सत्कला न राहिल्यामुळे आणि केवळ सुखविलासी कलेच्या प्रादुर्भावामुळे, या वरच्या वर्गाचा सहजच अध:पात झाला, आणि तो तसा होणे हे अपरिहार्यच होते. आपल्या वरच्या वर्गाची जी कला तीच फक्त काय ती कला, या कलेबाहेर जगांत कला अस्तित्वातच नाही, हा जो अहंकार, ही जी कल्पना राजरोस वरच्या वर्गात रूढ झाली, हे जे निरपवाद संशयातीत, अशंकनीय म्हणून सत्य सांगण्यात येऊ लागले-मानण्यात येऊ लागले-या अहंकारातून, या संकुचित व भ्रामक कल्पनेतून, नाना घोटाळयांच्या, संदिग्ध, न समजणा-या अशा कलापध्दती व शास्त्रे, कलेसंबंधीचे सारे परस्परविरोधी व असत्य असे निर्णय यांचा जत्र्नम झाला. युरोपियन लोकांचे जे वरचे वर्ग त्यांची जी कला तीन काय ती व्यापक व यथार्थ कला असे मानल्यामुळे कला कायमची चिखलांत रूतून बसली. आणि आश्चर्य हे की, चिखलांत रुतून बसलेल्या या कलेचीच ऐट व प्रौढी हे वरचे मिरवू लागले! आपली मूठभर लोकांची कला हीच काय ती कला असे मानणे आग्रहाचे व अन्यायाचे असूनही, जणू हे निर्दोष व अचूक असे सत्यच आहे अशा श्रध्देने हे वरचे लोक पुन: पुन्हा हीच गोष्ट प्रतिपादीत असतात.
वरच्या युरोपियन लोकांची ही जी कला तिचे नावगावही माहीत नसतानाच जगातील २/३ लोक मरण पावतात. आशिया व आफ्रिका खंडांतील जनतेस ह्या वरच्या युरोपियन लोकांच्या कलेचा पत्ताही नसतो. आणि ख्रिस्तीजनतेतीलही शंभरांत एखादाच कदाचित् या कलेचा उपयोग करीत असेल. तरीही या कलेलाच सर्वश्रेष्ठ व सर्वव्यापक असे आपण वरचे लोक संबोधित असतो! ख्रिस्ती समाजातील शेकडो ९९ लोक या कलेशिवायच जगतात व मरतात; या कलेसाठी ते मरमर श्रम करतात, परंतु तिचा आस्वाद व आनंद मात्र त्यांना कधीच घेता येत नसतो; आणि यदाकदाचित् आस्वाद घेण्याची संधी त्यांना मिळालीच तरी त्यांना समजणारसुध्दा नाही, अशा प्रकारचीच ही कला असते. प्रचलित असलेल्या सौंदर्यमीमांसेप्रमाणे मूळ प्रेरणा, ईश्वर, सौंदर्य यांचे परमोच्च आविष्करण म्हणजे कला असे आपण मानतो; किंवा कला म्हणजे परमोच्च सुख असेही म्हणतो; ऐहिक सुखाच्या बाबतीत समान हक्क नसले तरी पारलौकिक कल्याण व सुख यांच्या बाबतीत तरी समान हक्क आहेत असे आपण गृहीत धरतो. असे असूनही शेकडा ९९ युरोपमधील लोक पिढयान्पिढया श्रमाच्या भाराखाली चिरडले जात आहेत, कसे तरी जगून मरत आहेत; आणि जी कला ते कधीही अनुभवीत नाहीत, ''अनुभवू शकत नाहीत.'' जिचा उपयोग ते करीत नाहीत, जी ते समजू शकत नाहीत त्या कलेसाठी हा सारा श्रम त्यांना करावा लागत असतो. हे सारे उघडया डोळयांनी पहात असूनही तोंड वर करून पुन्हा आपण असे म्हणतो की आमची वरच्या वर्गाची कला हीच सर्वांची कला, हीच खरी यथार्थ कला, हीच काय ती एक जागतिक सर्वव्यापक कला, हीच सगळी कला-हिच्या पलीकडे काहीएक नाही!
आपली कला हीच जर खरी कला असेल, तर तिचा फायदा सर्वांना मिळाला पाहिजे; तसा तो मिळतो का, असा जर कोणी प्रश्न विचारला, तर त्याला एक ठराविक उत्तर असे देण्यात येते की ''वरच्या वर्गात रूढ असलेल्या या कलेचा उपयोग प्रत्येकाला जर करता येत नसेल, तर तो दोष कलेचा नसून आजच्या सदोष सामाजिक घटनेचा तो दोष आहे. पुढे असा काळ लवकरच येणार आहे व हे आपणास आज स्वच्छ दिसत आहे की, ज्या वेळेस यंत्रांमुळे पुष्कळसा शारीरिक श्रम वाचेल व जो शारीरिक श्रम पडतो, तोही नीट विभागला जाईल, कलेसाठी होणारा जो श्रम तो पाळीपाळीने घेण्यात येईल, काही ठराविक लोकांनाच रंगभूमीच्या खाली सदैव बसून नानाप्रकारची यंत्रे हलवीत बसावे लागणार नाही, ठराविक लोकांना सततच ती वाद्ये वाजवीत बसावे लागणार नाही, ठराविक लोकांना सतत छापखान्यांत खिळेच जुळवीत बसावे लागणार नाही. काम करणा-यांच्या तुकडया करण्यात येतील व जे लोक हे काम करतील त्यांना प्रत्येक दिवशी काही थोडेसे तासच हे काम देण्यात येईल व मग जो फुरसतीचा वेळ त्यांना मिळेल तो कलेचा आस्वाद घेण्यात, कलेचा उपभोग घेण्यात त्यांनी खुशाल दवडावा.