“नाही दिली खरी. जरूर वाटली नाही. आज वाटत आहे. आज लाज वाटत आहे. मराठी व हिंदी जवळच्या भाषा. संस्कृतापासूनच जन्मलेल्या. तुम्हांला शिकायला फारच जड. परंतु तुम्ही त्यांत तरबेज झाल्यात आणि मला नीट बोलता येत नाही.”

“येथे शिका. परीक्षा द्या. तुम्ही का केवळ गाणारे होणार आहांत? काय करणार पुढें?”

“काय करणार ते कोठे ठरलेले आहे? काही तरी गरिबांसाठी करावे असे वाटते.”

“गरिबांची संघटना करणार? समाजवादी होणार?”

“कदाचित् होईनहि. दयाराम भारतींच्यामुळे तसे थोडे वाटू लागले आहे. मी सावकाराचा मुलगा आहे. गरिबांना आम्ही छळले आहे. त्यांच्या जमिनी गिळून टाकिल्या आहेत. त्या जमिनी त्यांना परत द्याव्या असे वाटते.”

“जमिनी परत देणे म्हणजे का समाजवाद?”

“मी समाजवादाचा अभ्यास केला नाही. कसणा-याची जमीन हे तत्त्व योग्य आहे असे मला वाटते. आणि समाजवाद शेतक-यांच्या, लहान शेतक-यांच्या जमिनी काढून घेऊन इच्छित नाही. लेनिन म्हणत असे की सहकार्याने एकत्र शेती केली तर अधिक फायदेशीर होते हे त्यांना पटवू व ते शेतकरी आपण होऊन सामुदायिक शेतीत सामील होतील. परंतु त्यांच्या जमिनी सक्तीने आधीं कधीही काढून घेण्यांत येणार नाहीत. परंतु जाऊ दे माझा फार अभ्यास नाही.”

“तुमच्याकडे अभ्यासमंडळे नाहीत वाटते?”

“उन्हाळ्यांत अलीकडे अलीकडे अशी अभ्यासमंडळे सुरू करू लागले आहेत.

“आमच्याकडे सर्वत्र अशी अभ्यासमंडळे आहेत. समाजवाद झपाच्याने पसरत आहे. मलबार व आंध्र प्रांतांत जास्त आहे. मलबार किना-यावर समाजवाद सुख देईल. फार मोठमोठे जमीनदार आहेत. तुम्ही मोपला शब्द ऐकला असेल ना?”

“हो. मोपल्याचे बंड झाले होते.”

“बंड?”

“त्यांनी बंड केले ना? आणि हिंदूंवर अत्याचार केले. मराठीत एक आहे खरे पुस्तक.”

“अहो ते स्वातंत्र्ययुद्ध होते. गरिबांची श्रीमंतांविरुद्ध ती उठवणी होती. खोलपोट्यांची गोलपोट्यांबरोबर लढाई होती. अकिंचनांची मालदारांबरोबर लढाई होती. गेल्या शंभर वर्षांत असे झगडे कितीदां तरी झाले. एकप्रकारची ती क्रांति होती. ते धर्मवेडेपण नव्हते. श्रीमंत व जमीनदार सरकारच्या साहाय्याने या गरिबांवर उलटले. गरिबांच्या या आर्थिक झगड्यांत ते सामील होत ना, तेव्हा काही थोड्या गरीब मुसलमानांनी संतापाच्या भरांत धर्माच्या नावानेहि थोडे अत्याचार केले. कारण जमीनदार पुष्कळसे हिंदु असत. मोपला गरिब आहेत. हिंदु धर्मांतील गरीब लोकच ठिकठिकाणी मुसलमान झाले. हिंदूंनी उपेक्षिलेले, तुच्छ मानलेले, माणुसकीस पारखे केलेले लोक मुसलमान झाले. चे गरीब असत. मोपला गरीब आहेत. श्रीमंतांविरुद्ध ते उठले म्हणजे हिंदूंविरुद्ध उठले असे सहज मानले जाते. परंतु तसे नाही. त्या मोपला वीरांनी, त्या क्रांतिकारकांनी धर्माच्या नावाने अत्याचार करणा-यांची स्वत: कानउघाडणी केली. आपली चळवळ व लढाई कशासाठी आहे ते समजावून कानउघाडणी केली. एके दिवशी हा खरा इतिहास दुनियेला कळेल. १८७१ मध्ये पॅरिस शहरांतील कामगारांनी क्रांति केली तशा प्रकारचा हा प्रयत्न होता. श्रमजीवींचा सुखी होण्याचा तो प्रयत्न होता. ते धार्मिक बंड नव्हते. परंतु आपल्यांतील धर्माच्या नावाने बोंबा मारणा-यांनीं व प्रतिष्ठितांच्या वर्तमानपत्रांनी त्याला तसे विकृत स्वरूप दिले. आर्यसमाजी लोक आले व कोठे हिंदूंवर अत्याचार झाला त्यांचे फोटो दिले. या सर्व लोकांचा संताप येतो. वरवर पाहणारे हे लोक मुळाशी जात नाहीत. खरी कारणे पहात नाहीत. धर्माच्या नावाने काही अडाण्यांनी थोडे अत्याचार केले, परंतु त्यांच्याच पुढा-यांनी त्यांना दरडावले. तशी पत्रके काढली. तुम्ही तो सारा इतिहास गोळा करा. तुम्ही महाराष्ट्रांत गेल्यावर खरा इतिहास लिहा. मी तुम्हांला माहिती मिळवून देईन. दक्षिणेकडच्या कला शिकायला आला आहांत. दक्षिणेकडील हे करुणवीर प्रसंग समजून घेऊन जा.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel