“मग काय करूं?”
“आपण एरंडोलला जाऊ सारीं. तू तेथे आला आहेस हे त्याला कळेल. जगन्नाथ येईल.”
“जायचे का एरंडोलला?”
“जाऊं.”
“बाबांनाहि बरे वाटेल. परंतु इंदु कसे जायचे? आज कसे जाता येईल? पैसे मिळवून मग जायला हवें. बाबा का खाली मान घालून राहतील? त्यांना स्वाभिमानाने राहतां आले पाहिजे. सावकाराचे देणे देऊं व मग रहायला जाऊं.”
“मी एक सांगू का?”
“काय?”
“हा वाडा विकून टाकावा. माझे हे दागदागिने सारे विकून टाका. बँकेतील पैसे आहेत. काही पॉलिसीचे पैसे येतील. कर्ज सहज फेडता येईल. आणि माझे म्हणणे असे की आता कर्ज का फेडा? तुमची शेतीवाडी गेली. तिचे लिलाव झाले. सावकारांनी हिश्शेवारीप्रमाणे पैसे घेतले. आता का द्यायचे कर्ज? तुमच्या इस्टेटीहून कर्ज का जास्त होते? व्याजामुळे जास्त झाले. तुम्ही फसविले असेहि नाही. आतां सावकारांची देणी देऊं नयेत. आपण येथून एरंडोलला जाऊं. रोकड करून जाऊं. आणि तुम्ही मोठी संस्था काढा. आरोग्यधामसंस्था. मीहि त्या संस्थेत काम करीन. आपण प्रयोग करूं. निसर्गोपचार, मानसोपचार नान पद्धति अवलंबू. काढा त्या पद्मालयाजवळ सुंदर संस्था. गरिबांना मोफत ठेवू. सावकारांनी तरी पैसे कोठून आणले? गरिबांचेच ते सारे पैसे. गरिबांच्या श्रमांतून धन निर्माण होते. सावकार व्याजाने धन वाढवतो. वाढवतो म्हणजे दुस-यांना लुटून आणतो. गरीब घामाने धन निर्माण करतो. धान्य व वस्तु निर्मितो. असेंच आपण करूं या. तुमचे घर आहेच. तुमच्या मित्राने ते जाऊं दिले नाही. त्या घरी चला जाऊन राहू. आपण अशी सुंदर संस्था काढली तर कोणी नावे का ठेवील? सावकारांना बुडवून संस्था काढतात असे का म्हणतील? म्हणू द्या. सावकारांनी आमचे सर्व शेतभात, जमीनवाडी घेतली असे आपणहि स्वच्छ सांगू.”
“इंदु, तू हे मनापासून सांगत आहेस? तुला गरिबींत रहायला आवडेल?”
“गुणा, सुख कशांत आहे.”
सुख शेवटी मनांत आहे.”