हे पाल्हाळिक वर्णन किती आहे, हुबेहूब चित्र कसे उठवले आहे, हे यथातथ्यत्व किती आहे यावरून कलाकृतीची किंमत ठरवू पाहाणे म्हणजे अन्नाच्या आकारावरून, लांबीरूंदी जाडीवरून, अन्नाची पोषकता परीक्षूं पाहण्यासारखे आहे. कलाकृतींतील स्वभावोक्तीवरून जेव्हा तिचे मोल आपण ठरवू पाहातो, या हुबेहूब वर्णनालाच महत्त्व देऊन जेव्हा कलेची किंमत अजमावतो, त्यावेळेस आपण सत्कलेबद्दल बोलत नसून कृत्रिम व वरपांगी कलेबद्दल बोलत आहोत असे नि:शंक समजावे.
मुद्दाम परिणाम घडविण्यासाठी प्रयत्न करणे यानेही कलाकृती सुंदर होते असे नाही. हा मार्गही कृत्रिमच आहे. काहीतरी नाविन्य, अनपेक्षित्व, विरोध, भयंकर दृश्यें इत्यादींनी जे परिणाम-बाह्य परिणाम-घडविले जातात, त्यामुळे हृदयांत भावना जागृत होतात असे नाही. आपल्या मज्जातंतूंवर एकप्रकारचा ताण बसतो, एक प्रकारचा परिणाम होतो. परंतु हा परिणाम म्हणजे भावनास्पर्श नव्हे. एखाद्या चित्रकाराने रक्ताने भरलेली जखम उत्कृष्टपणे चितारून दाखविली तर ते चित्र पाहून माझ्यावर परिणाम होईल; परंतु ती कृती म्हणजे कला नव्हे. एखाद्या सुंदर वाद्यावर परिणामकारक रीतीने पुन: पुन्हा घोळवून म्हटलेली रागिणी ऐकून कदाचित डोळयांत पाणीही येईल; परंतु तेथे जर निश्चित व स्पष्ट भावना हृदयांत उत्पन्न झालेली नसेल तर तेथे कला नाही म्हणून समजावे. परंतु मज्जातंतूंवर होणा-या अशा परिणामांसच कलेचे मुख्य कार्य म्हणून चुकीने समजण्यात येते. संगीत, काव्य, चित्रकला-सर्व प्रांतांत ही अनिष्ट स्थिती दिसून येते. लोक म्हणतात की, कला आज अधिक सुसंस्कृत झाली आहे, अधिक परिपूर्ण, निर्दोष व अव्यंग झाली आहे; आज कला अधिक कलावान् झाली आहे. परंतु कला खरोखर अधिक कलावान न होता या कृत्रिम व बाह्य सोंगाढोंगाच्या नादी लागून अधिक बेढब व पोरकट मात्र झाली आहे. तिच्यांत गांभीर्य व आंतरिकत्व न राहता, उधळपणा व डामडौल मात्र तिच्यांत शिरला आहे. सुसंस्कृतता दूर राहून उलट रानवटपणा मात्र तिच्यांत आला आहे. सौंदर्य न वाढता ती कुरूप व अरमणीय झाली आहे. हाप्टमनने Hanneles Himmelfahrt नावाचे नवे नाटक लिहिले व युरोपने ते डोक्यावर धरले. या नाटकाचा उत्कृष्ट म्हणून जयजयकार झाला. एका छळल्या जाणा-या मुलीबद्दल करूणा उत्पन्न करणे हे नाटककाराचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रेक्षकांच्या मनात या आर्त मुलीबद्दल कीव उत्पन्न व्हावी हा ग्रंथकर्त्याचा उद्देश आहे असे वाटते. कलेच्या साधनाने प्रेक्षकांच्या हृदयांत ही भावना जागृत करण्यासाठी काय बरे केले पाहिजे होते? नाटकांतील एखाद्या पात्राकडूनच इतकी अपरंपार दया दाखवावयाची की ती भावना आपल्यालाही हृदयांत उत्पन्न व्हावी; किंवा त्या मुलीच्या मनाची स्थिती अशी रंगवून दाखवावयाची की प्रेक्षकांना हुंदका व उमाळा यावा. परंतु हाप्टनने असे काहीएक केले नाही. त्याला असे करण्याची इच्छा नाही, कदाचित तो करू शकलाही नसता. त्याने दुस-याच एका युक्तीचा अवलंब केला. रंगभूमीच्या व्यवस्थेच्या दृष्टीने त्याने अवलंबिलेल्या मार्ग त्रासदायक व अडचणीचा असा आहे. परंतु ग्रंथकाराला तो सोपा आहे! ग्रंथकार रंगभूमीवरच त्या मुलीला मारायला लावतो. प्रेक्षकांच्या मज्जाजाळावर अधिक ताण बसावा म्हणून तो ग्रंथकार दिवे मालवायला सांगतो. सारे प्रेक्षक अंधारांत असतात. एक प्रकारचे भेसूर व दु:खमय असे संगीत सुरू असते. त्या मुलीला तिचा दारूडया बाप छळतो. तो तिला मारतो, गांजतो. सारे काळोखांत चाललेले असते. मुलगी पळण्याच्या निमित्ताने धावते, बाप पाठलाग करतो. तो तिला पकडतो. ती भिते, निसटते, सरकते, ओरडते. ती किंकाळी फोडते. ती कण्हते, विव्हळते. अयाइगं, मेल्ये असे रडते, ओरडते. शेवटी ती मरून पडते. देवदूत वरून येतात व त्या मुलीला घेऊन जातात. प्रेक्षकांची मने क्षुब्ध झालेली असतात, ताटकळलेली असतात. हे सारे काळेकुट्ट कृत्य अंधारांत होते. प्रेक्षकांच्या मनात एक प्रकारची विलक्षण चुळबुळ व अस्वस्थता उत्पन्न होते. हा जो प्रेक्षकांचा अंत:क्षोभ-हाच खरा कलात्मक परिणाम, हीच कलात्मक भावना असे त्यांना वाटते. परंतु हा मन:क्षोभ म्हणजे हृदयभावना नव्हे. ह्या मन:क्षोभांत कलेचा प्राण नाही, कलेचे अंग नाही. ही कला नव्हे, हा धांगडधिंगा आहे. एका माणसाने स्वत: अनुभवलेल्या भावना दुस-याच्या हृदयांत संक्रांत करणे, ते येथे नाही. येथे त्या दु:खी मुलीबरोबर समरसता होत नाही. एका दु:खी जीवाबद्दल संमिश्र अशी-निर्भेळ नव्हे-करुणेची भावना प्रेक्षकांच्या मनांत उत्पन्न होते. परंतु तो दु:खी जीव मी नाही ही जाणीव असल्यामुळे त्या भावनेत समाधान असते. एखाद्याला फाशी दिलेले पाहताना जसे वाटते, किंवा रोमन लोकांना सर्कशीतील द्वंद्वयुध्दे-प्राणान्तिक द्वंद्वयुध्दे-वगैरे पाहून जसे वाटे, त्याच मासल्याचे हेही वाटणे.