“ते श्रीराम राजु कोठें गेले आहे ?”
“त्यांचा पत्ता नाही. त्यांना मारलें की ते मेले, कळत नाही.”
“डोंगरांत उभा राहून तो लढला. धनुष्यबाणानें रामाप्रमाणें लढला. पुष्कळ डोंगरांतील लोक त्याच्याबरोबर लढले. खरा वीर. आई, तुम्ही लढाल का त्या श्रीरामाप्रमाणें ?”
“लढूं, देश स्वतंत्र करूं. हे मळे तुमच्या मालकीचे करूं.”
तुम्ही देव आहांत. सोडवा आम्हांला.” असें म्हणून प्रणाम करून तो मनुष्य गेला. इतर सोबत्यांसह गेला.
“कावेरी, हे श्रीराम राजु कोण ?”
“जगन्नाथ, हा नुकता १५/२० वर्षांपूर्वी झालेला महान् स्वातंत्र्यवीर. त्याने इंग्रजांशी लढाई पुकारली. स्वातंत्र्य जाहीर केले. धनुष्यबाणानें तो लढला. सहा महिने तो लढत होता. द-याखो-यांत लढत होता. तुम्हांला त्याचे नांवहि माहीत नाही ? दक्षिणेत त्याच्यावर शेकडों पोवाडे झाले आहेत, गाणी झाली आहेत. जगन्नाथ, तूं का गोरा राम ?”
“मी कसला राम ?”
“तूं रामच आहेस. वनवासी राम. पट्टाभिराम नाही हो. जगन्नाथ, मला वनवासी राम आवडतो. पट्टाभिराम नाही आवडत.”
“मी वनवासी राम व्रती होता.”
“तो बघ सुंदर पक्षी, कावेरी, तो बघ”
“खरेंच, किती छान ! गेला उडाला.”
“आपण आतां समुद्रकिना-यानें हिंडूं. मद्रासचा किनारा.”
“उंच पर्वत पाहिलेस, प्रचंड मंदिरें पाहिलीस. आतां समुद्राच्या अनंत लाटा बघ.”
आणि हिंडत हिंडत पू्रव समुद्राला हें प्रेमी जोडपे गेलें. समुद्रकांठी लहान लहान गांवे. गरीब गांवें.
“किती दरिद्री ही गांवे !”
“जगन्नाथ, एके काळी ही सुखी गावें होती. इंग्रजांनी ही भिकारी केली. मद्रासच्या पूर्व किना-यावर अपरंपार मीठ पिके व हें सारे मीठ बंगाल बिहारला जाई. बंगालकडे मीठ होत नाही. परंतु इंग्रज तिकडून मीठ आणून बंगालमध्यें विकूं लागले. आमचा धंदा त्यांनी कायद्यानें मारला. मद्रास किनारा दरिद्री झाला. या किना-यावर अपरंपार पीक आपोआप होई. लोक तें नेत. परंतु सरकारी अधिकारी येतात व हे मीठ मातीत मिसळतात, वाळूत मिळवतात. देवानें दिलेलें अन्न मातीत मिळवण्यासाछी सरकार नोकर ठेवतें व त्यांना आपण पगार देतो. जगन्नाथ, या किना-यावरच्या लोकांना आज मीठ विकत घ्यावें लागते. परंतु त्यांच्याजवळ दिडकी नसते. परंतु मिठाचा अंश तर पोटांत जायला हवा. नाही तर शरीर सडेल. रोग होतील. मग हे लोक काय करीत, माहीत आहे ?”