“तेव्हा सोडीन अळीमिळी.”
जेवणे झाली. इंदु, गुणा, रामराव, मनोहरपंत सारी दिवाणखान्यांत आली. गुणाची आई इंदूच्या आईजवळ बोलत होती. त्यांचीहि जेवणे झाली. सारे पटकन् आटोपून त्याहि बाहेर आल्या. रामा घरी गेला.
“इंदु, म्हणतेस ना?” मनोहरपंतांनी विचारले.
“तुम्ही हसणार नाही ना?” तिने विचारले.
“वेडेवाकडे म्हणालीस तर येईल हसूं.”
“आणि नीट म्हणेन तर आणीन आसू.”
“बरे पुरे. म्हण आतां. उगीच आढेवेढे घेत बसेल. पटकन् म्हणाले.”
“आई, गाणे का पटकन् म्हणतां येते?”
“मला नाही हो माहित. देवळांत बायका जमतात, पटकन् गाणे म्हणतात.”
“ही गाणी वाटतं तशी आहेत?”
“इंदु, वाद पुरे. म्हण हो आतां.” मनोहरपंत म्हणाले. गुणाने हातात सारंगी घेतली. इंदु गाणे म्हणू लागली. खरेच छान म्हटले तिने गाणे. आणि गुणाची साथ. गुणा तिला सांभाळून घेत होता.”
“चांगला आहे हो गळा.” रामराव म्हणाले.
“अहो गुणा सांभाळून घेत होता तिला.” मनोहरपंत म्हणाले.
“मला नको कोणी सांभाळायला. मीच त्यांना सांभाळीत होते. आवाज चढवीत नव्हते.”
परंतु गुणा खिडकीशी जाऊन उभा राहिला होता. रस्त्याकडे पहात होता. काय पहात होता? इंदु एकदम तेथे गेली व म्हणाली,
“काय पहातां?”