही। त्याची वार्ता पुसशी काई'' अशा प्रकारचे जे जन्मलेच नाही त्याच्या मृत्युबद्दलची ही रडकथा काय कामाची? ग्रीक लोकांचे जे धार्मिक मध्येय होते, ग्रीक लोकांची चांगल्या जीवनाची जी काही कल्पना होती-त्याला अनुकूल असलेल्या कलेलाच ते सत्कला मानीत. ज्याप्रमाणे इतर उपयोगी वस्तूंस ते चांगल्या म्हणून मानीत, तसेच या कलेसही चांगली असे म्हणत. त्यांची जी एक 'सत्' ची कल्पना होती. तिला प्रतिकूल असणा-या कलेस ते वाईट म्हणून म्हणत; बाकी शास्त्र वगैरे असे काहीएक नव्हते. ग्रीक लोकांचा नैतिक विकास फार कमी झालेला असल्यामुळे त्यांना सुंदर व शिव एकच आहेत असे वाटले. परंतु असे मानण्यात त्यांचा परमोच्च नैतिक विकास न दिसून येता उलट त्यांचा नैतिक विकास बेताबेताचा व सामान्य दर्जाचाच होता हे दिसून येते. अशा या अनिश्चित व बिनपायाच्या ग्रीक कल्पनेवर १८ व्या शतकांतील युरोपियन पंडितांनी आपले सौंदर्यशास्त्र उभे केले. वामगर्टनने त्याला रंगरूप दिले. सा-या वाळूच्या पायावर बांधलेल्या या हवेल्या होत्या, कारण ग्रीक लोकांत सौंदर्यशास्त्र म्हणून वस्तूच नव्हती. (बेर्नार्डचे 'ऍरिस्टॉटल व त्याच्या पाठीमागून आलेले' हे उत्कृष्ट पुस्तक वाचा. तसेच वॉल्टरचे 'प्लेटो' हे पुस्तकही वाचून पाहावे.)
ख्रिस्तीधर्माच्या-परंतु ख्रिस्ताच्या शिकवणुकीवर किंवा मंदिरी ख्रिश्चनधर्मावर श्रध्दा नसलेल्या अशा युरोपियन राष्ट्रांतील श्रीमंत वर्गात सुमारे १५० वर्षांपूर्वी हे सौंदर्यशास्त्राचे बाळ प्रथम जत्र्नमाला आले; एकाच वेळेस जर्मन, इटालियन, डच, फ्रेंच, इंग्रज वगैरे लोकांत हे बाळ जत्र्नम घेत झाले. या बाळाला बाळसे देणारा, व्यवस्थित पोषाख घालून नटविणारा पहिला पंडित म्हणजे वामगर्टन, हा होय. सौंदर्यशास्त्राला मानवेतिहासांत पहिल्यानेच शास्त्रीय व व्यवस्थित रूप त्याने दिले.
विद्वत्ता, व्यवस्थितपणा, प्रमाणबध्दता, बारीकसारीक गोष्टींकडेही लक्ष पुरविणे वगैरे जर्मन लोकांचे जे विशेष गुण-ते सारे वामगर्टनजवळ होते. अशा अनेक गुणांनी संपन्न वरील सरे जर्मन गुण उत्कृष्टपणे प्रकट झाले आहेत); जरी या ग्रंथांत तथ्य व कथ्य फारसे नसले तरीही सुशिक्षित व सुसंस्कृत लोकांना ही नवमीमांसा फारच आवडली. या मीमांसेवर टीका वगैरे न करिता, तिच्यातील गुणदोषांची चर्चा वगैरे न करिता, ती जशीच्या तशीच स्वीकारण्यात आली. तिचे फार कौतुक करण्यात आले, किती तरी गौरव करण्यात आला. एकंदरीत ही सौंदर्यमीमांसा वरच्या वर्गातील लोकांना इतकी पसंत पडली की आजसुध्दा-जरी या मीमांसेतील सिध्दांत व विचार पुष्कळसे बुध्दीस न पटणारे, केवळ इच्छेला वाटतात म्हणून लिहिलेले असे असले, जरी ही मीमांसा अत्यंत विचित्र आहे तरीही-पंडित वा अपंडित या ग्रंथांतील उतारे व मते नमूद करीत असतात. जणू हा ग्रंथ म्हणजे त्यांची श्रृतिस्मृतीच होय! स्वत:सिध्द व संशयातीत जणू हा ग्रंथ आहे!