जगन्नाथ मोटारीतून एरंडोलला येत होता. किती तरी विचार त्याच्या मनांत येत होते. संसाराचे विचार, स्वातंत्र्याचे विचार, दरिद्री जनतेचे विचार, भारतीय ऐक्याचे विचार, भारताच्या यात्रेचे विचार. परंतु मध्येच गुणा आठवे, मध्येच शिरपूरचे माणूस आठवे. तो आईचे डबडबलेले डोळे दिसत. त्याचा काही निश्चय होईना.
तो घरी आला. अधिकच अस्वस्थ होऊन आला. काही दिवस गेले. एके दिवशी पंढरीशेट त्याला म्हणाले—
“जगन्नाथ, आम्ही आता म्हातारी झालो. आम्हांला सोडून जाऊ जाऊ नकोस. गाणं शिकून तुला का कोठे जलसे करायचे आहेत? घरी पुरेसे आहे. तोटा नाही. करमणुकीपुरते गाणे येत आहे. सुखाने संसार कर. इंदिराहि आता मोठी झाली. तिला आणले पाहिजे. तिची माहेरची काय म्हणतील?”
“बाबा, कला केवळ करमणुकीसाठी का असते? केवळ पैशासाठी का ती शिकायची असते? देवाने जी देणगी दिली तिची वाढ करण्यांत आनंद असतो. तुम्हांला मुद्दल पाहण्यांत जसा आनंद होतो, तसा देवाला त्याने दिलेल्या देणग्या मनुष्य वाढवीत आहे हे पाहून होतो. बाबा, अजून मी लहान आहे. फार जून झालो नाही. कोवळा आहे आवाज. अद्याप तो कमावता येईल. अजून माझी शिकण्याची वेळ आहे. ही वेळ का पुन्हा येणार आहे? आज उत्साह आहे, आशा आहे, उमेद आहे. जाऊ द्या ना बाबा.”
“अरे लहान कसला तू. अजून का तू लहान? तुझ्याएवढे आम्ही होतो तर आम्हांला मुले झाली होती.”
“माझे तसे होऊ नये म्हणून तर मी जात आहे. इतक्यांत पोरांचे लेंढार पाठीमागे लागू नये म्हणून मी जात आहे. तुम्ही जी गोष्ट कौतुकाची म्हणून सांगत आहांत ती मला दु:खाची व मान खाली घालण्याची वाटत आहे. जाऊ दे मला. पोराबाळांची धनी होण्याची इतक्यांत मला इच्छा नाही. पंचवीस वर्षांचा होईपर्यंत मी ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली आहे.”
“खेड्यांतून नाटके करणारी तुम्ही पोरं. तुम्हीं कशाला ब्रह्मचर्याच्या गप्पा माराव्या.”
“बाबा, आम्ही खेड्यांतून मेळे केले, संवाद केले. ती काही लैला-मजनूनची नाटके नव्हती. राजाराणीची नाटके नव्हती. तुम्हां सावकारांचे अन्याय दाखविणारी ती नाटके होती. शौर्य, धैर्य निर्माण करू पहाणारी ती नाटके होती. माणुसकी देऊ पाहणारी ती नाटके होती. उगीच काही बोलू नका. संपूर्ण ब्रह्मचर्य नाही शक्य झाले तरी आम्ही धडपडू; थोडेहि सत्कर्म हातून झाले, थोडेही सद्धर्म आचरला गेला, तरी त्याचाहि जीवनांत उपयोग आहे.”
“हे पूर्वीच का नाही सांगितलेस? लग्नाला कशला उभा राहिलास?”