“आजी, बाबांचं तें आवडतं गाणं मी म्हणूं ?”
“हं, म्हण; छान आहे तें गाणं.”
संध्या गाणे म्हणूं लागली:
(चाल : दिल खूनके हमारे...)
भीमे वहा वहा गे
जन सर्व उध्दरावे ॥भीमे०॥
तव गोड गोड नीर
तव धन्य रम्य तीर
सेवून लोक-माते
निष्पाप सर्व वाटे ॥ भीमे०॥
शेतें तुझ्या तटींचीं
समृध्द शत पटीचीं
देती अपार पीक
संसार हा सुखावे. ॥ भीमे०॥
घोडे तुझ्या थडीचे
होती गडी विजेचे
अटकेस दौड गेली
इतिहास नव घडावे ॥ भीमे०॥
देशी स्वराज्य माते
देशीहि मुक्ति माते
परमार्थ अन् प्रपंच
दोन्हीहि हातिं द्यावे ॥ भीमे० ॥
बाळे तुझीं अम्ही गे
आम्हांस वाढवी गे
दे प्रीति नी विरक्ती
मग जीव हा विसांवे ॥ भीमे०॥
पाण्यांत गाणें म्हणत संध्या नाचूं लागली. भीमेच्या पाण्यावर ती हात मारीत होती. ताल धरीत होती. मध्येच पाण्यांत बसे, मध्येंच उभी राही. मध्येंच गिरकी घेई. मध्येंच टाळया वाजवी.
“संध्ये, पोरी, बाधेल हो पाणी. नीघ बाहेर.”
“भीमेचं पवित्र पाणी. चंद्रभागेचं पाणी. तें का बाधेल ? वेडी आजी !”
“एवढीशी चिमुरडी आहेस. पण वाद घालीत बसतेस. बॅरिस्टर नवरा हवा मिळवून द्यायला. साध्या नव-याला तूं रडवशील.”