जगन्नाथ दक्षिण हिंदुस्थानच्या यात्रेस निघणार होता. परंतु त्याच्या वडिलांनी मध्येच एक डाव टाकला. एके दिवशी माहेराहून इंदिरा आली. जगन्नाथचा दादा तिला घेऊन आला. इंदिरेला आता सारे समजू लागले होते. ती काही आता लहान नव्हती.
इंदिरा आल्यापासून जगन्नाथ अधिकच अस्वस्थ झाला. तो खेड्यापाड्यांतून हिंडण्यांतच दिवस घालवू लागला. एरंडोलला असलाच तर तो गुणाच्या घरी जाऊन राही. तेथेच झोपे.
“इंदिरे, तू अगदी बावळट आहेस. जगन्नाथला तू जिंकून घेतले पाहिजे.”
“मी काय करूं?”
“रड त्याच्यासमोर.”
“रडून काय होणार?”
“अश्रूंनी दगडहि पाझरेल. इंदिरे, तुझ्यावर सारी जबाबदारी आहे. जगन्नाथला तू सांभाळ. तो जर कोठे गेला तर बघ.”
इंदिरेला काय करावे ते समजेना.
एके दिवशी इंदिरेने जगन्नाथजवळ बोलण्याचे ठरविले. तो घरांतून बाहेर पडणार ोहता. इतक्यांत इंदिरा येऊन म्हणाली,
“मला बोलायचे आहे थोडे.”
“काय बोलायचे आहे?”
“मनांतील दु:ख, मनांतील वेदना.”
“मला वेळ नाही.”