Bookstruck

इंदिरा 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

इंदिरा तोंडास तोंड देत नसे. तिला वाईट वाटे. तिला एखादे वेळेस रडूहि येई. जगन्नाथची आठवण करून ती समाधान मानी. परंतु त्याचेहि पत्र येईनासे झाले. त्यामुळे मात्र तिचा जीव गुदमरू लागला. ती दु:खी, अधिकच दु:खी दिसू लागली. वर्ध्याहून येतांना तिने एक सुंदर चरखा आणला होता. जगन्नाथच्या खोलीत ती रिकाम्या वेळी बसे, कांतीत बसे. भिंतीवर जगन्नाथचा फोटो होता, त्या फोटोला ती माळ घाली. ती खोली म्हणजे तिचे प्रेममंदिर. जगन्नाथ हिंदुस्थानची यात्रा करीत होता. तीर्थे, क्षेत्रे पहात होता. पंपा, किष्किंधा, रामेश्वर पहात होता. परंतु इंदिरेची सारी तीर्थे, सारी क्षेत्रे त्या समोरच्या फोटोत होती.

ती घरांतील सारे काम करी. दुपारी तिला वेळ मिळे. मग ती या प्रेममंदिरात येई. कांतीत बसे. हाताने सूत काढी. डोळ्यांतून टिपे काढी. त्या सुताने पतीला का ती आणू पहात होती? त्याला बांधून आणण्यासाठी का तो प्रेमाचा धागा ती काढीत होती?

तिसरे प्रहरी ती खाली जाई. पुन्हा सारे काम करी. रात्री काम आटोपल्यावर ती वर येई. न संपणारी रात्र तिची असे. चरखा तिचा सोबती असे. ती हलक्या आवाजाने गाणे म्हणे, हृदय भरून येऊन गाणे म्हणे. शोकविव्हळ होऊन गाणे म्हणे.

येईल कधी, येईल कधी
जीवनाचा नाथ माझा जगन्नाथ
येईल कधी।। ध्रु.।।

प्राण घुटमळे
हृदय जळे
भरती डोळे
गळती जळें
प्राण मी वाहीन त्यांच्या पदीं।।येईल.।।

वृक्षावरी
लता बरी
वृक्षाविणें
लुकें जिणें
शोभे फुले त्याच्या स्कन्धीं।।येईल.।।

नदी रडे
चढे पडे
डोंगर कडे
खुशाल कुदे
समुद्राला भेटेल नदी।।येईल.।।

किती पाहूं वाट
कुठली लागली नाट
आहे परी
आशा अंतरी
वाट पाहिन शातवर्षावधी।।येईल.।।

इंदिरेचे असे दिवस जात होते.

« PreviousChapter ListNext »