Bookstruck

एरंडोलला घरीं 19

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“कावेरी, पूर्वीची पुण्याई पूर्वीच्या तीर्थक्षेत्रांना पुरत आहे. श्रीरंगलमला हरिजन संत नंदा आगीत उडी घेतो. पंढरपूरला एक वेश्याकन्यका पांडुरंगाच्या चरणी लीन होते व तिचे प्राण निघून जातात. असे अनंत त्यांग त्या त्या क्षेत्री ओतलेले आहेत. आपण नवीन कार्यक्षेत्रांत असे त्याग ओतूं तेव्हां नवीन तीर्थक्षेत्रें जन्मतील. पूर्वजांच्या त्यागाची परंपरा सतत चालली पाहिजे. पूर्वी पंढरपूरला त्यागाचा होम पेटला, आज सेवाग्रामच्या सभोंवती पेटो. तो पेटत राहिला पाहिजे. राष्ट्राचे चारित्र्य नेहमी घडत राहिले पाहिजे. ते बंद होता कामा नये. दारिद्र्य वा वैभव; दास्य वा स्वातंत्र्य; परंतु चारित्र्य फुलत राहिलेच पाहिजे.”

“आज भारतांत चारित्र्य कां फुलत नाही ?”

“फुलत आहे. भारताचे तोंड ज्ञानविज्ञानानें, कलाविकासानें,पावित्र्यानें, पराक्रमानें, विवेकवैराग्यानें, सत्यअहिंसेने आजहि फुलत आहे. स्त्रिया मुलें लाठीमारखात आहेत. कोणी हुतात्मे फांशी जात आहेत. कोणी प्रायोपवेशन करून प्राण अर्पित आहेत. कामगार गोळीबारांनी मरत आहेत; मोटारीसमोर पडून रक्ताचा सडा ओतीत आहेत. त्याग फुलत आहे.”

“परंतु जगन्नाथ आपण काय करीत आहोंत ?”

“आपणहि घरदार सोडून प्रेमासाठी फकिरी पत्करून हिंडत आहोत. प्रेमाचा स्वर्ग रानावनांत, रस्त्यांतील धुळींत, उपासमारींत, निर्माण करीत आहोत. कावेरी, त्याग का फक्त देशसेवेत आहे ? राजकीय क्षेत्रांतच आहे ? त्याग व चारित्र्य सर्वत्र घडत असतें. जीवनाच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींतून भलेबुरें चारित्र्य प्रकट होत असतें.”

“याला तूं घे जरा. मी दमलें.”

“आण. आपल्या प्रेमाचा प्रेमध्वज. त्याला खांद्याशी धरतो.”

हिंडत फिरत, भिक्षा मागत, गाणी गात खरेच दोघें पंढरपूरला आली. आषाढीचा सोहळा तेथे सुरू होणार होता. यात्रा जमत होती. चंद्रभागेस पूर आला होता. दिंड्या नाचत होत्या. भजनाची टाळी लागली होती. पंढरपूर दुमदुमले होते. त्या यात्रेत आमचेहि यात्रेकरू मिसळले. गोड गाणी गात नाचूं लागले.

« PreviousChapter ListNext »