प्रोकाने खिडकीतून बाहेर पाहिले. त्याच्या तोंडावर सौम्य, मंद हास्य होते. मुलगा एकटाच नव्हता; त्याच्याबरोबर कोणीतरी मोठे होते असे त्याच्या आईने ताडले. खिडकीजवळ कोणी आहे हे लक्षात येताच ती ओशाळली. तिच्या तोंडावर एकदम एक कृत्रिम चर्या आली. तिची नैसर्गिक वृत्ति क्षणांत लोपली किंवा तिने लपविली. तिची कृत्रिम मुद्रा मला बरी वाटली नाही.
आता फक्त फेडका राहिला.
''आमच्या घरी एक फिरस्ते शिंपी आले आहेत, म्हणून आमच्याकडे अजून दिवा दिसत आहे.'' फेडका हळुवार आवाजात म्हणाला. आज सायंकाळपासून त्याच्या आवाजात मृदुत्वच आले होते.
''जयजय, निकोल्ह!'' तो कोमल स्वरांत म्हणाला. त्याच्या आवाजांत विलक्षण हळुवारपणा व स्निग्धता आली होती. दार आंतून बंद होते. बाहेरची कडी तो खडखड खडखड वाजवू लागला.
''मला आत येऊ द्या.'' तो मोठयाने म्हणाला. त्याचा तो मोठा आवाज हिवाळी शांततेत घुमला. बराच वेळ झाला, कोणी कडी काढीना. मी खिडकीतून आत पाहिले. फेडकाची झोपडी जरा मोठी होती. फेडकाचा बाप त्या शिंप्याबरोबर पत्ते खेळत होता. तेथे टेबलावर कांही नाणी पडलेली होती. तो जुगार होता. फेडकाची सावत्र आई जवळच दिव्याजवळ बसली होती. पैशांकडे आशाळभूतपणाने ती पहात होती. तो तरुण शिंपी मोठा धूर्त व कावेबाज दिसत होता. तोही दारूडया होता. त्याने आपले पत्ते टेबलावर ठेविले होते. ते पत्ते त्याने जरा वाकवले होते. आपल्या प्रतिपक्षाकडे विजयीमुद्रेने तो पहात होता. फेडकाच्या बापाच्या कॉलरचे बटन उघडे होते. त्याच्या कपाळाला आठया पडल्या होत्या. मानसिक त्रासाने मृकुटी आकुंचित झाली होती. त्याने एक पत्ता दुस-या पत्त्यासाठी बदलला. त्याने काम करून घट्ट पडलेला आपला हात गोंधळून हलविला.
''मला आत घ्या हो...'' - फेडका पुन्हा मोठयाने ओरडला.
ती सापत्न माता उठली, दरवाजाजवळ आली व तिने कडी काढली.
''जयजय निकोलव्ह! आपण असेच नेहमी जात जाऊ हं फिरायला. खरेच जाऊ हं'' असे म्हणून तो आत गेला.