असे म्हणण्यात येत असते की ज्या फारच श्रेष्ठ अशा कलाकृती असतात, त्या बहुजनसमाज ग्रहण करू शकणारच नाही; कारण ह्या थोर कृती समजण्याला लायकी लागते, संस्कार लागतात, अभ्यास लागतो, विकास झालेला असला पाहिजे. ज्यांच्याजवळ अशी तयारी असते त्यांना त्या समजतात. परंतु बहुजनसमाज जर समजू शकत नसेल तर ह्या कलाकृती त्यांस जेणेकरून समजतील असे ज्ञान त्यांना दिले पाहिजे; ह्या कलाकृती विसरून त्यांना सांगितल्या पाहिजेत. ह्या कलाकृतींचा जेणेकरून तेही आस्वाद घेऊ शकतील असे केले पाहिजे. परंतु वस्तुस्थिती अशी असते की, ह्या कलाकृती स्पष्ट करून सांगताच येत नसतात. ह्या कलाकृती जेणेकरून समजतील असे ज्ञानच नसते. बहुजनसमाजाला सत्कृती समजत नाहीत असे म्हणणारे बहुजनसमाजात जाऊन त्या कृतींचे विवरण करून सांगतात का? त्यांनी असे कधी करून पाहिले आहे का? ते असे करणार नाहीत. ते एवढेच म्हणतील की ''या कलाकृती पुन: पुन्हा वाचाव्या, म्हणजे हळूहळू समजू लागतील. ह्या कृती वाचलेल्या ऐकाव्या, ही संगीते पुन: पुन्हा श्रवण करावीत, ही चित्रे पुन: पुन्हा बघावीत; परंतु असा उपदेश करणे म्हणजे विशद करून सांगणे नव्हे. हे एक काहीतरी आंगवळणी पाहून घेणे आहे, काहीतरी सवय लावून घेणे आहे. लोकांना वाटेल ते अंगवळणी पाहून घेता येते. अत्यंत वाईट गोष्टींचीही सवय लावून घेता येते. वाईट अग्न, मद्ये, तंबाकू, अफू वगैरे गोष्टींची ज्याप्रमाणे मनुष्य सवय लावून घेऊ शकतो, त्याप्रमाणे असत कलेचीही तो सवय लावून घेईल; आणि आज हेच होऊन राहिले आहे.
परंतु कलेचे परमोच्च नमुने समजण्याइतकी, या उच्च कृतीची स्तुती करण्याइतकी सुसंस्कृत अभिरूची बहुजनसमाजाजवळ नाही असे म्हणता येणार नाही. ज्याला आपण फार उत्कृष्ट कला म्हणून समजतो ती बहुजनसमाजासही समजल्याची उदाहरणे आहेत. बायबल, निरनिराळया दंतकथा, परींच्या गोष्टी, लोकगीते हे सारे सामान्य जनतेस समजते. मग आज असे एकाएकी काय झाले की ज्यामुळे उच्च कला लोकांस समजेनाशी झाली, त्यांची ती शक्ती आज नाहिशी झाली?
ज्या भाषेत व्याख्यान दिले गेले, ती भाषा जर मला अवगत नसेल तर मी म्हणेन की ''व्याख्यान उत्कृष्ट झाले असेल, परंतु मला काही समजले नाही.'' चिनी भाषेत दिलेले व्याख्यान सुंदर झाले असेल, परंतु मला चिनी येत नसल्यामुळे ते मला दुर्बोध असू शकेल. परंतु मनाच्या व बुध्दीच्या इतर सर्व व्यापारांपासून कलेचे जे विलक्षणत्व आहे, ते ह्यांत आहे की कलेची भाषा सर्वांना समजते, सर्वांच्या हृदयांत स्पर्श करिते; ती एकजात सर्वांना वेड लावते, ती कोणाला वगळीत नाही. एखाद्या चिनी माणसाचे स्मित किंवा अश्रू ते मला रशियन लोकांच्या स्मिताप्रमाणे व अश्रूंप्रमाणे हसवतील व रडवतील. चित्र किंवा संगीत यांचे असेच आहे. काव्यसुध्दा जर मला समजणा-या भाषेत उतरले तर ते मला स्पर्श करील. किर्गीझ किंवा जपानी लोकांची गाणी माझे हृदय हलवितात; जपानी चित्रकला मला वेड लावते; हिंदी शिल्पकला व रबी गोष्टी मला आनंद देतात. एखाद्या जपानी गाण्याने किंवा चिनी भाषेतील कादंबरीने जर माझ्यावर परिणाम झाला नाही, तर त्यांचा अर्थ असा नाही की ती समजण्याची माझी पात्रता नाही. कलेच्या श्रेष्ठ कृतीची मला सवय झालेली असल्यामुळे, कलेचे उच्च आदर्श मला माहीत असल्यामुळे माझ्यावर त्या जपानी गाण्याचा किंवा चिनी कादंबरीचा तितका परिणाम झाला नाही. त्याची कला माझ्या बुध्दीच्या आवाक्याबाहेरची आहे, माझ्या ग्रहणशक्तीच्या पलीकडची आहे असा त्याचा अर्थ नव्हे. थोर कलाकृती सर्वांना समजतात, म्हणून त्या थोर असतात, त्या सर्वांना चटका लावतात. बायबलांतील जोसेफची गोष्ट चिनी भाषेत लिहिली, तर ती चिनी माणसास रडविल्याशिवाय राहणार नाही. शाक्यमुनि, भगवान् बुध्द यांच्या चरित्राने कोण गहिवरून जाणार नाही? थोर गीते, थोर चित्रे, थोर शिल्पकामे, थोर पुतळे-यांच्यामध्ये सरसकट सर्वांना मोहिनी पाडण्याची शक्ती असते. म्हणून कलेने जर हृदय हलत नसेल, वृत्ती उचंबळत नसतील तर हा प्रेक्षक किंवा हा श्रोता अप्रबुध्द आहे, असे म्हणू नये; उलट असे अनुमान करावे की, ही कला खरी उच्च दर्जाची सत्कला नाही.
बुध्दिगम्य व्यापारापासून कला विभिन्न आहे. जे बुध्दीने आकलन करावयाचे आहे, त्याच्यासाठी पूर्वतयारी लागते, अभ्यास असावा लागतो, पौर्वापर्य असावे लागते. (जसे भूमितीचे ज्ञान असल्याशिवाय त्रिकोणाकृती समजून देता येणार नाही.) परंतु व्यक्तीचा विकास किती झाला आहे, त्याचे शिक्षण किती झाले आहे, इकडे कलेचे लक्ष नसते. त्याच्याशी कलेला काहीएक करावयाचे नाही. सुंदर चित्र, सुंदर आकार सूर, सुंदर आकार कोणालाही वेड लावतात. कोणाच्याही हृदयास रमवितात; मग तो मनुष्य कोणत्या का विकास-भूमीवर असेना.